श्रीरामपूर: श्रीरामपूर नगरपरिषद सार्वत्रिक निवडणुकीची मतमोजणी आज (रविवार दि. 21 डिसेंबर) रोजी सकाळी 10 वाजता सुरु होणार आहे. या पार्श्वभूमीवर प्रशासन सज्ज झाले आहे. मतमोजणीची तयारी पूर्ण करण्यात आली आहे. ही प्रक्रिया अत्यंत पारदर्शक व शांततेत पार पडण्यासाठी सर्व उमेदवार, त्यांचे प्रतिनिधी व नागरिकांनी प्रशासनाला सहकार्य करावे, असे आवाहन प्रांताधिकारी तथा, निवडणूक निर्णय अधिकारी किरण सावंत, सहाय्यक निवडणूक अधिकारी तहसीलदार मिलिंदकुमार वाघ व दुसरे सहाय्यक निवडणूक निर्णय अधिकारी नगरपालिका मुख्याधिकारी मच्छिंद्र घोलप यांनी केले आहे. दरम्यान, ‘कोन बनेगा नगराध्यक्ष?’ अशी उत्सुकता शहरासह तालुक्यातील नागरिकांना लागली आहे.
राज्य निवडणूक आयोगाच्या (दि. 4 नोव्हेंबर)च्या आदेशानुसार नगरपरिषद नगरपंचायत सार्वत्रिक निवडणूक कार्यक्रम जाहीर झाला आहे. श्रीरामपूर नगरपरिषद प्रभाग क्रमांक 1 ते 17 करीता (दि. 2 डिसेंबर) रोजी मतदान झाले आहे. न्यायालयीन प्रक्रियेमुळे प्रभाग क्र. 3 अ करीता शनिवार (दि. 20) रोजी मतदान झाले. ही मतमोजणी (दि. 21) रोजी सकाळी 10 वाजता ईव्हीएम मशिनद्वारे खोली क्रमांक 6 समोरील मोकळ्या जागेत तहसील कार्यालय मध्यवर्ती प्रशासकीय इमारतीमध्ये होणार आहे.
केवळ अधिकृत ओळखपत्र असलेले उमेदवार व त्यांच्या मतमोजणी प्रतिनिधींना मत मोजणी केंद्रात प्रवेश दिला जाणार आहे. मतमोजणी सुरू होण्यापूर्वी किमान 30 मिनिटे अगोदर प्रतिनिधीनी केंद्रावर उपस्थित राहणे अनिवार्य आहे. प्रत्येक मतमोजणी टेबलसाठी उमेदवाराने नियुक्त केलेला एकच प्रतिनिधी उपस्थित राहणार आहे. मतमोजणी हॉलमध्ये विनाकारण फिरण्यास किंवा गोंधळ घालण्यास मनाई करण्यात आली आहे. प्रतिनिधींनी त्यांना नेमून दिलेल्या जागेवर बसूनच प्रक्रिया पाहून, काळजीपूर्वक आकडेवारी लिहन घ्यायची आहे. मतमोजणी प्रक्रियेत कोणताही अडथळा येणार नाही, याची उमेदवारांनी दक्षता घ्यावी, असे आवाहन करण्यात आले आहे.
कडेकोट पोलिस बंदोबस्त
तहसील कार्यालय परिसरात कडेकोट पोलिस बंदोबस्त तैनात करण्यात आला आहे. मतमोजणी केंद्राच्या 10 मीटर परिसरात अनाधिकृत व्यक्तींना प्रवेश दिला जाणार नाही. मतमोजणी केंद्रात प्रवेशापूर्वी प्रत्येक प्रतिनिधीची कसून तपासणी केली जाणार आहे. याकरीता 1 पोलिस उप अधिक्षक, 2 पोलिस निरीक्षक, 15 सहाय्यक पोलिस निरीक्षक व पोलिस उपनिरीक्षक, 130 पोलिस अंमलदार (पुरुष 115 व महिला 15) 1 आर.सी.पी.व 3 वॉकीटॉकी असा कडक बंदोबस्त तैनात करण्यात आला आहे.
मोबाईल, इलेक्टॉनिक उपकरणांवर बंदी
निवडणूक आयोगाच्या सूचनांनुसार, मतमोजणी केंद्राच्याआत मोबाईल फोन, टॅब, लॅपटॉप, स्मार्ट वॉच किंवा कोणतेही चित्रिकरण करणारे इलेक्ट्रॉनिक उपकरणासह इतर साहित्य नेण्यास सक्त मनाई करण्यात आली आहे. उमेदवारांसह प्रतिनिधींनी मोबाईल केंद्राबाहेर ठेवावेत, अन्यथा शिस्त भंगविषयक कारवाई केली जाईल, असा इशारा देण्यात आला आहे.