

नगर तालुका : नगर तालुक्यातील हातवळण येथे 25 ऑक्टोबर रोजी दुपारी 4 च्या सुमारास झालेल्या तरुणाच्या अपहरण प्रकरणात पोलिस तपासात वेगळीच माहिती समोर आली असून तो स्वताच लपून बसला आणि त्याच्या पत्नीने त्याच्या अपहरणाची फिर्याद दिली. त्यामुळे खोटी माहिती सांगून पोलिसांची दिशाभूल केल्या प्रकरणी त्या तरुणासह त्याची पत्नी, वडील, सासू, सासरे यांच्या विरुद्ध नगर तालुका पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.(Latest Ahilyanagar News)
याबाबत अपहरणाच्या गुन्ह्याचे तपासी अधिकारी पोलिस उपनिरीक्षक भरत धुमाळ यांनी फिर्याद दिली आहे. त्यानुसार तुकाराम महादेव यादव, त्याची पत्नी सुमन तुकाराम यादव, वडील महादेव सावळेराव यादव (तिघे रा. हातवळण, ता.नगर), सासरे रामदास उध्दव सोनसळे, सासु सिंधुबाई रामदास सोनसळे (दोघे रा.शेंडी, ता.नगर) यांच्या विरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
यातील सुमन यादव हिने 25 ऑक्टोबर रोजी सायंकाळी नगर तालुका पोलिस ठाण्यात आपले पती तुकाराम महादेव यादव यांचे गणेश कवडे, माऊली पठारे, सुनिल दिलीप पठारे, अक्षय भंडारे (सर्व रा.बनपिंप्री, ता. श्रीगोंदा) यांनी जिवे ठार मारण्याच्या उद्देशाने उचलुन नेवुन अपहरण केले आहे. तसेच सलून दुकानाची तोडफोड केली आहे, अशी फिर्याद दिली होती. त्यावरून पोलिसांनी गुन्हा दाखल केला होता. या गुन्ह्याचा तपास पोलिस उपनिरीक्षक भरत धुमाळ हे करत होते. या तपासादरम्यान त्यांना तुकाराम महादेव यादव याचे अपहरण झालेले नव्हते. तो स्वताच लपून बसला होता. त्याच्या पत्नी, वडील, सासू सासरे यांनी पोलिसांना खोटी माहिती दिली असल्याची माहिती मिळाली.
त्यामुळे आरोपी तुकाराम यादव याचे अपहरण झालेले नसताना त्याची पत्नी सुमन, वडील महादेव, सासरे रामदास व सासु सिंधुबाई यांनी आरोपी महादेव याचेसोबत त्याचे अपहरण झाल्याचा बनाव करुन त्यास लपुन राहण्यास मदत केली व त्याची पत्नी आरोपी सुमन हिने गणेश कवडे, माऊली पठारे, सुनिल दिलीप पठारे, अक्षय भंडारे यांनी पतीचे अपहरण केले,अशी वाढीव हकीगत सांगितली जेणे करुन तपासी अधिकारी यांनी आरोपींना अटक करुन त्याचेवर कठोर कारवाई होवुन त्यांना क्षती पोहचावी व त्याचे नुकसान व्हावे या उद्देशाने खोटी माहीती देवुन वाढीव हकीगतीची फिर्याद दिली असल्याचे फिर्यादीत म्हंटले आहे. पुढील तपास स.पो.नि. प्रल्हाद गिते हे करीत आहेत.