Death Pudhari
अहिल्यानगर

Shrigonda Woman Robbery: चाकूचा धाक दाखवून लूट; घरी परतताना अपघातात महिलेचा दुर्दैवी मृत्यू

श्रीगोंदा तालुक्यातील ढवळगावच्या महिलेची शिरूरजवळ मालमोटारीच्या धडकेत मृत्यू; लुटीतील तिघांचा पोलिसांकडून शोध सुरू

पुढारी वृत्तसेवा

श्रीगोंदा: अज्ञातांनी चाकूचा धाक दाखवत लूट केली. त्यानंतर मदतीसाठी धावलेल्या ओळखीच्या व्यक्तीसोबत मोटारसायकलरून घरी निघाली, पण वाटेत तिला काळाने घाला घातला. शिरूरजवळ मालमोटारीने धडक दिल्याने श्रीगोंदा तालुक्यातील ढवळगावाच्या महिलेचा मृत्यू झाला. शनिवारी (दि.२७) सायंकाळी ही दुर्देवी घटना घडली.

संगीता परमेश्वर शिंदे (वय ५०) असे मृत महिलेचे नाव आहे. त्या श्रीगोंदा तालुक्यातील ढवळगावच्या रहिवासी आहेत. रांजणगाव एमआयडीसीत भंगार गोळा करून त्या कुटुंबाचा उदरनिर्वाह करतात. कारेगाव परिसरात दिवसभर भंगार गोळा केल्यानंतर त्या घरी निघाल्या. एका चारचाकी वाहनाला हात दाखवत त्यातून त्या ढवळगावकडे येत होत्या. चारचाकीतील तिघांनी त्यांना चाकूचा धाक दाखवत लुटले. अंगावरील सोन्याचे दागिने व रोकड काढून घेत शिरूरमध्ये त्यांना वाहनातून उतरून देण्यात आले.

त्याही परिस्थितीत शिंदे यांनी धीर धरत मोबाईलवरून कुटुंबियाशी संपर्क साधत घडलेली घटना सांगितली. रस्त्याकडेला रडत बसलेल्या शिंदे यांची एका व्यक्तीने आस्थेने विचारपूस केली. ती व्यक्ती शिंदे यांच्या ओळखीची निघाली. त्या व्यक्तीने स्वत:च्या मोटारसायकलवरून शिंदे यांनी त्यांच्या घरी सोडण्याचा निर्णय घेतला. दोघेही मोटारसायकलवरून ढवळगावकडे निघाले.

मोटारसायकल काही अंतरावर पुढे जाताच पाठीमागून येणाऱ्या मालमोटारीने (एमएच.२०,सीटी ९०९१) मोटारसायकलला जोराची धडक दिली. या धडकेत दोघेही रस्त्यावर पडले. दुर्देवाने मालमोटारीचे चाक डोक्यावरून गेल्याने संगीता शिंदे यांचा जागीच मृत्यू झाला. स्थानिक नागरिकांनी तातडीने शिंदे यांना शिरूरच्या ग्रामीण रूग्णालयात दाखल केले, पण तपासणीनंतर वैद्यकीय अधिकाऱ्यांनी त्यांना मृत घोषित केले. शिरूर पोलिसांनी मालमोटार ताब्यात घेतली असून लूट करणाऱ्या तिघांचा शोध सुरू आहे.

संगीता शिंदे या भटक्या-विमुक्त समाजातील असून त्यांची कौंटुंबिक परिस्थिती हलाकीची आहे. त्यांच्या मृत्युने कुटुंबावर संकट कोसळले आहे. शासनाने कुटुंबाला आर्थिक मदत द्यावी तसेच संपूर्ण प्रकरणाचा निष्पक्ष व सखोल तपास करून न्याय मिळवून द्यावा, अशी मागणी नागरिकांनी केली आहे.

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

SCROLL FOR NEXT