

नगर तालुका: वन विभागाच्या जिल्हा कार्यालयात वन कर्मचाऱ्याला बांधून चंदन झाडांची चोरी केल्याचा धक्कादायक प्रकार शनिवारी (दि.18) सकाळी समोर आला. चंदन तस्कराच्या अफलातून डेरिंगमुळे कर्मचाऱ्यांच्या सुरक्षेचा प्रश्न ऐरणीवर आला.
शनिवारी रात्री वन विभागाच्या जिल्हा कार्यालयात दोन वन कर्मचारी सुरक्षेसाठी नेमणुकीस होते. मध्यरात्रीनंतर शनिवारी पाच तस्करांनी जिल्हा कार्यालय परिसरात प्रवेश केला. झाड तोडण्याचा आवाज आल्याने वन कर्मचारी तिकडे धावले. तस्करांनी कर्मचाऱ्यांना मारहाण करून बांधून ठेवले. तस्करांनी दोन चंदनांच्या झाडांची कत्तल करून चोरी केली.
अहिल्यानगर शहरात असलेल्या वन विभागाच्या जिल्हा कार्यालयात चंदन तस्करांनी केलेली चोरी चर्चेचा विषय ठरत आहे. वन कर्मचाऱ्याला मारहाण करत बांधून ठेवत त्यांच्या समक्ष झाडांची चोरी दहशत निर्माण करणारी होती. ही चोरी सीसीटीव्ही कॅमेऱ्यामध्ये कैद झाल्याची माहिती सूत्रांकडून समजली.
चंदन झाडांच्या चोरीनंतर बांधलेल्या दोन वन कर्मचाऱ्यांनी शेजारी राहणाऱ्या वनरक्षकास उठवून झालेला प्रकार सांगितला. घटनेची माहिती उपवन संरक्षकांना मिळाताच त्यांनी घटनास्थळी भेट देत पाहणी केली.
तालुक्यातून चंदन हद्दपार
तालुक्यातील डोंगर रांगांमध्ये दोन दशकांपूर्वी मोठ्या प्रमाणात चंदनाची झाडे आढळून येत होती. नगर तालुक्यातूनच मोठ्या प्रमाणात पश्चिम महाराष्ट्रात चंदन तस्करी केली जात होती. परंतु सद्यस्थितीत चंदनाची झाडे दुर्मिळ झालेली पाहावयास मिळतात. शेतकऱ्यांच्या बांधावर असलेल्या चंदनाची झाडे तस्करांनी तोडून नेली आहेत.