नगर : अस्तगाव माथा येथे आयोजित शिवपुराण कथेच्या गर्दीचा फायदा घेत मौल्यवान वस्तू हातचलाखीने लंपास करणाऱ्या परप्रांतीय टोळीला पकडण्यात पोलिसांना यश मिळाले. शिर्डी, लोणी पोलिसात चार वेगवेगळे गुन्हे दाखल करत अटकेतील 23 महिला व तीन पुरूषांची रवानगी नाशिक जेलमध्ये करण्यात आल्याची माहिती डीवायएसपी अमोल भारती यांनी दिली. (Latest Ahilyanagar News)
मंत्री राधाकृष्ण विखे पाटील व माजी खा.डॉ.सुजय विखे पाटील यांच्या पुढाकारातून अस्तगाव माथा येथे पंडित प्रदीप मिश्रा यांच्या शिवपुराण कथेचे आयोजन करण्यात आले होते. जिल्ह्यातील लाखो भाविक कथा श्रवणासाठी शिर्डीत आले होते. पंडित मिश्रा यांचे आगमन होताच शनिवारी (दि.11) भव्य मिरवणूक काढण्यात आली. त्यावेळी उत्तर प्रदेश व राजस्थानातील शिल्पा पप्पू कुमार, पुनम राजेश कुमार, अजंली संदीप कुमार, पुजा हनुमान कुमार, दुलारी घुरण कुमार, उन्नी सुरेशचंद्र पवार या महिलांना पोलिसांनी पकडले. त्यांच्याकडून कटर व ब्लेड साहित्य जप्त करण्यात आले.
दुसऱ्या दिवशी रविवारी (दि.12) निर्मळ पिंप्री ते लोणी रोडवरील माध्यमिक विद्यालयाजवळ भाविकांच्या अंगावरील मौल्यवान दागिने चोरीच्या उद्देशाने 10 महिला व तीन पुरूषांना पकडण्यात आले. त्यांच्याकडून चाकू, ब्लेड आणि कार जप्त करण्यात आली. शिंदू विरू राखडे, देवकाबाई मनिष हातांगळे, छाया गोविंद हातांगळे, भारती कालीन नाडे, पूजा पंकज लोंढे, नंदिनी गुलशन राखडे, उज्ज्वला शिवा सकट, वर्षा नीलेश खंडारे, दुर्गा संजय राखपसरे, नंदा संजय सकट, सागर रमेश डोंगरे, नितीन जगदीश समुद्रे, सचिन कुमार सुखदेव महोतो यांना पकडण्यात आले. अटकेतील आरोपी हे वर्धा, नेवासा व झारखंड येथील आहेत.
मंगळवारी (दि.14) शिर्डीतील श्री साईबाबा मंदिर परिसरातील सोळा गुंठे परिसरात घातक शस्त्रासह दरोडा घालण्याच्या तयारीतील हरियाणामधील सहा जणांची टोळी पोलिसांच्या नजरेेस पडली. त्यांना पकडण्यापूर्वीच ती पसार झाली, पण या टोळीतील लाली लक्ष्मणसिंग, रुख्मिणी गोपाल सिंग या दोघींना पोलिसांनी पकडले.
बुधवारी (दि.15) सायंकाळी शिवपुराण कथेच्या प्रवेशद्वाराशेजारी गर्दीचा फायदा घेत महिलांच्या अंगावरील दागिने लंपास करणाऱ्या पाच महिलांना पोलिसांनी पकडले. पकडलेल्या पाचही महिला या उत्तर प्रदेशातील असल्याची माहिती पोलिसांनी दिली. काजल मनिष मालवी, चंद्रावती लोधुकुमार हरजन, मायादेवी अमरकुमार हरजन, पुष्पादेवी जसवालकुमार हरजन, मालादेवी बिसालकुमार हरजन अशी पोलिसांनी पकडलेल्या महिलांची नावे आहेत. त्यांच्याकडून ब्लेड, चाकू व कटर जप्त करण्यात आले.
शिवपुराण कथेतील भुरट्यांचा बंदोबस्त करण्याकरीता पोलिस अधीक्षक सोमनाथ घार्गे यांनी स्थापन केलेल्या पथकाने 23 महिला व तीन पुरूष अशा 26 जणांना अटक केली तर चौघी पसार झाल्या आहेत. अटकेतील आरोपींविरोधात गुन्हा दाखल करत त्यांची रवानगी नाशिक जेलमध्ये करण्यात आल्याची माहिती पोलिस उपअधीक्षक अमोल भारती यांनी दिली. 23 महिलांसह 26 जणांना अटक केली तर चौघी पसार झाल्या आहेत. अटकेतील आरोपींविरोधात गुन्हा दाखल करत त्यांची रवानगी नाशिक जेलमध्ये करण्यात आल्याची माहिती पोलिस उपअधीक्षक अमोल भारती यांनी दिली.