श्रीरामपूर: श्रीरामपूर नगरपालिका निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर अनेकांनी निवडणूक जाहीर होण्याअगोदर व नंतर पक्ष प्रवेश केला आहे. त्यामुळे काही पक्षांना त्याचा फायदा होणार असून तर काहींना धक्के बसण्याची शक्यता आहे. या पक्ष प्रवेशाबाबत शहरात पालिका निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर राजकीय चर्चाना उधाण आले आहे. अशा प्रकारचे आऊट गोविंग, इन कमिंग हे अर्ज भरण्याच्या शेवटच्या क्षणापर्यंत सुरु राहणार आहे. (Latest Ahilyanagar News)
पक्ष प्रवेशामुळे अनेकांना आपल्यालाच उमेदवारी मिळणार या दृष्टीने त्यांनी आपापल्या प्रभागात काम सुरू केले आहे. मात्र उमेदवारीबाबत वरिष्ठ काय निर्णय घेतात याकडे सवाँचे लक्ष लागले आहे. २०१६ मध्ये झालेल्या पालिकेच्या निवडणुकीत काँग्रेसने नगराध्यक्षपद गमावले होते. मात्र २२ नगरसेवक जिंकून वर्चस्व मिळविले होते. मात्र काही दिवसांतच २२ नगरसेवकांपैकी १२ नगरसेवकांनी ससाणे यांची साथ सोडून त्यांनी नगराध्यक्षा अनुराधाताई आदिक यांना पाठींबा दिला. यात अंजुम शेख, समिना शेख, ताराचंद रणदिवे, कलीम कुरेशी, शामलिंग शिंदे, हेमलता गुलाटी, राजेश अलघ, प्रकाश ढोकणे, मुक्तार शाह, जयश्री शेळके, निलोफर शेख, सुभाष गांगड यांचा समावेश होता. या सगळ्यांनी अनुराधा आदिक यांच्याबरोबर सात वर्ष काम केले. मागील वर्षापासून यापैकी अंजुम शेसा यांनी ससाणे यांच्याबरोबर राहण्याचा निर्णय घेतला. रविंद्र गुलाटी, हेमलता रविंद्र गुलाटी, राजेश अलप, मुक्तार शाह, कलीम कुरेशी यांनी कानडे यांच्याबरोबर राहण्याचा निर्णय घेतला.
पुढे, विधानसभेनंतर ससाने यांचे निष्ठावंत समजले जाणारे संजय फंड, श्रीनिवास बिहाणी, आशिष धनवटे, संजय गांगड, राजेंद्र आदिक, जयश्री शेळके, मनोज लबडे, शशांक रासकर, कैलास दुबय्या, शामलिंग शिंदे यांच्यासह भाजपाच्या तिकिटावर निवडून आलेल्या भारती कांबळे यांनी काही वर्ष ससाणे यांना साथ दिली होती, त्याही ससाणे म्हणजे काँग्रेसची साथ सोडून विखे यांच्या गळाला लागले. ससाणे यांच्या काळात दोनवेळा आमदार राहिलेले माजी आमदार भाऊसाहेब कांबळे यांनीही ससाने यांच्याशी फारकत घेतली. त्यानंतर त्यांनी उवाठा शिवसेनेत प्रवेश केला होता. विधानसभेच्या निवडणुकीच्यावेळी शिंदे शिवसेनेत प्रवेश करून विधानसभाही लढवली होती आणि तीन क्रमांकाची मते घेतली.
विधानसभा निवडणुकीत दोन क्रमांकाची मते घेणारे सागर बेग यांना राजकीय आधार हवा म्हणून त्यांनी शिंदे शिवसेना पक्षात प्रवेश केला. त्यानंतर काही महिन्यांच्या अंतरावर माजी आमदार भानुदास मुरकुटे यांनी राष्ट्रवादीबरोबर काडीमोड घेतली. त्यामुळे मविआतील काँग्रेसचे ससाणे यांच्या बरोबरचे संबंधही दुरावले. त्यानंतर एकेकाळी ससाणे यांचे निकटवर्तीय म्हणून राहिलेले माजी उपनगराध्यक्ष संजय छल्लारे यांनीही उबाठा शिवसेनेत प्रवेश केला. विधानसभा निवडणुकीनंतर संजय छल्लारे यांनी उबाठा शिवसेनेला जय महाराष्ट्र करत शिंदे शिवसेनेत जाण्याचा निर्णय घेतला.
या पालिका निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर नुकताच काही दिवसांपूर्वी राष्ट्रवादीत अनुराधाताई आदिक यांच्याबरोबर एकनिष्ठेने काम करणारे राजेंद्र पवार, दीपक चरण चव्हाण, प्रणिती चव्हाण, रईस जहागिरदार, राष्ट्रवादी शहर काँग्रेस फादर बॉडीचे शहराध्यक्ष अभिजित लिप्टे, मर्चेंटचे संचालक दत्तात्रय धालपे, योगेश जाधव, निलेश बोरावके यांच्यासह कार्यकर्त्यांनी ससाणे यांना सहकार्य करण्यासाठी कॉंग्रेसमध्ये प्रवेश केला. त्यानंतर आता रवींद्र गुलाटी, हेमलता रविंद्र गुलाटी, राजेश अलघ, गुलशन कंत्रोड, बंटी गुप्ता, नारायणराव डावखर, माजी नगराध्यक्षा इंदुमती डावखर, रोहन डावखर यांच्यासह कार्यकर्त्यांनी मंत्री राधाकृष्ण विखे पा. यांच्या उपस्थितीत भाजपात प्रवेश केला. माजी नगराध्यक्षा इंदुमती डावखर ह्या माजी आ. भानुदास मुरकुटे यांच्या भगिनी आहेत. मुरकुटे यांनी काही महिन्यांपूर्वी शिंदे शिवसेना पक्षात प्रवेश केला आणि आता बहीण, मेहुणे आणि भाचा यांनी भाजपात प्रवेश केला.
परंतु, आता उद्या किंवा परवा काँग्रेसचे काही माजी नगरसेवक हे राष्ट्रवादी काँग्रेस (अजितदादा गट) मध्ये जाणार असल्याचे समजते. त्यात तीन माजी नगरसेवकांचा समावेश आहे. इतर काही प्रमुख कार्यकर्तेही प्रवेश करणार आहेत. यासर्वांच्या आऊट गोविंग, इन कमिंगमुळे पालिकेच्या निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर शहरात चर्चांना उधाण आले आहे. सोमवारी १० तारखेपासून पालिका निवडणुकीसाठी उमेदवारी अर्ज भरण्यास सुरुवात होणार आहे. १७ नोव्हेंबरपर्यंत अर्ज भरण्याची शेवटची मुदत असणार आहे. तोपर्यंत फोडाफोडीचे राजकारण सुरूच राहणार आहे.