

शेवगाव: केंद्र व राज्य निवडणूक आयोगाच्या निर्देशानुसार सुरू करण्यात आलेला मतदार विशेष सखोल पुर्निरीक्षण कार्यक्रम शेवगाव तालुक्यात युद्धपातळीवर राबविण्यात येत आहे. प्रत्येक पात्र मतदाराची माहिती अचूक व अद्ययावत करण्यासाठी महसूल प्रशासनाने संपूर्ण यंत्रणा कामाला लावली आहे. तालुक्यातील सर्व ११३ गावांमधील १९९ मतदान केंद्रांवर केंद्रस्तरीय अधिकारी (बीएलओ) घरभेटी देत असून, मतदारयादीतील नावांची पडताळणी, दुरुस्ती, नव्या मतदारांची नोंदणी, तसेच मृत अथवा स्थलांतरित मतदारांची माहिती संकलित करण्याचे काम वेगाने सुरू असल्याची माहिती तहसीलदार आकाश दहाडदे यांनी दिली.
तहसीलदार दहाडदे म्हणाले, शेवगाव हा विस्ताराने मोठा तालुका असून येथे एकूण २ लाख १२ हजार ३१९ मतदार नोंदणीकृत आहेत. त्यामध्ये १ लाख ९ हजार २११ पुरुष, १ लाख ३ हजार १०२ महिला आणि ६ तृतीयपंथी मतदारांचा समावेश आहे. याशिवाय तालुक्यात ८५ वर्षांवरील ५ हजार ९८९ ज्येष्ठ मतदार असून, त्यांच्या माहितीचीही विशेष काळजीपूर्वक पडताळणी केली जात आहे. या मोहिमेच्या प्रभावी अंमलबजावणीसाठी तालुक्यात १८ सहायक मतदार नोंदणी अधिकारी, २२ सुपरवायझर, १९९ केंद्रस्तरीय अधिकारी (बीएलओ) आणि १९९ मदतनीस यांची नियुक्ती करण्यात आली आहे.
हे अधिकारी व कर्मचारी निवडणूक आयोगाने दिलेल्या मार्गदर्शक सूचनांनुसार प्रत्येक मतदान केंद्रावर प्रत्यक्ष भेटी देऊन मतदारांची माहिती अद्ययावत करण्याचे काम करत आहेत. आवश्यक तेथे नावातील दुरुस्ती, पत्त्यातील बदल, नव्या मतदारांची नोंदणी तसेच अन्य आवश्यक सुधारणा केल्या जात आहेत.
मतदारयादी अचूक आणि त्रुटीमुक्त राहावी, आगामी निवडणुकांमध्ये कोणताही पात्र मतदार मतदानाच्या हक्कापासून वंचित राहू नये, यासाठी ही विशेष मोहीम राबविण्यात येत असल्याचे तहसीलदार दहाडदे यांनी सांगितले. नागरिकांनी घरभेटीदरम्यान येणाऱ्या बीएलओंना आवश्यक कागदपत्रे उपलब्ध करून द्यावीत, तसेच मतदार यादीतील कोणतीही त्रुटी आढळल्यास ती तातडीने निदर्शनास आणून द्यावी, असे आवाहन त्यांनी केले.
मतदारयादी होणार अचूक
तालुक्यातील सर्व १९९ मतदान केंद्रांवर हे काम जोमाने सुरू असून, २९ जुलैच्या मुदतीपूर्वी सर्व प्रक्रिया पूर्ण करण्यासाठी महसूल अधिकारी व कर्मचारी युद्धपातळीवर कार्यरत आहेत. प्रशासनाच्या या मोहिमेमुळे मतदार यादी अधिक अचूक, विश्वासार्ह आणि अद्ययावत होण्यास मदत होणार आहे. आगामी निवडणूक प्रक्रिया अधिक पारदर्शक व सुकर होणार आहे.