Dispute Pudhari
अहिल्यानगर

Shrigonda Farmer Assault: गाय खरेदी करून नेणाऱ्या शेतकऱ्याला बेदम मारहाण; कपडे काढून लघवी पाजली, व्हिडिओही काढला

श्रीगोंद्यात स्वयंघोषित गोरक्षकांचा संतापजनक प्रकार; ५० हजारांची मागणी, खिशातील २१ हजार रुपये काढून घेतल्याचा आरोप

पुढारी वृत्तसेवा

श्रीगोंदा: गावरान गाय खरेदी करून घरी घेऊन जात असलेल्या शेतकऱ्याला आणि पिकअप चालकाला रस्त्यात अडवून स्वयंघोषित गोरक्षकांनी काठ्या व गजाने बेदम मारहाण केली, तसेच त्यांच्या अंगावरील कपडे काढून त्यांना लघवी पाजत त्याचा व्हिडिओही काढला. ही धक्कादायक घटना श्रीगोंदा तालुक्यात घडली. या प्रकरणी श्रीगोंदा पोलिस ठाण्यात संशयित आरोपी प्रतीक पाचपुते (रा.काष्टी) याच्यासह दहा ते पंधरा जणांविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

याबाबत विजय भाऊसाहेब शेळके (वय ४१, रा. गुणवडी, ता. जि. अहिल्यानगर) यांनी फिर्याद दिली. शेळके यांना आपल्या मुलीच्या बाळाला गावरान गायीचे दूध मिळावे अशी इच्छा होती. त्यासाठी त्यांनी दि. ५ सप्टेंबर २०२६ रोजी सकाळी ८ वाजता टाकळी लोणार येथील पंडित नामदेव दरवडे यांच्याकडून १४ हजार रुपयांना एक गावरान गाय कालवडीसह खरेदी केली होती. ती गाय घरी नेण्यासाठी त्यांनी ओळखीचे पिकअप चालक महेश संदीप जाधव (रा. गोसावीवाडी) याचे पिकअप वाहन बोलावले होते. त्या पिकअपमधून गाय व कालवड घेऊन ते टाकळी लोणार ते पिसोरे खांड रोडने जात होते. दुपारी दीडच्या सुमारास काळ्या रंगाच्या मोटारसायकलवरून आलेल्या दोन अनोळखी व्यक्तींनी त्यांची पिकअप अडवली आणि शेळके व जाधव यांना शिवीगाळ करत मारहाण करण्यास सुरुवात केली. काही वेळाने एका विनाक्रमांकाच्या काळ्या कारमधून व इतर दुचाकींवरून १० ते १५ जण घटनास्थळी आले. त्यापैकी एकाला आपण सोशल मीडियावरील रिल्समुळे प्रतीक पाचपुते म्हणून ओळखत असल्याचे फिर्यादीने म्हटले आहे.

आरोपींनी फिर्यादी व चालकास काठ्या आणि लोखंडी टॉमीने अमानुष मारहाण केली. ५० हजार रुपयांची मागणी करून फिर्यादीच्या खिशातील २१ हजार रुपये काढून घेतले. नंतर दोघांचे कपडे काढले आणि एका बाटलीत लघवी करून ती शेळके व जाधव यांना पाजली. आरोपींनी या संपूर्ण प्रकाराचा व्हिडिओही मोबाईलमध्ये चित्रित केला. घटनेनंतर श्रीगोंदा पोलिसांना बोलावण्यात आले. पोलिसांनी दोघांना गाय व कालवडीसह पोलिस ठाण्यात आणले व त्यानंतर उपचारासाठी श्रीगोंदा येथे ग्रामीण रुग्णालयात पाठवले.

या प्रकरणी विजय शेळके यांच्या फिर्यादीवरून श्रीगोंदा पोलिस ठाण्यात प्रतीक पाचपुते व इतर १० ते १५ अनोळखी इसमांविरुद्ध मारहाण, लूट, जिवे मारण्याची धमकी आणि अमानुष कृत्य केल्याप्रकरणी गुन्हा दाखल करण्यात आला आहे. श्रीगोंदा पोलिस तपास करीत असून, या घटनेमुळे श्रीगोंदा तालुक्यात खळबळ उडाली आहे.

गोरक्षकांच्या नावाखाली ज्या आरोपींनी लूट करून फिर्यादीवर जो अन्याय केला आहे, तो नक्कीच गंभीर आहे. अहिल्यानगर जिल्ह्यात जर अशा घटना घडू लागल्या, तर इथे कायदा व सुव्यवस्था अबाधित आहे का? असा प्रश्न निर्माण होतो. श्रीगोंदा तालुक्यातील गेल्या काही महिन्यातील घटना पहिल्या तर पोलिस अधीक्षक सुदर्शन मुमक्का यांनी स्वतः लक्ष घालणे गरजेचे असल्याचे मत व्यक्त होत आहे.

यापूर्वीच्या घटनांचाही तपास व्हावा

स्वयंघोषित गोरक्षकांनी काष्टी बाजारातून जनावरे खरेदी करून नेणाऱ्या अनेकांना याआधीही मारहाण करत लुटल्याच्या तक्रारी आहेत. या टोळीमागे कोणाचा वरदहस्त आहे? आतापर्यंत अशा किती लोकांची लूट झाली, हेही पोलिस तपासात समोर येणे गरजेचे असल्याचे मत व्यक्त होत आहे.

श्रीगोंदा पोलिस ठाणे हद्दीत घडलेल्या प्रकरणाची पोलिसांनी गांभीर्याने दखल घेतली आहे. लवकरच या गुन्ह्यातील सर्व आरोपी अटकेत असतील. कोणी गोरक्षाच्या नावाखाली असे गैरप्रकार करत असेल, तर ते खपवून घेतले जाणार नाहीत. पोलिसांचे काम पोलिसांना करू द्यावे. जो कायद्याचे उल्लंघन करील, त्याच्यावर कारवाई होणारच. अशा प्रकारे जर कोणी गाड्या अडवून पैशांची मागणी करत असेल तर संबंधितांनी तत्काळ पोलिसांशी संपर्क साधावा.
सुजितकुमार क्षीरसागर, उपविभागीय पोलिस अधिकारी, कर्जत

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

SCROLL FOR NEXT