Shrirampur Bandh Protest Pudhari
अहिल्यानगर

Shrirampur Crime: श्रीरामपूर हत्याकांडानंतर संतापाचा उद्रेक; 'बेग टोळी'वर आमदार ओगले यांचा थेट आरोप, मकोकाची मागणी

हॉटेल व्यावसायिक आकाश दुबैया हत्या प्रकरणी सलग दुसऱ्या दिवशी श्रीरामपूर बंद; गुन्हेगारी, अवैध धंदे आणि प्रशासनाच्या भूमिकेवर आंदोलनकर्त्यांचा जोरदार हल्लाबोल

पुढारी वृत्तसेवा

श्रीरामपूर: जेवळ वेळेवर न दिल्याच्या कारणावरून हॉटेल व्यावसायिक आकाश दुबैया यांच्या निर्घृण हत्येनंतर संपूर्ण श्रीरामपूर तालुक्यात संतापाची तीव्र लाट उसळली असून, नागरिक गुंडगिरी आणि गुन्हेगारीविरुद्ध आक्रमक झालेले पाहायला मिळत आहे. या हत्येच्या निषेधार्थ सोमवारी (दि. १३) सलग दुसऱ्या दिवशी श्रीरामपूर शहर आणि परिसर बेमुदत बंद ठेवण्यात आला असून, संपूर्ण बाजारपेठ कडकडीत बंद आहे. गेल्या दोन दिवसांपासून विविध पक्षांचे नेते, कार्यकर्ते आणि व्यापारी गुन्हेगारांचा बंदोबस्त करण्याची मागणी करत असतानाच, बंदच्या दुसऱ्या दिवशी आंदोलनात सहभागी झालेले आमदार हेमंत ओगले यांनी प्रथमच अगदी थेट आरोप केला. श्रीरामपूर शहरात केवळ गुन्हेगारीच वाढली नाही, तर ‘इथे बेग टोळी सक्रिय असून याच टोळीच्या अंडर सर्व काळे धंदे आणि हैदोस सुरू आहे,’ असा थेट उल्लेख करत, प्रशासनाचे वाभाडे काढले.

हॉटेल व्यावसायिकाच्या हत्येनंतर त्याच्या निषेधासाठी सोमवारी सकाळी पुन्हा महात्मा गांधी चौकामध्ये झालेल्या बैठकीला आमदार ओगले, नगराध्यक्ष करण ससाणे, माजी आमदार भानुदास मुरकुटे व भाऊसाहेब कांबळे, माजी खासदार सदाशिव लोखंडे, नगरसेविका वैशाली चव्हाण, रवी पाटील, राजेश अलघ, प्रकाश चित्ते यांच्यासह नागरिक मोठ्या संख्येने उपस्थित होते. या वेळी माध्यमांशी बोलताना ओगले यांचा संताप अनावर झाला. त्यांनी पोलिसांच्या आणि प्रशासनाच्या कार्यपद्धतीवर थेट बोट ठेवले. प्रशासनाला आणि पोलिसांना माहिती आहे की इथे 'बेग टोळी' सक्रिय आहे. या बेग टोळीकडूनच हा सगळा हैदोस चाललेला आहे. हे केवळ स्थानिक पातळीवर नाही, तर मुंबईपासून खाली सर्व वरिष्ठ अधिकाऱ्यांपर्यंत आणि खालच्या पोलिसांपर्यंत सर्वांना ठाऊक आहे. कोणाला नावच पाहिजे असेल तर मी आज जाहीरपणे नाव सांगतोय. या टोळीने श्रीरामपूर शहरात गुन्हेगारीचा कळस गाठला आहे.

आमदार ओगले म्हणाले, की या टोळीने केवळ आकाश दुबैया यांचीच हत्या केली नाही, तर श्रीरामपूरमधील प्रत्येक व्यापारी, प्रत्येक डॉक्टर, प्रत्येक लहान-मोठ्या दुकानदाराला कुठे ना कुठे त्रास दिलेला आहे. महिला आणि मुलींना त्रास दिला जात आहे. ड्रग्स, गुंगीच्या गोळ्या, बिंगो आणि वाळूचे अवैध धंदे चालवून या टोळीने श्रीरामपूरची संपूर्ण भावी पिढी बरबाद करायचे काम सुरू केले आहे. या बेग टोळीचा जो कोणी मुख्य म्होरक्या (आका) असेल, मग तो इथे असो वा बाहेर, त्या सगळ्यांवर तत्काळ 'मकोका' अंतर्गत कारवाई झाली पाहिजे. माजी आमदार भानुदास मुरकुटे आणि यांनी मात्र आंदोलन हे थोडक्या स्वरूपात किंवा आणखी वेगळ्या स्वरूपात केल्यास जनतेला वेठीस धरले जाणार नाही, असे मत मांडले. गोरगरिबांचे हाल होणार नाहीत, श्रीरामपूर बंद मागे घेऊन वेगळ्या मार्गाने आंदोलन करावे, अशी सूचना त्यांनी केली. पोलिसांनी आतापर्यंत या प्रकरणी तीन आरोपींना अटक केली असली तरी सर्व गुन्हेगारांचा बंदोबस्त केल्याशिवाय श्रीरामपूर बंद आंदोलन थांबणार नसल्याचा निर्धार आ. ओगले यांच्यासह सर्वच आंदोलकांनी व्यक्त केला.

आज बेलापूर बंद; ग्रामस्थांचे निवेदन

आकाश दुबैय्या हत्येच्या निषेधार्थ तसेच आरोपींना कठोर शासन व्हावे, गावाची शांतता धोक्यात आणणाऱ्यांचा बंदोबस्त करावा, या मागणीचे निवेदन बेलापूर पोलिस स्टेशनला ग्रामस्थांच्या वतीने देण्यात आले. त्याचबरोबर आज मंगळवारी दि. १४ बेलापूर गाव बंद ठेवण्याचा निर्णय सर्वानुमते घेण्यात आला. बेलापूर पोलिस स्टेशनचे हवालदार बाळासाहेब कोळपे यांनी निवेदन स्वीकारले.

हिंदू गुंडांपासूनच हिंदूंचे रक्षण करण्याची वेळ : प्रकाश चित्ते

शिवसेनेचे नेते प्रकाश चित्ते म्हणाले, की नेहमी हिंदुत्वाच्या नावाखाली राजकारण केले जाते; मात्र आता हिंदू गुंडांपासूनच हिंदू समाजाचे संरक्षण करण्याची वेळ आली आहे. गेल्या दीड-दोन वर्षांत अनेक मुली बेपत्ता झाल्या, ड्रग्सचे मोठे साठे सापडले; मात्र पोलिसांकडून ठोस तपास झाला नाही. गुन्हेगारांना पाठीशी घालणाऱ्यांवरही मकोका लावला पाहिजे.

शहरात टोपीपेक्षा उपरण्याचीच भीती : वैशाली चव्हाण

नगरसेविका वैशाली चव्हाण यावर आक्रमक पवित्रा घेत म्हणाल्या की, शहरात दिवसाआड हाफ मर्डर, मर्डर, घरफोड्या आणि मुली पळवून नेण्याचे प्रकार सुरू आहेत. महिलांवर अत्याचार होत असूनही लोक भीतीने पुढे येत नाहीत. पोलिसांकडे गेल्यावर दखल घेतली जात नाही. आता शहरात टोपीपेक्षा उपरण्याचीच भीती वाटू लागली आहे, अशी बिकट परिस्थिती निर्माण झाली आहे.

राजकीय शक्तीच जबाबदार : भाऊसाहेब कांबळे

माजी आमदार भाऊसाहेब कांबळे यांनीही प्रशासनावर आणि छुप्या राजकीय पाठिंब्यावर टीका केली. ते म्हणाले, की या गुंडगिरीला प्रशासन आणि छुपी राजकीय शक्ती जबाबदार आहे. अशा गुंडांना पोसल्यामुळेच त्यांचे धाडस वाढले आहे. जोपर्यंत यावर ठोस निर्णय होत नाही, तोपर्यंत आमचे आंदोलन सुरूच राहील.

दोन नंबरच्या धंद्यांचे ग्रहण : सदाशिव लोखंडे

पोलिसांनी आणि प्रशासनाने वेळीच गांभीर्याने कारवाई केली असती, तर हे अवैध धंदे बंद झाले असते. आता सर्व राजकीय पक्षांनी हेवेदावे बाजूला ठेवून एकत्र येण्याची आणि या दादागिरीचा कायमचा अंत करण्याची गरज आहे.

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

SCROLL FOR NEXT