नगर तालुका: नगर तालुक्यात एसटी महामंडळाचा बेजबाबदार व ढिसाळ कारभार पुन्हा एकदा चव्हाट्यावर आला आहे. जेऊर येथील श्री संतुकनाथ इंग्लिश विद्यालयाच्या शैक्षणिक सहलीसाठी ठरवलेल्या एसटी बसगाड्या वारंवार नादुरुस्त झाल्याने विद्यार्थ्यांची सहल अर्ध्यातूनच माघारी आणावी लागली. या प्रकारामुळे विद्यार्थ्यांचा हिरमोड झाला असून पालकांमध्ये संतापाची लाट उसळली आहे.
रयत शिक्षण संस्थेच्या श्री संतुकनाथ इंग्लिश विद्यालयाची शैक्षणिक सहल शुक्रवारी (दि. 19) आयोजित करण्यात आली होती. सहलीसाठी राज्य परिवहन महामंडळाकडे वारंवार विनंती करूनही चांगल्या बसगाड्या देण्यात आल्या नाहीत. सहलीसाठी सुव्यवस्थित बस देण्याबाबत सरकारचे परिपत्रक असतानाही तारकपूर आगाराने दिलेल्या बस गाड्या तब्बल सहा वेळा नादुरुस्त झाल्या. वारंवार बस बदलून घेण्याची वेळ विद्यार्थी व शिक्षकांवर आली. नादुरुस्त गाडीतील विद्यार्थ्यांना इतर गाड्यांमधून जास्त क्षमतेने प्रवास करावा लागला. वेळेअभावी सहलीतील नियोजित असलेले काशीद बीच, हरिहरेश्वर, महाड या स्थळांना विद्यार्थ्यांना जाता आले नाही.
एसटी महामंडळाच्या गलथान कारभाराचा फटका विद्यार्थ्यांना बसला. विद्यार्थ्यांची मोठी गैरसोय झाली. मागील वर्षी चिचोंडी पाटील येथील शाळेच्या सहलीसाठी दिलेल्या अशाच बसगाड्यांमुळे आलेला अनुभव एसटी महामंडळाच्या अधिकाऱ्यांच्या लक्षात शाळेतील शिक्षकांनी आणून दिला होता. तरीही या बाबीकडे दुर्लक्ष करून सहलीसाठी व्यवस्थित गाड्या देण्यात आल्या नाहीत असा आरोप करण्यात येत आहे.
गाडी नादुरुस्त झाल्यानंतर महामंडळाने गाडी दुरुस्ती व गाडी बदलून देण्याबाबत खूपच उशीर केला. परिणामी पहिल्या दिवशी सहा तास व दुसऱ्या दिवशी चार तास एवढा उशीर झाला. पालकांना घटनेची माहिती समजल्यानंतर पालकांमधून प्रचंड रोष निर्माण झाला असून, सहलीसाठी भरलेले शुल्कही परत मागण्यात येत आहे. शिरूर, तळेगाव, पेण अशा विविध ठिकाणी बस गाड्या बदलण्यात आल्या तसेच महामार्गावरच बस नादुरुस्त झाल्याने कडाक्याच्या थंडीत विद्यार्थ्यांचे अतोनात हाल झाले. एसटी महामंडळाच्या गलथान कारभारामुळे विद्यार्थ्यांना नियोजित सहलीतील अनेक स्थळे पाहताच आली नाहीत.
विद्यार्थ्यांच्या जीवाशी खेळ?
शैक्षणिक सहलीसाठी बस देताना साधी तांत्रिक तपासणी केली जात नसेल, तर गंभीर बाब आहे. एसटी महामंडळाच्या बेजाबाबदार कारभारामुळे विद्यार्थ्यांना व शिक्षकांना मोठा मनःस्ताप सहन करावा लागला आहे. क्षमतेपेक्षा जास्त विद्यार्थ्यांना प्रवास करावा लागला. त्यामुळे विद्यार्थ्यांच्या सुरक्षिततेचा प्रश्न निर्माण झाला आहे. शैक्षणिक सहलीसाठी स्वतंत्र तपासणी केलेल्या बस उपलब्ध करून देणे गरजेचे आहे. जेऊर सहलीच्या प्रकरणाची चौकशी करून संबंधितांवर कारवाई करण्याची मागणी पालकांमधून होत आहे.