शिवमहापुराण कथा सोहळा Pudhari
अहिल्यानगर

Shivmahapuran Katha: पंडित प्रदीप मिश्रा यांच्या कथेसाठी भाविकांची उत्सुकता शिगेला

पिंपरी निर्मळ येथे रविवारपासून सुरू होणाऱ्या शिवपुराण कथेच्या सोहळ्याला पालकमंत्री राधाकृष्ण विखे पाटील यांचा आढावा; भाविकांच्या गर्दीचा उच्चांक मोडण्याचा विश्वास

पुढारी वृत्तसेवा

राहाता: राहाता तालुक्यातील पिंपरी निर्मळ परिसरात अस्तगाव शिव येथे 12 ऑक्टोबरपासून सुरू होणारा, पंडित प्रदीप मिश्रा यांच्या शिवपुराण कथेचा कार्यक्रम जिल्ह्याच्या परंपरेला साजेसा ऐतिहासिक आणि आध्यात्मिक सोहळा ठरणार असून भाविकांच्या गर्दीचा उच्चांक मोडणारा ठरेल, असा विश्वास पालकमंत्री राधाकृष्ण विखे पाटील यांनी व्यक्त केला. (Latest Ahilyanagar News)

75 एकराच्या भव्य मैदानावर रविवारपासून पंडित प्रदीप मिश्रा यांच्या शिवपुराण कथेचे आयोजन करण्यात आले आहे. मंत्री विखे पाटील यांनी संपूर्ण कार्यक्रमस्थळाची पाहाणी करून तयारीचा आढावा घेतला. भाजपचे जिल्हाध्यक्ष नितीन दिनकर, विनायकराव देशमुख, जिल्हा पोलिस अधीक्षक सोमनाथ घार्गे, अतिरिक्त पोलिस अधीक्षक सोमनाथ वाकचौरे, तहसिलदार अमोल मोरे यांच्यासह पदाधिकारी कार्यकर्ते उपस्थित होते.

मंत्री विखे पाटील म्हणाले, की पंडित प्रदीप मिश्रा यांचा आध्यात्मिक क्षेत्रात मोठा नावलौकिक आहे. त्यांच्या सुश्राव्य वाणीतून शिवपुराण ऐकण्याची संधी जिल्ह्यातील भाविकांना प्रथमच मिळत आहे. आजपर्यत ज्या ठिकाणी त्यांच्या कथेचे आयोजन झाले त्यापेक्षाही मोठा उच्चांक ठरेल असे नियोजन जनसेवा फाउंडेशनच्या माध्यमातून करण्यात आले आहे. कार्यक्रम स्थळावर तीन भव्य मंडप उभारण्यात आले असून,मुख्य मंडपात एक लाखाहून अधिक भाविक बसू शकतील तसेच अन्य दोन मंडपातही त्याच पद्धतीचे नियोजन करण्यात आल्याचे त्यांनी सांगितले. शंभर बचत गटांना त्यांच्या उत्पादनाची विक्री करण्यासाठी स्टॉल देण्यात आले असून स्वयंसेवक म्हणून नोंदणी केलेल्या भाविकाच्या निवासाची तसेच भोजनाची स्वतंत्र व्यवस्था करण्यात आली असल्याचे विखे पाटील म्हणाले.

जिल्ह्यासह राज्यातून येणाऱ्या भाविकांची संख्या विचारात घेता दोन स्वतंत्र पार्किंग व्यवस्था करण्यात आल्या असून सुरक्षा वैद्यकीय मदत यासाठीसुद्धा विशेष यंत्रणा कार्यान्वित केल्याचे त्यांनी सांगितले. भाविकांची संख्या वाहतूक व्यवस्था यामुळे नगर-मनमाड मार्गावरील वाहतूकीला कोणतीही अडचण होणार नाही याची दक्षता घेण्यात येईल मात्र परीस्थिती पाहून वाहतूक व्यवस्थेत बदल करण्यात येईल. शिर्डीच्या आध्यात्मिक भूमीत होत असलेला सोहळा आपल्या परिवारातील आहे असे समजून सहकार्य करण्याचे आवाहन मंत्री विखे पाटील यांनी केले आहे. अध्यात्मिक सोहळा आपल्या सर्वासाठी तसेच प्रशासनासाठी नियोजनाच्या दृष्टीने अनुभव ठरेल आशी अपेक्षा मंत्री विखे पाटील यांनी व्यक्त केली.

पंडित प्रदीप मिश्रा यांचे स्वागत

दरम्यान, पंडित प्रदीप मिश्रा यांचे दुपारी चार वाजता शिर्डी विमानतळावर आगमन झाले. मंत्री विखे पाटील यांनी त्यांचे स्वागत केले. माजी खासदार डॉ सुजय विखे पाटील महाराजांना आणण्यासाठी स्वतः भोपाळला गेले होते. राहाता येथे सजवलेल्या वाहनातून पंडित मिश्रा यांचे पुष्पवृष्टी करीत स्वागत करण्यात आले.

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

SCROLL FOR NEXT