Fetal Determination Pudhari
अहिल्यानगर

Fetal Determination Case: पिंपरी निर्मळ गर्भलिंग निदान प्रकरणात आणखी एकाला अटक; आरोपींची संख्या १९ वर

श्रीगोंद्यातील मेडिकल चालक ताब्यात; क्रेटा कारमधून सोनोग्राफी मशीन जप्त, तपासात नवे धागेदोरे

पुढारी वृत्तसेवा

नगर/श्रीरामपूर: पिंपरी निर्मळ (ता. राहाता) येथील गर्भलिंग निदान प्रकरणात दाखल गुन्ह्यात आता श्रीगोंदा तालुक्यातील घोगरगाव येथील एका मेडिकल दुकान चालकास सोनोग्राफी मशीनसह पोलिसांनी ताब्यात घेतले आहे. जालिंदर बोरुडे असे त्याचे नाव असून, गेल्या दहा दिवसांपासून तो नगर तालुक्यातील हातवळण येथे झोपडीत लपून बसला होता. या गुन्ह्यात आता अटकेतील आरोपींची संख्या 19 पर्यंत पोहचली असल्याची माहिती अपर पोलिस अधीक्षक सोमनाथ वाघचौरे यांनी दिली.

याबाबतची माहिती अशी की, लोणी पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल आहे. सुरुवातीला नेवासा येथील डॉक्टर भणगे, दोन एजंट व सहा कुटुंबीय अशा एकूण नऊ लोकांना अटक करण्यात आली होती. आरोपींकडून एक पोर्टेबल सोनोग्राफी मशीन, तीन चार चाकी गाड्या जप्त करण्यात आल्या होत्या. त्यानंतर ढगे नामक आरोपीकडून एक पोर्टेबल सोनोग्राफी मशीन जप्त करण्यात आले, तसेच एजंटलाही अटक करण्यात आली. गुन्ह्याचा बारकाईने तपास करत असताना पुन्हा श्रीरामपूर येथील डॉ. रवींद्र कुटे व डॉ. राज शेख यांनाही या गुन्ह्यांमध्ये लिंगनिदान, गर्भपाताच्या गोळ्या पुरवणे, या गुन्ह्यात अटक करण्यात आली.

याशिवाय, बेकायदेशीर मशीन विक्री करणाऱ्या पुणे येथील दोन डॉक्टर व एक व्यक्तीलाही याच गुन्ह्यात अटक केली. त्यानंतर लगेचच वडगाव मावळ येथील मारुती ढोरे याला आरोपी करून त्याच्याकडून अवैध लिंग निदान चाचणी करण्यासाठी वापरत असलेले मशीन जप्त केले. आरोपींकडून नाशिक येथील निफाड तालुक्यातील एक डॉक्टरची खबर मिळाली. पथकाने निफाडमध्ये जाऊन डॉ. कुणाल वलटे यांच्यासह तेथीलच मेडिकल चालक सागर उन्हाळ यांनाही ताब्यात घेतले.

पुण्याहून आणले मशीन

पुण्यातून मेडीकल साहित्याचा होलसेल विक्रेता नरेंद्र ठाकरे याला पोलिसांनी ताब्यात घेतले. तपासात त्याने अवैध लिंगनिदान चाचणी करण्यासाठी लागणारे मशीन तो उपलब्ध करून देत असल्याची कबुली दिली. त्याने अहिल्यानगर जिल्ह्यातील श्रीगोंदा तालुक्यातही एक मशीन दिल्याचे सांगितले. त्यानुसार, वाघचौरे यांनी आपले पथक जालिंदर रामदास बोरुडे या संशयित आरोपीच्या मागे लावले होते. मात्र त्याला याची कुणकुण लागल्याने तो नगर तालुक्यातील हातवळण येथील एका झोपडीत लपून बसला होता.

अखेर दहा दिवसांनंतर त्याला ताब्यात घेण्यात आले. आरोपीकडून बेकायदेशीर लिंगनिदानासाठी वापरण्यात येणारे व बेकायदेशीरपणे खरेदी केलेले सोनोग्राफी मशीन मिळून आले. हे मशीन त्याच्याकडील क्रेटा या चारचाकी गाडीत मिळून आल्याने मशीन तसेच चारचाकी गाडी ताब्यात घेण्यात आली आहे. आतापर्यंत गुन्ह्यामध्ये 19 आरोपींना अटक करण्यात आली आहे. विशेष म्हणजे त्यापैकी सहा डॉक्टर आहेत, तर तिघे जण मेडिकल चालक आहे व एक जण मेडिकल साहित्याचा पुरवठा करणारा मोठा पुरवठादार आहे. आरोपीला ताब्यात घेण्यासाठी पोलिस कॉन्स्टेबल महादेव कोहक व संदीप राऊत यांनी विशेष मेहनत घेतली.

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

SCROLL FOR NEXT