

नगर : अतिवृष्टी आणि पूरपरिस्थितीने बाधित झालेल्या शेतकऱ्यांना शासनाच्या वतीने अनुदान वाटपाची प्रक्रिया सुरु असून, आतापर्यंत जिल्ह्यातील 4 लाख 76 हजार 35 बाधित शेतकऱ्यांच्या बँक खात्यावर 516 कोटी 98 लाख 37 हजार रुपये जमा झाले आहेत. या मदतीने बाधित शेतकऱ्यांना किंचित दिलासा मिळाला आहे. शेतकऱ्यांना आता रब्बी बियाणे आणि खते खरेदीसाठी जाहीर झालेल्या अनुदानाची प्रतीक्षा लागली आहे.(Latest Ahilyanagar News)
सप्टेंबर महिन्यातील तिसऱ्या आणि चौथ्या आठवड्यात सातत्याने अतिवृष्टी झाली. या अतिवृष्टीमुळे पूरपरिस्थिती निर्माण होऊन शेतपिके आणि फळबागांचे नुकसान झाले. जिल्हा प्रशासनाने केलेल्या पंचनाम्यात जिल्ह्यातील 6 लाख 25 हजार हेक्टरवरील खरीप पिके आणि फळबागांचे नुकसान झाले. या नुकसानीचा आर्थिक फटका साडेआठ लाख शेतकऱ्यांना बसला आहे. या नुकसानीचा अहवाल शासनाला पाठविण्यात आला होता. त्यानुसार शासनाने जिरायती पिकांसाठी हेक्टर 8 हजार 500 रुपये, बागायती पिकांसाठी 17 हजार तर फळबागांसाठी हेक्टरी 22 हजार 500 रुपये अनुदानाचा निर्णय घेतला. त्यानुसार जिल्ह्यातील बाधित शेतकऱ्यांना अनुदानापोटी 846 कोटींचे अनुदान मंजूर केले होते.
लक्ष्मीपूजनाच्या पूर्वसंध्येला शेतकऱ्यांच्या बँक खात्यावर अनुदान जमा होण्यास प्रारंभ झाला आहे. 7 नोव्हेंबरपर्यंत जिल्ह्यातील 4 लाख 76 हजार 35 शेतकऱ्यांना अनुदान वाटप करण्यात आले आहे. आतापर्यंत 516 कोटी 98 लाख 37 हजार रुपयांचे अनुदान बँक खात्यावर जमा झाले. आतापर्यंत वाटप झालेल्या अनुदानात नेवासा तालुक्यात सर्वाधिक 70 कोटी 77 लाखांचे वाटप झाले. अकोले तालुक्यात अल्प नुकसान झाले. त्यामुळे या तालुक्यात आतापर्यंत सर्वात कमी 35 लाख 88 हजार रुपये 1 हजार 59 शेतकऱ्यांच्या खात्यावर जमा झाले असल्याचे निवासी उपजिल्हाधिकारी दादासाहेब गिते यांनी सांगितले.
नगर : 33270 (3755.57), नेवासा : 57649 (7077.27), श्रीरामपूर : 25492 (2559.34), राहुरी : 41448 (4449.51), कोपरगाव : 30556 (2470.78), राहाता : 29368 (2886.37), संगमनेर : 17297 (1422.87), अकोले : 1059 (35.88), पारनेर : 35417 (3165.75), श्रीगोंदा : 39951 (3959.39), कर्जत : 42998 (5586.22), जामखेड : 31253 (2955.09), पाथर्डी :40490 (4897.90), शेवगाव : 42013 (5846.98).