Sai Baba Diwali Pudhari
अहिल्यानगर

Sai Baba Diwali: सुवर्ण तेजात न्हालेली शिर्डी! साईबाबांना अडीच कोटींचे रत्नजडित अलंकार

लक्ष्मीपूजनानिमित्त दिवाळीचा सोहळा उत्साहात; द्वारकामाई आणि लेंडीबाग परिसर पणत्यांच्या प्रकाशाने उजळला

पुढारी वृत्तसेवा

नगर: श्रद्धा आणि सबुरीचा महामंत्र देणाऱ्या श्री साईबाबांचे अंगण दिवाळीच्या प्रकाशाने आणि भक्तीच्या रंगाने न्हाऊन निघाले. ऐश्वर्य आणि मांगल्याचे प्रतीक असलेला दीपावली लक्ष्मीपूजन उत्सव शिर्डीत मोठ्या उत्साहात साजरा झाला. सायंकाळी अभूतपूर्व सोहळ्यात साईबाबांच्या तेजोमय मूर्तीवर तब्बल अडीच कोटी रुपयांचे रत्नजडित सुवर्णालंकार चढवण्यात आले.  (Latest Ahilyanagar News)

संस्थानचे मुख्य कार्यकारी अधिकारी गोरक्ष गाडीलकर आणि त्यांच्या पत्नी वंदना गाडीलकर यांच्या हस्ते लक्ष्मीपूजन झाले. तेव्हा

हिरेजडित मुकुट, लाल मखमली शाल आणि पिवळ्या वस्त्रांमध्ये बाबांचे लोभस रूप अधिकच तेजस्वी दिसत होते. मंदिराचा गाभारा, कळस आणि परिसर लाखो दिव्यांच्या रोषणाईने आणि रंगीबेरंगी फुलांच्या मनमोहक सजावटीने उजळून निघाला होता.

सायंकाळी 5 वाजता मुख्य पूजनाला सुरुवात झाली. काही काळासाठी दर्शनरांग थांबवली होती. सारा आसमंत भक्तिरसात न्हाऊन निघाला. प्रवेशद्वारावरील आकर्षक रांगोळ्या भक्तांचे स्वागत करत होत्या.

फटाक्यांच्या आतषबाजीने शिर्डीचे आसमंत उजळून निघाले. दिवाळीचा पारंपरिक फराळ, लाडू, चिवडा, करंजी यांचा नैवेद्य बाबांना अर्पण केला गेला.

लक्ष्मीपूजनानंतर द्वारकामाई आणि लेंडीबागेचा परिसर भक्तांनी लावलेल्या पणत्यांच्या प्रकाशाने उजळून निघाला. हा सामूहिक दीपोत्सव म्हणजे साईचरणी अर्पिलेल्या निस्सीम भक्तीचा एक अविस्मरणीय आविष्कार होता. या मंगलमय सोहळ्याला उपमुख्य कार्यकारी अधिकारी भीमराज दराडे यांच्यासह संस्थानचे अधिकारी, कर्मचारी, ग्रामस्थ आणि असंख्य साईभक्त साक्षी होते. सायंकाळी 6 वाजता झालेल्या धूपारतीने या भक्तिमय वातावरणात अधिकच चैतन्य भरले.

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

SCROLL FOR NEXT