Dr Jitendra Shelke Accident Pudhari
अहिल्यानगर

Dr Jitendra Shelke Controversy: डॉ. जितेंद्र शेळके यांच्याबाबत सुरू असलेल्या बदनामीला शिर्डीकरांचा तीव्र विरोध

अपघाती मृत्यूनंतर घातपाताचे आरोप फेटाळले; शिर्डीतील ग्रामस्थांकडून सामाजिक कार्याचा गौरव करत अफवा थांबवण्याचे आवाहन

पुढारी वृत्तसेवा

शिर्डी: डॉ. जितेंद्र शेळके यांच्या मृत्युनंतर विविध तर्कविर्तक काढत त्यांची सुरू असलेली बदमानी थांबवा, या मागणीसाठी शिर्डीतील गावकरी एकवटले. त्यांच्या मृत्युसंदर्भात अनेक चर्चा सुरू असून त्यांच्यावरील आरोपाचेही गावकऱ्यांनी माध्यमांशी संवाद साधत खंडण केले.

डॉ. जितेंद्र शेळके गुन्हेगार नव्हे, प्रसिद्ध उद्योगपती, उच्चविद्याविभूषित होते. शेळके दाम्पत्याच्या अपघाती मृत्युनंतर शिर्डी शोकसागरात बुडली असतानाच त्यांच्या अपघातासंदर्भात अफवा पसरविल्या जात असल्याचा दावा ग्रामस्थांनी केला.

डॉ. शेळके यांचे समर्थन करतानाच गावकऱ्यांनी त्यांच्यावरील आरोप हे खोटे असल्याचा दावा केला. डॉ. शेळके यांचा घातपात नसून तो अपघातच असल्याचे गावकऱ्यांचे म्हणणे आहे. समाजमाध्यमासह काही समाजसेवक तो घातपात असल्याचे सांगत खरातशी संबंध जोडून त्यांची बदनामी करत असल्याचे गावकऱ्यांचे म्हणणे आहे.

शिवनिका ट्रस्ट आणि भोंदू खरातच्या शोषण व घोटाळ्याशी डॉ. शेळके यांचा कोणताही संबंध नाही. धार्मिक भावनेतून ते त्या ट्रस्टचे उपाध्यक्ष होते. 2023 मध्येच त्यांनी त्या पदाचा राजीनामा दिला होता. ते दोषी असते तर त्यांच्यावर गुन्हा दाखल झाला असता. त्यांच्याविरोधात साधा अदखलपात्र गुन्हाही दाखल नसल्याचे ॲड. अनिल शेजवळ यांनी सांगितले. त्यांच्या मृत्यूसंबंधी उलट सुलट सुरू असलेल्या चर्चा वेदनादायी असल्याचे ग्रामस्थांनी माध्यमांसमोर म्हटले आहे.

अमेरिकेचे ग्रीन कार्ड सोडून डॉ. शेळके आई-वडिलांच्या आग्रहाखातर सेवाभावाने सर्वकाही सोडून शिर्डीच्या मायभूमीत परतले. शिर्डीसाठी मोठे सामाजिक योगदान दिले. विदेशी साईभक्तांना शिर्डीशी जोडण्यात त्यांचे मोलाचे योगदान होते. शिर्डी परिक्रमा उत्सवाचे ते संस्थापक सदस्य होते. धार्मिक व सामाजिक कार्यात ते नेहमीच पुढाकार घेत होते. अपुऱ्या माहिती आधारे त्यांची सुरू असलेली बदनामी थांबवा, त्यांचे सामाजिक कार्य समोर मांडा असे आवाहन शिर्डीकरांनी केले.

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

SCROLL FOR NEXT