सोनई: शनिशिंगणापूर येथे ऑनलाइन ॲपच्या माध्यमातून गैरव्यवहार केल्याप्रकरणी अटकेतील दोघांच्या बँक खात्यात 1 कोटीचे ट्रान्झक्शन झाले आहे. त्या एक कोटीच्या व्यवहाराची माहिती पोलिस घेत आहेत. त्यातील 60 लाख रूपये दोघांनी वैयक्तिक वापरल्याची माहिती सूत्रांनी दिली. दरम्यान अटकेतील दोघांना न्यायालयाने सोमवारपर्यत (दि.8) पोलिस कोठडी सुनावली आहे.
दोघांच्या अटकेनंतर अनेकांचे धाबे दणाणले असून अनेक जण ऑऊट ऑफ कव्हरेज गेले असल्याचे समजते. पावसाळी अधिवेशनात मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी बनावट ॲप प्रकरणी कारवाईचे आदेश दिल्यानंतर पोलिसांनी फिर्याद दाखल करून सायबर शाखेने तपास सुरू केला.
याप्रकरणी देवस्थानचे कर्मचारी, पुरोहितांसह अधिकाऱ्यांचीही चौकशी करण्यात आली आहे. या तपासात देवस्थानचे लिपिक संजय तुळशीराम पवार व सीसीटीव्ही विभाग प्रमुख सचिन अशोक शेटे या दोघांना गुरुवारी रात्री सायबर शाखेने अटक केली. सायबर पोलिसांकडून तपासाला गती मिळाल्याने संशयतांचे धाबे दणाणले आहे.
शनिशिंगणापूर येथे शनिदेवाची पूजा अभिषेक व तेल अर्पण संदर्भात खोटा मजकूर ऑनलाईन पसरवला व भाविकांची व देवस्थानची फसवणूक केल्या प्रकरणी पाच ॲपधारक व साथीदारांवर अहिल्यानगर सायबर शाखेने शिंगणापूर पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल केला आहे. बनावट ॲपधारक व त्यांचे साथीदारांनी ऑनलाईन दर्शन पूजा, अभिषेक, तेल चढावा बुकिंग करीता शनैश्वर देवस्थान व धर्मदाय आयुक्त यांची कोणतीही परवानगी न घेता भाविकांकडून ऑनलाईन पद्धतीने अनियमित दराने स्वतःच्या फायद्यासाठी रकमा स्वीकारल्याचे तपासात समोर आले.
दोघांच्या बँक खात्यात एक कोटीचे व्यवहार झाल्याचे समोर आले आहे. यातील 60 लाख रुपये या दोघांनी वैयक्तिक कामासाठी वापरले. त्यातील कोणाला पैसे दिले का? उर्वरित पैशाचे काय केले? या अनुषंगाने पोलिस तपास करत आहेत.