अमोल बी. गव्हाणे
श्रीगोंदा : श्रीगोंदा नगरपालिका निवडणुकीचा प्रचार आता शिगेला पोहोचला असून, एकमेकांच्या विरोधात आरोप-प्रत्यारोपाने शहरातील वातावरण ढवळून निघाले आहे. नगरपालिका निवडणूक चौरंगी होत आहे. मतांच्या गोळाबेरजेत कोणाची उमेदवारी मारक ठरते, कोणाची उमेदवारी पथ्यावर पडते, यावर तर्क-वितर्क लढवले जात आहेत.
आमदार विक्रम पाचपुते हे गेल्या महिनाभरापासून श्रीगोंदा शहरात लक्ष ठेवून आहेत. नगराध्यक्षपदाच्या उमेदवारीबाबत त्यांनी केलेला सर्वे जिल्ह्यात चर्चेत आला. चाणक्यनीती वापरून त्यांनी सुनीता खेतमाळीस यांच्या नावांवर शिक्कामोर्तब केले. तत्पूर्वी नगराध्यक्षपदासाठी शिवसेनेकडून शुभांगी पोटे, राष्ट्रवादीकडून ज्योती खेडकर, तर महाविकास आघाडीकडून गौरी भोस यांची उमेदवारी झाली.
नगरपालिका निवडणुकीच्या सुरुवातीलाच राष्ट्रवादीकडून शुभांगी पोटे यांची उमेदवारी होईल, अशी शक्यता वर्तवली जात होती. मात्र, नेत्यांमध्ये एकमत न झाल्याने त्यांनी अन्य पर्याय स्वीकारला. पोटे यांना रोखण्यासाठी ज्येष्ठ नेते बाबासाहेब भोस यांनी निर्णायक भूमिका घेतली. अर्थात निवडणुकीच्या तोंडावर त्यांचा हा निर्णय असल्याने त्यांची ही भूमिका शहरवासियांना आवडली का? हा खरा प्रश्न आहे. भोस यांनी महाविकास आघाडी म्हणून भूमिका घेतल्याने माजी आमदार राहुल जगताप यांनी राजकीय खेळी करीत ज्योती खेडकर यांची उमेदवारी पुढे आणली. महाविकास आघाडीची भोस यांनी उमेदवारी करावी असे आग्रह करणारे शिवसेनेचे नेते साजन पाचपुते हे प्रचार यंत्रणेत का दिसत नाहीत, असा सवाल आता उपस्थित केला जात आहे. दुसरीकडे राष्ट्रवादी काँग्रेस अजित पवार गटाच्या नेत्यांनी यावेळी थांबा आणि पहाची भूमिका घेतली असल्याचे दिसून येते.
निवडणूक मध्यावधीत येऊन ठेपली आहे. आमदार पाचपुते यांनी प्रचारसभेत माजी नगराध्यक्ष मनोहर पोटे यांच्या कामाचा समाचार घेतला, तर मनोहर पोटे यांनीही त्यास प्रत्युत्तर दिले आहे. कॉर्नर सभांमधून एकमेकांवर आरोप-प्रत्यारोप केले जात आहेत. ही निवडणूक चौरंगी का झाली, याची कारणे कालांतराने पुढे येतीलच. मात्र, आताच्या परिस्थितीत राजकारणात डाव- प्रतिडाव खेळून विरोधकांना नामोहरम करायचे असते, याचा प्रत्यय या निवडणुकीत येतो आहे. लढत चौरंगी होत असल्याने साहजिकच मतांचे विभाजन होणार आहे. मागील निवडणुकीत सोबत असणारे नेते या निवडणुकीत एकमेकांच्या विरोधात आहेत अशा सगळ्या गोंधळाच्या परिस्थितीमध्ये मतदान करताना मतदाराना सावधगिरी बाळगावी लागणार आहे.
निवडणुकीच्या तोंडावर अनेकांनी पक्षांतर केले आहे. लोकांच्यात असणारे कार्यकर्ते चारही पॅनल मध्ये असल्याचे दिसते.
या निवडणुकीत चारही पॅनलमध्ये महिलाना उमेदवारी करण्याची संधी मिळाली आहे. परिणामी प्रचारादरम्यान महिलांचा सक्रिय सहभाग असल्याचे दिसून येते. नगराध्यक्षपद सर्वसाधारण जागेसाठी असताना चारही पक्षांनी महिला उमेदवार उभा केल्या . अर्थात ही भूमिका स्वागतार्ह असली तरी नेत्यांनी यातून नेमके कोणते राजकारण साध्य केले, हे मात्र समजायला तयार नाही.
श्रीगोंदा नगरपालिकेसाठी असणारे मतदान हे शहरासह वाड्या- वस्त्यांवर विखुरले आहे. इतर नगरपालिकांच्या तुलनेत श्रीगोंदा नगरपालिकेचे मतदान कमी आहे. मतदान कमी असले तरी शहराचे क्षेत्रफळ मोठे आहे. उमेदवारांना प्रचारादरम्यान चांगलीच कसरत करावी लागत आहे.