

कर्जत: तालुक्यातील दूरगाव तलावात पिण्यासाठी राखीव ठेवलेल्या पाण्याची राजरोसपणे चोरी सुरू असल्याचा गंभीर आरोप शेतकरी व ग्रामस्थांकडून करण्यात येत आहे. महावितरण कंपनीच्या काही अधिकाऱ्यांच्या कथित कृपाशीर्वादामुळे तलावातून दररोज हजारो लिटर पाण्याचा बेकायदेशीर उपसा होत असल्याने आगामी काळात परिसरातील गावांवर व टँकरद्वारे पाणीपुरवठा होणाऱ्या भागांवर भीषण पाणीटंचाईचे संकट ओढवण्याची शक्यता व्यक्त होत आहे. दोन महिन्यांहून अधिक काळ उलटूनही समाधानकारक पाऊस झालेला नसल्याने शेतकरी आधीच चिंतेत आहेत. अशा परिस्थितीत पिण्याच्या पाण्यासाठी राखीव ठेवलेल्या साठ्यावरच डल्ला मारला जात असल्याने नागरिकांमध्ये संतापाची लाट पसरली आहे.
पिण्यासाठी सोडलेले पाणी धोक्यात
कुकडी प्रकल्पातून नुकतेच दूरगाव तलावात केवळ पिण्यासाठी आवर्तन सोडण्यात आले होते. महसूल प्रशासनाने हा साठा पिण्यासाठी राखीव ठेवला असून काही गावांच्या शासकीय टँकरसाठी याच तलावातील पाण्याचा वापर केला जात आहे. मात्र, तलावातून मोठ्या प्रमाणावर अनधिकृतपणे पाणी उपसले जात असल्याचा आरोप होत आहे.
बेकायदेशीर वीजपंपांद्वारे उपसा
तलावाच्या पाण्यात थेट वीजपंप सोडून दररोज हजारो लिटर पाणी उपसले जात असल्याचे चित्र समोर आले आहे. विशेष म्हणजे या भागात मोठ्या प्रमाणावर वीजपंप व जनित्रांचा वापर होत असताना महावितरण प्रशासनाकडून कोणतीही प्रभावी कारवाई होत नसल्याने संशय अधिक गडद झाला आहे. वीजपंपांबरोबरच होज पाईपचा वापर करूनही मोठ्या प्रमाणावर पाण्याचा उपसा केला जात असल्याचे समोर आले आहे. परिणामी तलावातील पाणीसाठा झपाट्याने कमी होत असल्याची भीती व्यक्त केली जात आहे.
स्थानिक शेतकरी व दुरगाव ग्रामपंचायत सदस्य शशिकांत निंबाळकर, रवींद्र जगताप आणि संदीप सुपेकर यांनी गंभीर आरोप करत सांगितले की, वारंवार तक्रारी करूनही संबंधित अधिकारी जाणीवपूर्वक दुर्लक्ष करीत आहेत. काही अधिकाऱ्यांना आर्थिक लाभ मिळत असल्यामुळेच ही बेकायदेशीर यंत्रणा सुरू असल्याचा आरोप त्यांनी केला आहे.
तलाव परिसरात अनधिकृत रोहित्रे
दूरगाव तलाव परिसरात मोठ्या प्रमाणावर अनधिकृत वीज रोहित्रे उभारण्यात आल्याचा आरोपही करण्यात आला आहे. या रोहित्रांना मुख्य वीजवाहिन्यांमधून थेट कनेक्शन देण्यात आले असून काही ठिकाणी आकडे टाकून वीजपुरवठा सुरू असल्याचे ग्रामस्थांचे म्हणणे आहे. या प्रकारात काही स्थानिक कर्मचाऱ्यांचाही सहभाग असल्याचा संशय व्यक्त केला जात आहे.
मोठ्यांवर कारवाईचे धाडस करणार?
या प्रकरणातील अनेक लाभार्थी हे बडे बागाईतदार, शासकीय कर्मचारी यामध्ये पोलिस अधिकारी तसेच काही प्रभावशाली व्यक्ती असल्याचा आरोप शेतकऱ्यांनी केला आहे. त्यामुळे संबंधितांवर कारवाई करण्याचे धाडस प्रशासन दाखवणार का, असा सवाल ग्रामस्थ उपस्थित करत आहेत.
आगामी काळात पाणीटंचाईची गंभीर समस्या निर्माण होण्याची शक्यता लक्षात घेता प्रांताधिकारी नितीन पाटील व तहसीलदार रवी सत्वन यांनी तातडीने घटनास्थळी पाहणी करून दोषींवर कठोर कारवाई करावी, अशी मागणी शेतकरी व ग्रामस्थांकडून होत आहे. कुकडीचे पिण्याच्या पाण्यासाठीचे आवर्तन मिळविण्यासाठी महसूल प्रशासनाने विशेष प्रयत्न केले असताना त्याच पाण्याची राजरोस चोरी होत असल्याची बाब अत्यंत गंभीर मानली जात आहे. वेळेत कारवाई न झाल्यास उद्या टँकरसाठीही पाणी उपलब्ध राहणार नाही, अशी भीती व्यक्त केली जात आहे.