

डॉ. सूर्यकांत वरकड
नगर: अहिल्यानगर शहराच्या लवकरच आणखी एकभर पडणार आहे. नाट्यकर्मीसाठी हक्काचे नाट्यगृह उपलब्ध होणार आहे. प्रोफेसर कॉलनी चौकाजवळील नाट्य संकुल इमारतीचे 80 टक्के काम पूर्ण झाले असून, आता केवळ अंतर्गत काम बाकी आहे. त्याचेही टेंडर झाले आहे. त्यामुळे येत्या काही महिन्यात नाट्य संकुल नगरकरांना मिळणार आहे.
अहिल्यानगर शहराला मोठी ऐतिहासिक नाट्यपरंपरा आहे. त्याचबरोबर साहित्याचीही मोठी परंपरा आहे. पूर्वीच्या काळी गावोगावी छोटे नाट्य प्रयोग होत होते. त्यावेळी अहिल्यानगरचे नाव आघाडीवर होते. आजही राज्यस्तरीय नाट्यस्पर्धा शहरात होतात. त्याला राज्यभरातून चांगला प्रतिसाद मिळातो. तसेच, विविध नाटकांचे प्रयोगही शहरात होतात. परंतु, नाट्यकर्मीसाठी हक्काचे नाट्यगृह नव्हते. त्यामुळे नाट्यकर्मीसाठी हक्काचे नाट्यगृह असावे, अशी मागणी अनेक दिवसांपासून होती.
शहरात असणारे जिल्हा बँकेचे यशवंतराव चव्हाण सहकार सभागृह, तलाठी संघटनेचे माऊली संकुल अशी दोनच नाट्यगृह आज उपलब्ध आहेत. त्यामुळे नाट्यप्रेमींची अनेक वेळा कुचंबना होत होती. नाट्यप्रेमी नाट्य संकुलाच्या मागणीसाठी आमदार संग्राम जगताप यांनी पुढाकार घेतला. त्यानंतर शहरातील प्रोफेसर कॉलनी चौकातील नगररचना योजना चार अंतिम भूखंड 129 वर नाट्यसंकुल उभारण्यास परवानगी मिळाली. सुरुवातीला या प्रकल्पाची 12.47 कोटी किंमत होती. तर, स्थापत्य कामाची किंमत 7 कोटी 22 लाख होती.
सुरुवातीला 500 आसन क्षमतेचे नाट्यसंकुल उभारण्यात येणार होते. मात्र, त्यानंतर जास्तीत जास्त आसन क्षमतेचे बनवावे, अशी मागणी होऊ लागल्याने पुन्हा 500 आसनांची क्षमता वाढविण्यात आली. त्यामुळे आता एकूण 1000 आसन क्षमतेचे नाट्यगृह उभे राहिले आहे. 23 मार्च 2010 रोजी या कामाला प्रशासकीय मान्यता मिळाली होती. परंतु, ठेकेदाराच्या उदासिनतेमुळे काम रखडले होते. आमदार संग्राम जगताप यांनी संबंधित ठेकेदार बलून टाकून दुसऱ्या ठेकेदारास काम देण्याची सूचना केली.
त्यानुसार आयुक्त यशवंत डांगे यांनी कायदेशीर प्रक्रिया पार पाडून गांधी कंस्ट्रक्शनला काम दिले. गांधी कंस्ट्रक्शनला 8 सप्टेंबर 2024 ला कार्यरंभ आदेश देण्यात आला होता. आतापर्यंत नाट्यसंकुलाचे सिव्हील वर्कचे 80 टक्के पूर्ण झाले असून, केवळ इंटेरिअर डिझाईन बाकी काम बाकी आहे. नाट्यसंकुलासाठी आतापर्यंत पहिल्या ठेकेदारास शासन व महापालिका हिस्सा 4 कोटी 19 लाख 4 हजार 373 इतका निधी वर्ग करण्यात आला आहे. त्यानंतर गांधी कंस्ट्रक्शनला 5 कोटी रुपयांचा निधी वर्ग करण्यात आला आहे.
अद्ययावत नाट्यसंकुल असे
प्रशस्त पार्किंगसह तळमजला व बाल्कनी फ्लोअर (पहिला मजला), संपूर्ण वातानुकूलित (आसन क्षमता ः 1000), तळमजल्यामध्ये 10 बाय 20 मीटर आकर्षक वुडन फ्लोअरिंग, स्टेज प्रशस्त बॅकस्टेज, ग्रीन रूम, आकर्षक आसन व्यवस्था, ॲकोस्टिक इंटेरिअर, कॅफेटेरिया. पार्किंग 1058 चौरसमीटर, तळमजला 3025.13 चौसमीटर, पहिला मजला 1850.46 मीटर
अहिल्यानगर शहरातील नाट्यकर्मी आणि नाट्य रसिकांची गेल्या अनेक वर्षांची मागणीला मूर्त स्वरूप आले आहे. नगरकरांचे अनेक दिवसांचे स्वप्न पूर्ण होत आहे. नाट्य संकुल अहिल्यानगर शहराच्या वैभवात भर घालणारे ठरेल.
आमदार संग्राम जगताप
महापालिकेच्यावतीने उभारण्यात येणाऱ्या नाट्य संकुलाचे काम 80 टक्के पूर्ण झाले आहे. मध्यंतरी ठेकेदाराच्या चुकीमुळे काम होण्यास विलंब झाला होता. त्यामुळे नवीन ठेकेदार देण्यात आला. त्यामुळे कामाास वेग आला. येत्या काही दिवसांत काम पूर्ण होईल.
यशवंत डांगे, आयुक्त