Tobacco Pudhari
अहिल्यानगर

Shrigonda Gutkha Seizure: श्रीगोंद्यात लाखोंचा गुटखा जप्त; पोलिस कोड असलेल्या गोण्यांमुळे खळबळ

स्थानिक गुन्हे शाखेच्या छाप्यात सुगंधी गुटखा जप्त; गोण्यांवरील पोलिस सांकेतिक क्रमांकामुळे प्रकरण संशयाच्या भोवऱ्यात

पुढारी वृत्तसेवा

श्रीगोंदा: स्थानिक गुन्हे शाखेने आज श्रीगोंदा शहरातील पेडगाव रस्ता परिसरातील एका ठिकाणावर छापा टाकून वेगवेगळ्या कंपन्यांचा लाखो रुपयांचा सुगंधी गुटखा जप्त करण्यात आला. ज्या गोण्यांमध्ये गुटखा साठवून ठेवण्यात आला होता, त्यावर पोलिस खात्याशी निगडित सांकेतिक क्रमांक आढळून आला आहे.

हा गुटखा यापूर्वीच्या कारवाईत जप्त करण्यात आला होता का? मग तो बाहेर गेला कसा? असे सवाल उपस्थित केले जात आहेत. एकच मुद्देमाल दोनदा जप्त करण्यात आल्याच्या चर्चेने पोलिस खात्यात खळबळ उडाली आहे.जिल्हा पोलिस अधीक्षक मुम्मुका सुदर्शन यांनी सूत्रे हातात घेतल्यानंतर जिल्हाभरात अवैध धंद्यांविरुद्ध कारवाई हाती घेतली आहे.

आज सायंकाळच्या सुमारास स्थानिक गुन्हे शाखेच्या पथकाने शहरातील पेडगाव रस्ता परिसरातील एका ठिकाणावर छापा टाकला. तेथे वेगवेगळ्या कंपन्यांचा सुगंधी गुटखा आढळून आला. या कारवाईतील सगळ्यात गंभीर बाब म्हणजे ज्या गोण्यांमध्ये गुटखा आढळून आला, त्या गोण्यांवर पोलिस खात्याचा सांकेतिक क्रमांक आढळून आला. सी आर ४६३/२६ असा तो क्रमांक आहे. हा सी आर क्रमांक नेमका कोणत्या पोलिस ठाण्यातील आहे, याचीही चौकशी करणे गरजेचे आहे.

यापूर्वी करण्यात आलेल्या कारवाईतील हा गुटखा असेल तर तो पुन्हा गुटखा विक्रेत्याकडे गेला कसा? हा मुद्देमाल त्या विक्रेत्याकडे कोणी दिला? यामध्ये नेमके कोण कोण सहभागी आहेत? असे एक न्‌ अनेक प्रश्न यानिमित्ताने उपस्थित झाले आहेत. याबाबत अधिक माहिती घेण्यासाठी पोलिस निरीक्षक संजय ठेंगे यांच्याशी संपर्क साधण्याचा प्रयत्न केला असता त्यांनी फोन उचलला नाही.

चौकशी करून दोषींवर कारवाई करणारया संपूर्ण प्रकरणाची चौकशी करून जे कोणी दोषी आढळतील त्यांच्यावर निश्चित कारवाई केली जाईल.
मुम्मुका सुदर्शन, पोलिस अधीक्षक

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

SCROLL FOR NEXT