Shrigonda Sugarcane Pyrilla Pest Pudhari
अहिल्यानगर

Shrigonda Sugarcane Pyrilla Pest: श्रीगोंद्यात उसावर ‘पायरी’चा कहर; हजारो एकर पीक संकटात!

पानांवर काळी बुरशी, ७० ते ८० टक्के प्रकाशसंश्लेषण ठप्प; ड्रोन फवारणी महागडी, कृषी विभागाच्या उदासीनतेवर शेतकऱ्यांचा संताप

पुढारी वृत्तसेवा

अमोल बी गव्हाणे

श्रीगोंदा: महाराष्ट्रातील ऊस पट्ट्यात अग्रेसर समजल्या जाणाऱ्या श्रीगोंदा तालुक्यावर यंदा निसर्गासोबतच किडीचेही मोठे संकट कोसळले आहे. गेल्या दोन वर्षांपासून लोकरी मावा आणि हुमणी अळीने हैराण झालेल्या शेतकऱ्यांपुढे आता पायरीला (Pyrilla) अर्थात उसावरील तुडतुडे या किडीचे नवे आव्हान उभे ठाकले आहे. भीमा नदीपट्ट्यात या किडीने मोठे नुकसान केले आहे.

पावसाचे कमी प्रमाण आणि गेल्या महिनाभरापासून असलेले सततचे ढगाळ, दमट वातावरण या किडीच्या वाढीस पोषक ठरले असून तालुक्यातील बेलवंडी, पारगाव, कोळगाव, आढळगाव, कौठा, मांडवगण, हंगेवाडी परिसरातील हजारो एकरावरील ऊस पिकावर या किडीने अक्षरशः कब्जा केला आहे.

उसाची पाने वरून पाहिली तर काळ्या राखेने लिपल्यासारखी दिसतात. पानाच्या खालच्या बाजूला हजारोंच्या संख्येने पांढरट-पिवळसर पिले चिकटलेली असतात. ही कीड पानातील रस शोषून घेते आणि त्या बदल्यात चिकट, मधासारखा पदार्थ (हनी ड्यू) टाकते. या चिकट पदार्थावरच कॅपनोडियम नावाची काळी बुरशी वाढते. ही बुरशी संपूर्ण पान व्यापून टाकते. परिणामी पानांची अन्न तयार करण्याची (प्रकाश संश्लेषण) प्रक्रिया ७० ते ८० टक्क्यांनी थांबते. उसाची वाढ खुंटते, कांड्या बारीक राहतात. रसातील साखरेचे प्रमाण (रिकव्हरी) २ ते ३ टक्क्यांनी घटते.

श्रीगोंदा तालुक्यातील ऊस शेतीवर या किडीचा प्रादुर्भाव मोठ्या प्रमाणात झाल्याने नागवडे, गौरी, अंबालिका, दौंड शुगर, भीमाशंकर, श्री व्यंकटेश या साखर कारखान्यांना यंदा ऊसटंचाईचा आणि कमी रिकव्हरीचा मोठा फटका बसण्याची शक्यता वर्तवली जात आहे.

यंदा साखर कारखान्यांचा गळीत हंगाम १५ ऑक्टोबरच्या आसपास सुरू होण्याची शक्यता आहे. त्या पार्श्वभूमीवर शएतात असलेल्या उसाची उंची सध्या १० ते १४ फुटांपर्यंत गेली आहे. अशा उंच उसात माणसाला शिरून हातपंपाने फवारणी करणे अशक्य आहे.

या किडीसाठी ड्रोन फवारणी हाच एकमेव प्रभावी उपाय आहे. मात्र तालुक्यात शासकीय ड्रोनची संख्या बोटावर मोजण्याइतकी आहे. खासगी ड्रोनचे भाडे प्रतिएकर १२०० ते १५०० रुपये सांगितले जात आहे, जे परवडणारे नाही. क्लोरोपायरीफॉस २० टक्के आणि इतर शिफारसीत कीटकनाशके वेळेवर उपलब्ध होत नाहीत. त्यामुळे डोळ्यादेखत पीक जळत असताना हतबलपणे पाहण्याशिवाय पर्याय नाही, अशी भावना शेतकऱ्यांची आहे.

कृषी विभाग फक्त सोशल मीडियावरच सक्रिय?

सर्वात संतापजनक बाब म्हणजे कृषी विभागाची भूमिका. शेतकऱ्यांचा आरोप आहे की, तालुका कृषी अधिकारी आणि कृषी सहायक गेल्या महिनाभरात एकदाही बांधावर आलेले नाहीत. त्यांचे काम फक्त व्हॉट्सॲप ग्रुपवर ‘काळजी घ्या’ असा मेसेज टाकण्यापुरतेच मर्यादित राहिले आहे.

कृषी अधिकाऱ्यांचा सल्ला...

शेत स्वच्छ ठेवा, तण काढून टाका. कृषी तज्ज्ञांच्या सल्ल्याशिवाय कोणतेही औषध वापरू नका. ड्रोनद्वारे क्लोरोपायरीफॉस २० टक्के EC @ ३०० मिलीलिटर प्रतिएकर किंवा इमिडाक्लोप्रिडची फवारणी करा. फवारणी सकाळी किंवा संध्याकाळी करा, असा सल्ला श्रीगोंद्याचे तालुका कृषी अधिकारी संदीप बोधगे यांनी शेतकऱ्यांना दिला आहे.

पायरिला किडीची लक्षणे कशी ओळखाल?

  • पानाच्या खालच्या बाजूला पांढुरके, पिवळसर तुडतुडे आणि त्यांची पिले दिसतात.

  • पानावर चिकट, तेलकट डाग पडतो.

  • त्या चिकट पदार्थावर काळी बुरशी येते, हाताला काळे लागते.

  • दुरून पाहिल्यास संपूर्ण शेत काळे-करडे दिसते.

पंचनामे करण्याचे आदेश देऊ : कृषिमंत्री भरणे

दरम्यान, याबाबत ‘पुढारी’ने राज्याचे कृषिमंत्री दत्तात्रय भरणे यांच्याशी दूरध्वनीवरून संपर्क साधत वस्तुस्थिती निदर्शनास आणून दिली. त्यावर मंत्री भरणे म्हणाले, की उसावरील किडीचे संकट भयानक आहे. याची मी गंभीर दखल घेतली आहे. मी स्वतः कृषी आयुक्तांना आदेश देऊन उद्यापासून तालुक्यातील प्रत्येक कृषी अधिकारी उसाच्या बांधावर दिसला पाहिजे, अशा सूचना दिल्या जातील. ज्या ठिकाणी मोठे नुकसान झाले आहे, तेथे तत्काळ पंचनामे करण्यास सांगितले जाईल.

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

SCROLL FOR NEXT