श्रीरामपूर : शिपिंग कंपनीत नोकरीस असलेला श्रीरामपुरातील तरुण दुबईजवळील शारजा ते कुवैत दरम्यान समुद्रामध्ये जहाजावर अडकला आहे. 48 हजार टन गॅस असलेले हे जहाज शारजा शहरापासून सुमारे आठ किलोमीटर अंतरावर समुद्रात थांबून ठेवले आहे.
गणेश मुकुंद जाधव असे समुद्रात अडकलेल्या श्रीरामपुरातील तरुणाचे नाव आहे. श्रीरामपूर शहरातील वॉर्ड क्र. 7 मधील पूर्णवादनगर रहिवासी असलेला गणेश हा मुंबई येथील द ग्रेट इस्टर्न शिपिंग कंपनीत नोकरीस आहे. द ग्रेट इस्टर्न शिपिंग कंपनीचे जहाज गत आठवड्यात कुवैत येथे गेले होते. गणेश जाधव त्याच जहाजावर आहे. 48 हजार टन गॅस असलेले हे जहाज सुरक्षेच्या दृष्टीने शारजा शहरापासून सुमारे आठ किलोमीटर अंतरावर समुद्रात थांबलेले आहे.
अमेरिकेने इराणवर हल्ला केल्यानंतर जागतिक स्तरावर युद्धजन्य परिस्थिती निर्माण झाल्याचे चित्र आहे. जहाज कुवैत परिसरात असताना त्यांच्यापासून काही अंतरावर मिसाईलचे स्फोट झाले. जहाजावर गॅस असल्याने सुरक्षेच्यादृष्टीने हे जहाज समुद्रामध्ये थांबविण्यात आले आहे. भारत देशातील अनेक प्रवासी बाहेरच्या देशांमध्ये अडकलेले आहेत. श्रीरामपूर शहरातील पूर्णवादनगर येथील रहिवासी तथा हॉटेल व्यावसायिक मुकुंद जाधव यांचा मुलगा गणेश हादेखील जहाजावर अडकलेला आहे.
आखाती देशांतील वाहतुकीवर युध्दाचा परिणाम झाला असून गणेशचे कुटुंब काळजीत पडले आहे. मुलगा गणेश सुखरूप घरी पोहचावा यासाठी त्याचे वडील मुकुंद यांनी अहिल्यानगर जिल्हाधिकारी कार्यालयात संपर्क करत मदतीची याचना केली आहे. जिल्हाधिकाऱ्यांनी ही माहिती वरिष्ठ पातळीवरून पोहचवत मदतीसाठी प्रयत्न सुरू केल्याचे समजते. तीन महिन्यापूर्वीच गणेश इस्टर्न शिपिंग कंपनीत नोकरीवर रुजू झालेला आहे.