

टाकळी ढोकेश्वर: आम्ही टाकळीकर ग्रामविकास प्रतिष्ठानने नाम फाऊंडेशन व विविध संस्थांच्या सहभागातून सुरू केलेल्या जलसंधारण कामाच्या दुसऱ्या टप्प्याचे काम प्रगतीपथावर असून, सध्या निवडुंगेवाडी तलावाचे खोलीकरण सुरू आहे.
पावसाळ्यापर्यंत हे काम सुरू राहणार असून, स्थानिक धुमाळ वस्तीवरील तरुण, शेतकरी व ग्रामस्थ या अभियानात हितरीने सहभागी झाले आहेत.तन,मन व धनाने धुमाळ वस्ती या कामात सहभागी झाली असून, या कामासाठी त्यांनी आज भरीव निधी आम्ही टाकळीकर च्या पदाधिकाऱ्याकडे सुपूर्त केला. यापुढेही या कामात सर्वोतपरी सहकार्य करण्याची हमी दिली. यावेळी आम्ही टाकळीकर ग्रामविकास प्रतिष्ठानचे संस्थापक चाँद शेख,विश्वस्त संदीप कोरडे, स्थानिक समन्वयक संतोष सोनवळे, प्रताप खिलारी, दत्तात्रय निवडुंगे,आदिनाथ पायमोडे, मळगंगा तरुण मित्र मंडळाचे कार्यकर्ते योगेश धुमाळ,अतुल धुमाळ, नितीन धुमाळ, संदीप बोऱ्हुडे, नीलेश चव्हाण, शिवाजी कोरडे, अंकुश धुमाळ, पोपट धुमाळ आदी उपस्थित होते.
या जलसंधारण चळवळीत ग्रामस्थ, विविध क्षेत्रातील युवक, उद्योजक, व्यावसायिक, नोकरदार स्वयंस्फूर्तीने योगदान देत आहे. बारा वर्षांपूर्वी चांद शेख यांनी विविध क्षेत्रातील भूमिपुत्रांनी एकत्र येत आम्ही टाकळीकर ही ग्रामविकासाची चळवळ पुणे येथे वैद्यकीय क्षेत्रात कार्यरत असलेले डॉ.बाळासाहेब बांडे यांच्या नेतृत्वा खाली सामाजिक बांधिलकीची जाणीव ठेवून विविध सामाजिक उपक्रम राबविण्यासाठी ही चळवळ उभी केली. त्या माध्यमातून बारा वर्षात ४७ लाख रुपयांचे १६ लोकोपयोगी प्रकल्प उभारण्यात आले .
कोरोनात गावाच्या मुख्य ओढ्याचे खोलीकरण करण्यात आले. गावात जलशुद्धीकरण प्रकल्प यशस्वीरित्या राबविला. त्यामुळे गावातील आरोग्याचे प्रश्न सुटले, चालू वर्षी दुसरा टप्प्यात दशक्रिया विधी घाट ते निवडुंगेवाडी तलाव मुख्य ओढ्यावर सहा मोठे के.टी. वेअर चे खोलीकरण व रुंदीकरण करण्यात आले. पावसाळ्यापूर्वी तलाव व गावातील ओढ्याचे खोलीकरण व स्वच्छता करण्यात येणार आहे यामुळे जलसंधारणाचे मोठे काम उभे राहिले आहे. उपलब्ध माहितीनुसार या जलसंधारण चळवळीतून परिसरात दोन कोटी लिटर पाणीसाठा उपलब्ध होऊन सिंचन व पिण्यासाठी पाणी उपलब्ध होईल, असा आशावाद आम्ही टाकळीकर ग्रुपच्या सदस्यांनी व्यक्त केला.
मदतीचा ओघ सुरूच...
या जलसंधारण कामास विविध स्तरातून मदत सुरू असून विविध क्षेत्रात कार्यरत गावातील भूमिपुत्र मदत करीत आहेत.ज्या मुली लग्न करून सासरी गेल्या आहेत. त्याही माहेरच्या ओढीतून या कामात हातभार लावत आहेत. एवढेच नव्हे तर चिमुकली मुले आपल्या खाऊचे पैसे या कामास देत आहेत. ज्येष्ठ नागरिक व सेवानिवृत्त कर्मचारी आपल्या परीने या अभियानात सहभागी होत आहेत व मदत करत आहेत.
टाकळी ढोकेश्वरच्या पाणीप्रश्नावर मात करण्यासाठी सोशल मीडियावर आधारीत असणाऱ्या आम्ही टाकळीकरग्रुपच्या माध्यमातून जलसंधारण चळवळीचे काम निश्चित प्रेरणादायी आहे. यासाठी अनेक भूमिपुत्र पुढे येत आहेत.
डॉ.बाळासाहेब बांडे, आम्ही टाकळीकर ग्राम विकास प्रतिष्ठान, टाकळी ढोकेश्वर