

भातकुडगांव फाटा: जिल्ह्यातील अतिवृष्टी आणि पूरस्थितीमुळे शेवगाव-पाथर्डी परिसरातील शेतकरी मोठ्या संकटात सापडले होते. या कठीण परिस्थितीत शेतकरी सावरू लागले असतानाच सरकारने जाहीर केलेले मदत पॅकेज फक्त कागदावरच राहिल्याने शेतकऱ्यांचा संताप उसळला आहे. (Latest Ahilyanagar News)
कृषिमंत्री दत्ता भरणे यांनी नुकत्याच शेवगाव तालुक्यातील भगूर गाव दौऱ्यात दिवाळीपूर्वी सर्व शेतकऱ्यांच्या खात्यात नुकसानभरपाई जमा होईल, असे आश्वासन दिले होते. मात्र, दिवाळी सुरू झाली असूनही अजूनपर्यंत एकाही शेतकऱ्याच्या खात्यात पैसे जमा झालेले नाहीत. त्यामुळे शेतकऱ्यांची दिवाळी ‘काळी दिवाळी’ ठरत असून, बाजारपेठेत सन्नाटा आणि निराशा दिसून येत आहे.
शेवगाव तालुक्यातील शेतकऱ्यांनी पंचनामे, यादी व फॉर्मर आयडी अशी सर्व प्रक्रिया पूर्ण केली असूनही निधी न मिळाल्याने ते मोबाईलवरील संदेशाची वाट पाहत आहेत. अनेक शेतकरी तीन-तीन दिवस बँकांच्या चकरा मारत असून, बँक व्यवस्थापकांकडून पैसे आले नाहीत, असे एकच उत्तर मिळत आहे.
या पार्श्वभूमीवर स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे जिल्हा सरचिटणीस बाळासाहेब फटांगडे आणि शिवसंग्राम पक्षाचे तालुकाध्यक्ष संदीप बामदळे यांनी शेवगावचे तहसीलदार आकाश दहाडदे यांच्याशी संपर्क साधला असता त्यांनी, शेतकऱ्यांच्या याद्या अपलोड झाल्या आहेत. मात्र, निधी वितरणाचा अधिकार तहसील कार्यालयाकडे नाही; ते पैसे हे मंत्रालयातूनच पडतात, असे सांगितले.
राज्य मंत्रिमंडळाने केलेली मदतीची घोषणा फक्त गाजावाजा ठरली असून, प्रत्यक्ष मदत शेतकऱ्यांपर्यंत पोहोचलेली नाही. परिणामी शेवगाव व परिसरातील बाजारपेठेत मंदीचे वातावरण निर्माण झाले आहे.
अतिवृष्टीमुळे शेतकऱ्यांच्या हातातोंडाशी आलेला घास निसर्गाने हिरावून घेतला. सरकारने दिवाळीपूर्वी अनुदान देऊ असे जाहीर केले होते, पण तालुक्यातील कोणत्याही शेतकऱ्याच्या खात्यावर एक रुपयाही जमा झाला नाही. त्यामुळे शेतकऱ्यांना ‘रिकाम्या पिशव्यांची दिवाळी’ साजरी करावी लागत आहे.
संदीप बामदळे, तालुकाध्यक्ष, शिवसंग्राम पक्ष
शिवाय उसाचा दुसरा हप्ता न मिळाल्याने शेतकऱ्यांवर दुहेरी आर्थिक संकट कोसळले आहे. जर दिवाळीनंतरही शेतकऱ्यांच्या खात्यात नुकसानभरपाई जमा झाली नाही, तर सरकारविरोधात तीव्र आंदोलन उभारले जाईल, असा इशारा स्वाभिमानी शेतकरी संघटना आणि शिवसंग्राम पक्षाने दिला आहे.
पूरग्रस्त शेवगाव-पाथर्डी तालुक्यातील शेतकरी अजूनही शासकीय मदतीच्या प्रतीक्षेत आहेत. घोषणांचा गाजावाजा झाला, पण मदत न मिळाल्याने यंदाची शेतकऱ्यांची दिवाळी ‘काळी’ ठरली आहे.
बाळासाहेब फटांगडे, जिल्हा सरचिटणीस, स्वाभिमानी शेतकरी संघटना