Mula Dam Water Level: मुळा धरणात केवळ ११ टक्के पाणी; राहुरीत पाणीसंकट गंभीर

पिण्याचे पाणी व खरीप हंगाम धोक्यात; वरुणराजाच्या आगमनाकडे सर्वांचे लक्ष
Mula Dam
Mula DamPudhari
Published on
Updated on

राहुरी: मुळा धरणातील पाणीसाठा घसरला असून सध्या धरणात केवळ ११ टक्के उपयुक्त पाणी शिल्लक राहिले आहे. जून महिना अर्धा संपत आला तरी धरणाच्या पाणलोट क्षेत्रात अपेक्षित पाऊस न झाल्याने जलसाठ्यात वाढ होण्याऐवजी घटच होत आहे. परिणामी, प्रशासनासमोर पिण्याच्या पाण्याचे नियोजन आणि शेतकऱ्यांसमोर खरीप हंगामाचे भवितव्य, असा दुहेरी प्रश्न उभा आहे.

Mula Dam
Farm Road Encroachment: शेत व पाणंद रस्त्यांवरील अतिक्रमण हटवा; जिल्हाधिकाऱ्यांचे कडक आदेश

२६ हजार दलघफूट साठवण क्षमता असलेल्या मुळा धरणात सध्या एकूण ६ हजार ९५२ दलघफूट पाणी शिल्लक आहे. यामधील ४ हजार ५०० दलघफूट मृतसाठा वगळल्यानंतर प्रत्यक्ष वापरासाठी उपलब्ध असलेला उपयुक्त साठा केवळ २ हजार ४५२ दलघफूट इतकाच उरला आहे. पाटबंधारे विभागाच्या कार्यकारी अभियंता सायली पाटील यांच्या मार्गदर्शनात उपयुक्त पाणी साठ्याचे काटेकोर नियोजन सुरू केले आहे. पिण्याच्या पाण्याला सर्वोच्च प्राधान्य देत ऑगस्ट महिन्यापर्यंत पाणी उपलब्ध राहील, अशा पद्धतीने जलव्यवस्थापन केले जात आहे.

Mula Dam
Rahuri Sand Mining: दरडगाव परिसरात बिनधास्त वाळू उपसा; तक्रारीनंतरही प्रशासनाची टोलवाटोलवी?

सध्या मुळा धरणातून डाव्या कालव्यातून ३१५ क्यूसेक, तर उजव्या कालव्यातून १ हजार ३०० क्यूसेक वेगाने सिंचनासाठी पाणी सोडले जात आहे. उन्हाळी हंगामातील शेवटच्या आवर्तनात डाव्या कालव्यातून ५३९ दलघफूट, तर उजव्या कालव्यातून तब्बल ५ हजार ६७७ दलघफूट पाणी खर्च झाले आहे. शिल्लक साठा झपाट्याने कमी होत असल्याने येत्या काही दिवसांत दोन्ही कालव्यांचा प्रवाह बंदचा निर्णय घ्यावा लागू शकतो, अशी चर्चा पाटबंधारे वर्तुळात सुरू आहे.

Mula Dam
Shevgaon Tender Controversy: शेवगाव पालिकेच्या टेंडर प्रक्रियेत हस्तक्षेपाचा आरोप; ठेकेदाराची एसपींकडे धाव

राहुरी तालुक्यातील जिरायती भागाला हिरवाई देणारा डावा कालवा सुमारे १७.६० किलोमीटर लांबीचा असून त्याद्वारे १० हजार १२१ हेक्टर क्षेत्राला सिंचनाचा लाभ मिळतो. तर ५१.८० किलोमीटर लांबीचा उजवा कालवा राहुरी, नेवासा, पाथर्डी आणि शेवगाव या चार तालुक्यातील सुमारे ७० हजार ६८९ हेक्टर क्षेत्राला जीवनदान देतो. त्यामुळे मुळा धरणातील प्रत्येक थेंब या भागातील शेती, पशुपालन, उद्योग आणि ग्रामीण अर्थव्यवस्थेसाठी महत्त्वाचा ठरतो.

Mula Dam
Shrirampur Hospital Death: प्रसूतीनंतर महिलेचा मृत्यू; संतप्त नातेवाइकांचे रुग्णालयात आंदोलन

दरम्यान, जलसंपदा मंत्री तथा पालकमंत्री राधाकृष्ण विखे पाटील यांनी नुकतीच मुळा धरणातील गाळ काढून धरणाची साठवण क्षमता सुमारे ३ हजार दलघफूटांनी वाढविण्याची घोषणा केली आहे. हा निर्णय भविष्यासाठी निश्चितच महत्त्वाचा असला तरी प्रत्यक्ष कामाला गती कधी मिळणार आणि वाढीव क्षमता नेमकी केव्हा उपलब्ध होणार, याकडे शेतकरी आणि नागरिकांचे लक्ष लागले आहे.

नजरा आकाशाकडे

धरणातील पाणी दिवसेंदिवस कमी होत असताना शेतकरी, व्यापारी, पशुपालक आणि सामान्य नागरिक सर्वांच्याच नजरा आकाशाकडे लागल्या आहेत. वरुणराजाच्या दमदार आगमनाशिवाय या संकटातून मार्ग निघणे कठीण असल्याची भावना सर्वत्र व्यक्त होत आहे.

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

logo
Pudhari News
pudhari.news