श्रीरामपूर: आठवड्यातून एकदा पाणी सोडण्याच्या प्रश्नावर जलसंपदा मंत्री राधाकृष्ण विखे पाटील यांनी तोडगा काढत डिसेंबरचे आवर्तन १५ दिवस अगोदर सोडण्याचा निर्णय घेतल्याने श्रीरामपुरला आता आठवड्यातून सोमवार आणि गुरुवार, असे दोन दिवस पाणी सोडण्याचा निर्णय घेतल्याची माहिती आ. हेमंत ओगले व नगराध्यक्ष करण ससाणे यांनी दिली.
याबाबत काल शनिवारी (दि. ३१) येथील नगरपालिकेत पत्रकार परिषद घेऊन ही घोषणा करण्यात आली. यावेळी आ. हेमंत ओगले, नगराध्यक्ष करण ससाणे, पाणीपुरवठा सभापती योगेश जाधव, नगरसेवक दिलीप नागरे, श्रीनिवास बिहाणी, मुजफ्फर शेख, वैशाली चव्हाण, आशिष धनवटे, दीपक वामने, सिद्धार्थ फंड, शशांक रासकर, लकी सेठी, सचिन गुजर, रितेश एडके आदी उपस्थित होते. यावेळी मंत्री विखे पाटील यांनी श्रीरामपूर शहरातील पाणी प्रश्नात मार्ग काढल्याने व आवर्तन लवकर मिळवून दिल्याने आ. ओगले व नगराध्यक्ष ससाणे यांनी मंत्री राधाकृष्ण विखे पाटील व माजी खा. डॉ. सुजय विखे पाटील यांचे आभार मानले.
यावेळी आ. ओगले यांनी सांगितले की, सध्या दुष्काळाची परिस्थिती पाहता तलावात असलेले पाणी व येणारे आवर्तन याची परिस्थिती पाहून श्रीरामपूर नगरपालिकेने आठवड्यातून एकदा पाणी सोडण्याचा निर्णय घेतला होता. मात्र, याचे वेगळे परिणाम समोर येऊ लागल्याने काल शनिवारी सकाळी आ. ओगले, नगराध्यक्ष ससाणे व सत्ताधारी व विरोधी नगरसेवक यांनी एकत्र येऊन मंत्री विखे पाटील यांची लोणी येथे जाऊन भेट घेतली. त्यावेळी श्रीरामपूर शहराचा पाणी पुरवठ्याची व तलावाचे सुरू असलेल्या कामाची माहिती सांगितली.
आम्हाला नोव्हेंबर महिन्यात १ आवर्तन द्यावे, अशी मागणी केली. त्यानंतर मंत्री विखे पाटील यांनी सर्व माहिती जाणून घेत तातडीने १५ डिसेंबर रोजी जे आवर्तन सोडले जाणार होते. ते आता १ डिसेंबर रोजी सोडण्याचे आदेश जलसंपदा विभागाला दिले. हे आवर्तन २३ डिसेंबरपर्यंत चालणार आहे. बॅलेन्सिंग टॅन्कचे काम पूर्ण झाल्यानंतर पाण्याची साठवणूक क्षमता वाढली जाणार आहे. तसेच साठवण तलावाचे संपूर्ण काम हे ३१ मार्च २०२७ पर्यंत पूर्ण करू, असे आश्वासन ठेकेदाराने दिले असल्याने श्रीरामपूर वरील पाण्याचे संकट दूर होण्यास मदत होणार असल्याचेही आ. ओगले व नगराध्यक्ष ससाणे यांनी सांगितले. पाणी प्रश्नावर सत्ताधारी व विरोधी नगरसेवक एकत्र येऊन काम करू लागल्याने पाण्याचा प्रश्न लवकरच सुटण्यास मदत होणार आहे.
सोमवार व गुरुवार होणार पाणीपुरवठा
ठेकेदाराने बॅलेन्सिंग टॅन्कचे काम १५ फेब्रुवारी २०२७ पर्यंत पूर्ण करणार असल्याचे सांगितल्याने नोव्हेंबर महिन्यात २, ५, ९, १२, १६, १९, २३, २६, ३० आठवड्यातून दोन दिवस म्हणजे सोमवार व गुरुवार या दिवशी शहराला पिण्याच्या पाण्याचा पुरवठा केला जाणार आहे. तसेच १ डिसेंबरपासून २३ डिसेंबरपर्यंत चालणाऱ्या आवर्तनाच्या काळात रोज पाणीपुरवठा होणार आहे. त्यानंतर जानेवारी २०२७ या महिन्यात तलावातील पाण्याचा अंदाज घेऊन पाणी पुरवठ्याचा निर्णय घेतला जाणार आहे.
डॉ. विखेंनी ठेकेदाराला खडसावले
श्रीरामपूर शहरातील पाणी साठवण तलावाचे काम करणाऱ्या ठेकेदाराने मुदतीच्या आत काम पूर्ण केले नाही. तसेच दोन वेळा मुदतवाढ देऊनही काम पूर्ण न झाल्याने माजी खा. डॉ. सुजय विखे पाटील यांनी ठेकेदारास चांगलेच खडसावत सदर पाणी साठवण तलावाचे काम ३१ मार्च २०२७ च्या आत पूर्ण झाले पाहिजे, असा दम भरल्याने आता तलाव मुदतीच्या आत पूर्ण होण्याची अपेक्षा व्यक्त होत आहे.