Shevgaon Prostitution Racket: शेवगावच्या राजयोग हॉटेलवर पोलिसांचा छापा; बांगलादेशी तीन तरुणींची सुटका
बोधेगाव : शेवगाव येथील राजयोग हॉटेलवर नोकरीच्या आमिषाने तरुणींकडून वेश्याव्यवसाय करून घेतला जात असल्याचे उघड झाले आहे. पोलिसांनी बुधवारी रात्री छापा टाकून तीन बांगलादेशी मुलींची सुटका केली आणि लॉज मालकासह सहा जणांविरुद्ध गुन्हा दाखल केला आहे.
सामाजिक संस्था फ्रीडम फर्म यांना मिळालेल्या माहितीनुसार शेवगाव-गेवराई रोडवरील राजयोग हॉटेल/लॉज येथे मुलींना नोकरीचे आमिष दाखवून ठेवले जात असून त्यांच्याकडून जबरदस्तीने वेश्याव्यवसाय करून घेतला जात होता. ही माहिती पोलिसांना देण्यात आल्यानंतर छापा टाकण्याचे आदेश देण्यात आले.
पोलिस निरीक्षक हमीद शेख यांनी पथकासह पंचांसमक्ष बनावट ग्राहक पाठवून खात्री करून छापा टाकला. या कारवाईत लॉजमध्ये तीन बांगलादेशी मुलींना डांबून ठेवून त्यांच्याकडून इच्छेविरुद्ध वेश्याव्यवसाय करून घेत असल्याचे उघड झाले.
या प्रकरणी कृष्णा बापू झिरपे (रा. कोळगाव), प्रतीक मिलिंद रांधवने (रा. माळीवाडा, शेवगाव), लॉजमालक बाबासाहेब रामभाऊ अंधारे, अजिंक्य विठ्ठल अंधारे (रा. शिवाजीनगर, शेवगाव), अमोल पठाडे (रा. नेवासा) व अमर मारुती ढाकणे (रा. हसनापूर, ता. शेवगाव) यांना ताब्यात घेण्यात आले आहे.
शेवगाव पोलिस ठाण्यात गुन्हा नोंदवण्यात आला आहे. पोलिस अधीक्षक सोमनाथ घार्गे, अपर पोलिस अधीक्षक वैभव कलुबर्मे, पोलिस उपअधीक्षक गणेश उगले व पोलिस निरीक्षक रवींद्र देशमुख यांच्या मार्गदर्शनाखाली निरीक्षक हमीद शेख, सहायक फौजदार शकील शेख, हेडकॉन्स्टेबल अर्चना काळे, कॉन्स्टेबल छाया रांधवन यांच्या पथकाने ही कारवाई केली.

