School teacher crime news Pudhari
अहिल्यानगर

Shrirampur School Case: दुसरीत शिकणाऱ्या 4 विद्यार्थिनींचा विनयभंग, श्रीरामपुरातील मराठी शाळेत शिक्षकाचं कृत्य; राज्यात संताप

पोक्सो अंतर्गत गुन्हा दाखल; शाळा प्रशासनाने प्रकरण दडपण्याचा प्रयत्न केल्याचा पालकांचा आरोप

पुढारी वृत्तसेवा

श्रीरामपूर: शहरातील प्रसिद्ध संस्थेच्या एका प्रतिष्ठित मराठी शाळेतील शिक्षकाने आठवर्षीय चार चिमुकल्यांवर अयोग्य ठिकाणी स्पर्श करून विनयभंग केल्याची घटना समोर आली आहे. याप्रकरणी संबंधित शिक्षकाला अटक करण्यात आली असून त्याच्या विरोधात बालकाचे लैंगिक अत्याचारापासून संरक्षण कायद्यानुसार (पोक्सो) गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

सचिन महाजन गोणारकर (वय 35, रा. गोणार्क, ता. कंधार, जि. नांदेड; हल्ली मुक्काम वार्ड क्र. 7, श्रीरामपूर) असे या शिक्षकाचे नाव असून, एक ऑगस्ट 2025 रोजी पवित्र पोर्टलद्वारे त्याची या शाळेवर नियुक्ती झाली होती. या शिक्षकाने तो शिकवत असलेल्या दुसरीच्या वर्गातील चार विद्यार्थिनींशी अयोग्य ठिकाणी स्पर्श करत अश्लील चाळे केले.

याबाबत संबंधित विद्यार्थिनींनी पालकांना सांगितले, तेव्हा पालक जाब विचारण्यासाठी शाळेत गेले. त्या वेळी संस्थेच्या प्रमुखांनी हे प्रकरण पोलिसांपर्यंत जाऊ देऊ नका, असे पालकांना सांगितले; परंतु इतकी निंदनीय घटना असूनही संस्थेचे प्रमुख अडवतात, याचा खेद व्यक्त करत पालकांनी शहर पोलिस ठाणे गाठले.

पोलिस निरीक्षक नितीन देशमुख यांची भेट घेऊन पालकांनी हा प्रकार त्यांच्या कानावर घातला. त्यानंतर सचिन महाजन गोणारकर या शिक्षकाविरुद्ध पोक्सोनुसार गुन्हा दाखल करण्यात आला असून त्याला अटक करण्यात आली आहे.

याआधीही एक शिक्षक वादात

याच संस्थेच्या शाळेतील एका शिक्षकाच्या घरी एका तरुणीने आत्महत्या केली. तिने शिक्षकाच्या घरी आत्महत्या का केली याबाबत अद्यापही शंकाच आहे. या शिक्षकाची बदली करण्यात आली असून ते प्रकरण अधिकच सांध्याच्या भोवऱ्यात अडकले आहे. या प्रकरणाची धग कमी होत नाही तोच या संस्थेतील शिक्षकाचा हा प्रकार समोर आला आहे.

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

SCROLL FOR NEXT