Mahayuti Split Pudhari
अहिल्यानगर

Mahayuti Split: श्रीगोंद्यात महायुतीचा महाविस्कोट! भाजपकडून दोन-दोन उमेदवार रिंगणात

इंद्रायणी पाचपुते vs सुनीता खेतमाळीस—एनसीपी, शिंदे गटही स्वतंत्र; चौरंगी लढतीत राजकीय समीकरणे कोलमडली

पुढारी वृत्तसेवा

अमोल गव्हाणे

श्रीगोंदा नगरपालिकेची निवडणूक चौरंगी होत असून, भाजपकडून इंद्रायणी पाचपुते, सुनीता खेतमाळीस, राष्ट्रवादी काँग्रेसकडून (अजित पवार गट) ज्योती खेडकर, शिवसेना (शिंदे गट) कडून शुभांगी पोटे यांचे नगराध्यक्षपदासाठी उमेदवारी अर्ज दाखल झाले आहेत. महायुतीचे घटक पक्ष असलेले हे तिन्ही हे एकमेकांच्या विरोधात लढणार आहेत. महाविकास आघाडीचे घटक पक्ष एकसंध राहिले असून , महाविकास आघाडीकडून गौरी गणेश भोस यांचा एकमेव अर्ज दाखल झाला.

श्रीगोंदा नगरपालिका निवडणुकीत चौरंगी लढत होणार, अशी चर्चा होती. निवडणुकीची रणधुमाळी सुरू झाल्यानंतर चर्चा, अनेक बैठका पार पडल्या. अगदी उमेदवारी अर्ज दाखल करण्याच्या शेवटच्या टप्प्यात ही पार पडली. बाबासाहेब भोस हे आपल्या भूमिकेवर ठाम राहिल्याने ही बैठक निष्प्रभ ठरली. भाजपवगळता इतर पक्षाच्या नेत्यांनी उमेदवारांची जुळवाजुळव करत त्यांना कामाला लागण्याच्या सूचना केल्या.

सोमवारी (दि. 17) दुपारपर्यंत भाजप, राष्ट्रवादी काँग्रेस (अजित पवार गट), शिंदे सेना एकत्र येणार असल्याची चर्चा रंगली होती मात्र काही वेळानंतर ही चर्चा फक्त चर्चाच असल्याचे स्पष्ट झाले. राज्यपातळीवर एकत्र काम करणाऱ्या तिन्ही पक्षांच्या नेत्यांनी ही निवडणूक प्रतिष्ठेची केली आहे. विशेषतः आमदार विक्रम पाचपुते यांना रोखण्यासाठी इतर दोन्ही पक्षांच्या नेत्यांनी एकत्रित व्यूहरचना आखली असल्याचे बोलले जात आहे.

शुभांगी मनोहर पोटे यांच्या नावाला विरोध करून स्वतःच्या सूनबाई गौरी गणेश भोस यांना निवडणुकीच्या रिंगणात उतरवून बाबासाहेब भोस यांनी ही निवडणूक प्रतिष्ठेची केली आहे. ही निवडणूक भोस यांच्या राजकीय प्रवासातील महत्वपूर्ण असणार आहे..ते या निवडणुकीत काय किमया करतात, याकडे आता लक्ष लागले आहे. निवडणूक प्रक्रिया सुरू झाल्यापासून भाजपने अत्यंत गुप्तता बाळगून उमेदवारी कुणाला द्यायची यावर निर्णय घेतला. नगराध्यक्षपदाचा उमेदवार कोण यावर अनेक दिवस खलबते सुरू होती. जनतेचा कौल कुणाला हे जाणून घेत नगराध्यक्षपदाची उमेदवारी दिली जाईल, असे भाजपकडून स्पष्ट करण्यात आले. आज शेवटच्या क्षणी सुनीता खेतमाळीस आणि इंद्रायणी पाचपुते या दोन महिला उमेदवारांचे नगराध्यक्षपदासाठी अर्ज दाखल करण्यात आले. सुनीता शिंदे यांचे नाव ऐनवेळी मागे पडले. भाजपने ऐनवेळी धक्कातंत्र वापरल्याने इच्छुकांची उमेदवारी नाकारली गेली. आता ते या निवडणुकीत पक्षाचे काम करतात का, हे पहावे लागणार आहे.

इंद्रायणी पाचपुते उमेदवार, आ.पाचपुतेंची खेळी

श्रीगोंदा नगरपालिका निवडणुकीत भाजपचा नगराध्यक्षपदाचा उमेदवार कोण, यावर अनेक दिवस चर्चा झाली. सुनीता खेतमाळीस आणि इंद्रायणी पाचपुते यांची नावे चर्चेत होती. भाजपने सुनीता खेतमाळीस यांच्या नावावर एकमत केले असले तरी दबाव तंत्राचा भाग म्हणून इंद्रायणी पाचपुते यांचा उमेदवारी अर्ज दाखल केला असल्याचे बोलले जात आहे.

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

SCROLL FOR NEXT