Shirdi Pudhari
अहिल्यानगर

Shirdi Hawking Zone: शिर्डीतील पथविक्रेत्यांना आता कायमस्वरूपी जागा; ७५० अर्जांची यादी प्रसिद्ध, पोलिस पडताळणी बंधनकारक

साईमंदिर परिसरातील अनधिकृत स्टॉलना बसणार आळा; भाविकांच्या सुरक्षेसाठी डिजिटल कार्डचीही व्यवस्था

पुढारी वृत्तसेवा

शिर्डी: शहरात महिना-दीड महिन्यापूर्वी एका महिलेचा झालेला खून आणि सुरक्षिततेचा निर्माण झालेला प्रश्न लक्षात घेता, शिर्डी नगरपरिषदेने साईमंदिर व परिसर सुरक्षित ठेवण्यासाठी महत्त्वपूर्ण पाऊल उचलले आहे. पालकमंत्री राधाकृष्ण विखे पाटील आणि माजी खासदार तथा भाजपचे प्रदेश उपाध्यक्ष डॉ. सुजय विखे पाटील यांच्या निर्देशांनुसार शिर्डीतील पथविक्रेत्यांसाठी (हॉकिंग झोन) एक निश्चित आणि कायमस्वरूपी धोरण अमलात आणले जात आहे.

नगरपरिषद आणि मुख्याधिकारी यांच्या संयुक्त विद्यमाने सर्व अधिकृत पथविक्रेत्यांना व्यवसाय करण्यासाठी विशिष्ट ठिकाणी जागा निश्चित करून दिली जाणार आहे. नगर परिषदेमार्फत आज सुमारे ७५० पात्र अर्जांची यादी प्रसिद्ध करण्यात आली असून, संबंधितांना अर्जांचे वाटप सुरू करण्यात आले आहे.

पोलिस पडताळणी अनिवार्य करण्यात आली असून भविष्यात कोणत्याही बेकायदेशीर किंवा गुन्हेगारी प्रवृत्तीला आळा घालण्यासाठी प्रत्येक पथविक्रेत्याची 'पोलिस पडताळणी' सक्तीची करण्यात आली आहे.

विक्रेत्यांची खरी गरज, त्यांची आर्थिक आणि सामाजिक पार्श्वभूमी तपासून त्यांना नगर परिषदेकडून डिजिटल कार्ड दिले जाईल. या निर्णयामुळे शिर्डी साईमंदिर परिसरातील वाढत्या अनधिकृत स्टॉलना आळा बसेल, तसेच भाविकांच्या सुरक्षेचा प्रश्न सुटण्यास मोठी मदत होईल, असा विश्वास व्यक्त केला जात आहे.

स्थानिकांच्या रोजगारावर गदा नाही

शिर्डीतील कोणत्याही स्थानिक किंवा गरीब नागरिकांचा रोजगार हिरावून घेणे हा नगर परिषदेचा उद्देश नाही. स्थानिक गरिबांना कायद्याच्या चौकटीत राहून आणि सुरक्षिततेचे नियम पाळून सन्मानाने व्यवसाय करता यावा, यासाठीच हे कायमस्वरूपी धोरण राबवले जात आहे, असे शिर्डी नगरपरिषद प्रशासनाने स्पष्ट केले आहे.

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

SCROLL FOR NEXT