

नगर / श्रीरामपूर : गेल्या काही दिवसांपासून नशेचे इंजेक्शन विक्रीचे श्रीरामपुरातून मोठे रॅकेट चालवले जात असल्याचे समोर आले आहे. यापूर्वी तीन ते चार वेळा श्रीरामपुरातून पोलिसांनी नशेचे इंजेक्शन जप्त केले आहेत.(Latest Ahilyanagar News)
कालही श्रीरामपूरजवळलील खंडाळा येथील एका मेडिकलमधून एलसीबीच्या पथकाने नशेच्या 40 सीलबंद बाटल्या हस्तगत केल्या आहेत. याप्रकरणी औषध विक्रेत्यावर गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
मेफेंटरमिन इंजेक्शनचा वापर हा बहुतांशी नशेसाठी केला जात असल्याचे पोलिसांकडून सांगितले जाते. यापूर्वीही श्रीरामपुरातून संबंधित नशेचे इंजेक्शनच्या बाटल्या पोलिसांंनी कारवाई करून जप्त केल्याचे दिसले होते. याप्रकरणी गुन्हे दाखल असून, आरोपींना ताब्यात घेतल्याचे सांगितले जाते. आता ही कारवाई ताजी असतानाच, श्रीरामपूर जवळील खंडाळा येथील मेडीकलमध्ये अशा प्रकारचे इंजेक्शन विक्री केले जात असल्याची खबर पोलिस अधिक्षक सोमनाथ घार्गे यांना लागली होती. त्यांनी स्थानिक गुन्हे शाखेचे पोलिस निरीक्षक किरणकुमार कबाडी यांना तत्काळ कारवाईच्या सूचना केल्या. कबाडी यांनी पथक रवाना केले.
खंडाळा येथील शिव मेडीकलवर बनावट ग्राहक पाठवले. यावेळी संबंधित इंजेक्शन घेत असतानाच या पथकाने छापा टाकला. पोलिसांनी इंजेक्शन विकणाऱ्या पंकज चव्हाण या औषध विक्रेत्याला ताब्यात घेतले. सुमारे 15 हजार रुपये किंमतीच्या मेफेंटरमिन इंजेक्शनच्या 40 सीलबंद बाटल्या जप्त केल्याचे पोलिस निरीक्षक कबाडी यांनी सांगितले.
याप्रकरणी श्रीरामपूर शहर पोलिसात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. या कारवाईत उपनिरीक्षक दीपक मेढे, राहुल द्वारके, विजय पवार, चंद्रकांत कुसळकर, पोलीस कॉन्स्टेबल सुनील मालनकर, रमिजराजा अत्तार, रिचर्ड गायकवाड आदींचा समावेश होता.