

नगर: जिल्ह्यातील शालेय शिक्षण व्यवस्थेची गुणवत्ता, विद्यार्थ्यांचे शैक्षणिक परिणाम, पायाभूत सुविधा, डिजिटल शिक्षण, शाळा सुरक्षितता आणि प्रशासकीय प्रक्रियांचा विविध निकषांवर आढावा घेणाऱ्या परफार्मन्स ग्रेडींग इन्डेक्स (पीजीआय)च्या 2025-26 अहवालातून अहिल्यानगर जिल्ह्याची संमिश्र कामगिरी समोर आली आहे.
जिल्ह्याने एकूण गुणांमध्ये काहीशी वाढ केली असली, तरी राज्यातील तुलनात्मक क्रमवारीत मात्र पाचव्या क्रमांकावरून 14 क्रमांकावर नगर घसरल्याचे दिसले. जिल्ह्यातील शिक्षकांनी युडीआयसवर भरलेली माहिती असेल किंवा अध्ययन निष्पत्ती व इतर बाबींचा तपशील लक्षात घेऊन केंद्र स्तरावरून ‘पीजीआय’कडून शैक्षणिक निर्देशांक दिला जातो. अहवालातील विश्लेषणानुसार, अहिल्यानगरला 600 पैकी 364 गुण अर्थात 60.66 टक्के गुण मिळाले असून जिल्ह्याची श्रेणी ‘उत्तम-3’ आणि राज्य क्रमांक 14 असा नमूद आहे.
तीन वर्षांत 35 गुणांची वाढ
मागील तीन वर्षांच्या तुलनेत जिल्ह्याच्या एकूण गुणांमध्ये सकारात्मक वाढ दिसते. 2023-24 मध्ये 329 गुण, 2024-25 मध्ये 356 गुण आणि 2025-26 मध्ये 364 गुण अशी कामगिरी झाली आहे. म्हणजेच दोन वर्षांत एकूण 35 गुणांची वाढ झाली. मात्र 2024-25च्या तुलनेत यंदाची वाढ केवळ 8 गुणांची आहे.
पायाभूत सुविधांमध्ये मोठी झेप
यंदाच्या अहवालातील सर्वात सकारात्मक बाब म्हणजे पायाभूत सुविधा व विद्यार्थी हक्क या क्षेत्रातील प्रगती चांगली आहे. 2023-24 मध्ये या क्षेत्रात 22 गुण होते. 2024-25 मध्ये 36 आणि 2025-26 मध्ये तब्बल 42 गुणांवर पोहोचले. तीन वर्षांत 20 गुणांची वाढ ही सुधारणा आहे.
शैक्षणिक निष्पत्ती वाढली; पण..
‘अध्ययन निष्प्ती’ या सर्वाधिक 290 गुणांच्या क्षेत्रात 2023-24 मध्ये 155, 2024-25 मध्ये 167 आणि 2025-26 मध्येही 167 गुण मिळाले. म्हणजे तीन वर्षांत 12 गुणांची वाढ झाली असली, तरी मागील वर्षाच्या तुलनेत यंदा या महत्त्वाच्या क्षेत्रात एकही अतिरिक्त गुण मिळालेला नाही. या क्षेत्रात अध्ययन निष्पत्ती व गुणवत्ता, प्रवेश तसेच शिक्षकांची उपलब्धता व व्यावसायिक विकास यांचा समावेश आहे. त्यामुळे एकूण पीजीआयमध्ये सर्वाधिक वजन असलेल्या या क्षेत्रात पुढील काळात अधिक लक्ष केंद्रित करण्याची गरज असल्याचे बोलले जाते.
शाळा सुरक्षिततेत किरकोळ बदल
स्कूल सेफ्टी व बालसंरक्षण या क्षेत्रात 2023-24 मध्ये 17 गुण होते. 2024-25 मध्ये ते 16 वर घसरले आणि 2025-26 मध्ये 18 गुण झाले. म्हणजे यंदा सुधारणा झाली असली तरी तीन वर्षांत निव्वळ वाढ केवळ 1 गुणाची आहे. विद्यार्थ्यांची सुरक्षितता आणि बालसंरक्षण हा अत्यंत संवेदनशील विषय असल्याने या क्षेत्रातील प्रत्येक निकषाची शाळानिहाय पूर्तता तपासणे आवश्यक ठरते.
शासकीय प्रक्रियांतील पिछेहाट
अहिल्यानगरच्या यंदाच्या कामगिरीतील सर्वात महत्त्वाचा इशारा शासकीय प्रक्रिया या क्षेत्रातून मिळतो. या क्षेत्रातील गुण 2023-24 मध्ये 51, 2024-25 मध्ये 50 आणि 2025-26 मध्ये 46 झाले आहेत. म्हणजे तीन वर्षांत 5 गुणांची घट झाली आहे. या क्षेत्रात निधी उपलब्धता व वापर, उपस्थिती देखरेख प्रणाली आणि शालेय नेतृत्व विकास यांसारख्या बाबींचा समावेश आहे. यामुळे शैक्षणिक परिणामांबरोबरच प्रशासकीय अंमलबजावणी, निधीचा प्रभावी वापर, उपस्थिती व्यवस्थापन आणि शालेय नेतृत्व या बाबींवर अधिक काटेकोरपणे काम करण्याची आवश्यकता दिसून येत असून,
अध्यापन अन् डिजिटल शिक्षणातही सुधारणा
इफेक्टीव्ह क्लासरुम अर्थात वर्गातील प्रभावी अध्यापनाच्या क्षेत्रात गुण 53 वरून 56 आणि त्यानंतर 58 झाले. तसेच डिजिटल शिक्षणाचे गुण 30, 31 आणि आता 33 असे वाढले आहेत. ही वाढ सकारात्मक असली तरी डिजिटल शिक्षणाच्या 50 गुणांच्या तुलनेत हे गुण कमीच आहेत.
पीजीआयमध्ये अजुन गुण वाढवायचे असतील, तर ज्यावेळेस आपण युडीआयस फॉर्म भरतो,वस्तूनिष्ठ व योग्य पद्धतीने भरणे आवश्यक आहे. इतर बाबींवरही पर्यवेक्षकीय यंत्रणेने लक्ष दिले तर निश्चितच प्रगती दिसेल. मुख्य कार्यकारी अधिकारी यांच्या मार्गदर्शनात त्या दिशेने कामकाजही सुरू झाले आहे.
डॉ. राजेश बनकर, प्राचार्य, डाएट