Shrigonda Cotton Mill Fire Pudhari
अहिल्यानगर

Shrigonda Cotton Mill Fire: श्रीगोंद्यात कापूस जिनिंग मिलला भीषण आग; चार कोटींच्या कापसाच्या गाठी जळून खाक!

मध्यरात्री एकच्या सुमारास आग; अग्निशमन दलाचे चार तास प्रयत्न, आगीचे कारण अद्याप अस्पष्ट

पुढारी वृत्तसेवा

श्रीगोंदा: श्रीगोंदा येथील राजदीप कापूस जिनिंग मिलला १५ नोव्हेंबरच्या रात्री एक वाजण्याच्या सुमारास भीषण आग लागली. या आगीत जवळपास चार कोटी रुपयांच्या कापसाच्या गाठी जळून खाक झाल्या आहेत. आगीचे कारण अद्याप स्पष्ट झाले नाही.

श्रीगोंदा शहरातील बेलवंडी कोठार रस्ता परिसरात राजदीप जीनिंग मिल आहे. रात्री एक वाजण्याच्या सुमारास मिलमध्ये अचानक आग भडकली. कापूस अत्यंत ज्वलनशील असल्याने क्षणात आगीने रौद्र रूप धारण केले. संपूर्ण परिसरात धुराचे लोट पसरले. मिलमधून धूर येत असल्याचे बाहेर झोपलेल्या कामगारांच्या लक्षात आले. त्यांनी याबाबतची माहिती नवनीत मुनोत यांना दिली. त्यांनी अग्निशमन दलाशी संपर्क साधून घटनेची माहिती दिली. काही वेळात श्रीगोंदा, दौंड नगरपालिकेचे अग्निशमन दलाचे बंब घटनास्थळी दाखल झाले. जवानांनी चार तास शर्थीचे प्रयत्न करून पहाटे आग आटोक्यात आणली. मात्र, तोपर्यंत कोट्यवधींचे नुकसान झाले होते.

घटनेची माहिती मिळताच पोलिस निरीक्षक सुभाष सानप, पोलिस कर्मचारी गहिनीनाथ यादव, अविनाश कराळे यांनी घटनास्थळी भेट देऊन पाहणी केली. सीसीटीव्ही फुटेजमध्ये आग लागल्याचे दिसत आहे. मात्र, ही आग कशी लागली? विजेच्या शॉर्टसर्किटने लागली की अज्ञात व्यक्तीने लावली? या दृष्टीने पोलीस तपास करत आहेत.

विजेच्या शॉर्टसर्किटमुळे आग लागली असेल तर जिनिंग मिलसाठी असणाऱ्या नियमावलीची अंमलबजावणी केली गेली होती का? फायर ऑडिट झाले होते का? मिलची आतून स्वच्छता नियमित केली जात होती का? इलेक्ट्रिक वायरिंग, अर्थिंग, आग विझविण्यासाठी लागणारे सिलेंडर यांची तपासणी झाली होती का? कापसाच्या गाठी मध्ये अंतर ठेवण्यात आले होते का ? असे सवाल या आगीच्या निमित्ताने उपस्थित झाले आहेत.

दरम्यान, या आगीत नेमके किती रुपयांचे नुकसान झाले, याची वस्तुनिष्ठ आकडेवारी समोर आली नाही.पोलिस पंचनामा केल्यानंतरच नुकसानीची आकडेवारी समोर येईल.दरम्यान दुपारी तीन वाजेपर्यंत याबाबत श्रीगोंदा पोलिस ठाण्यात कुठल्याही गुन्ह्याची नोंद झाली नव्हती.

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

SCROLL FOR NEXT