Savitribai Phule Pudhari
अहिल्यानगर

Savitribai Phule Teachers Literary Conference: सावित्रीबाई फुले जयंतीनिमित्त कर्जतमध्ये चौथे शिक्षिका साहित्य संमेलन

दादा पाटील महाविद्यालयात १४ शिक्षिकांना विविध स्त्रीसुधारकांच्या नावाने पुरस्कार प्रदान

पुढारी वृत्तसेवा

कर्जत: रयत शिक्षण संस्थेच्या येथील दादा पाटील महाविद्यालयाच्या मराठी विभागातर्फे भारतातील पहिल्या शिक्षिका ज्ञानज्योती सावित्रीबाई फुले यांच्या जयंतीनिमित्त चौथे शिक्षिका साहित्य संमेलन, शनिवारी (दि. 3 जानेवारी) महाविद्यालयाच्या शारदाबाई पवार सभागृहात आयोजित करण्यात आले आहे. विविध क्षेत्रात सावित्रीबाई फुले यांच्या विचारांचा वारसा पुढे चालविणाऱ्या, वैचारिक प्रबोधन करणाऱ्या शिक्षिकांना विविध स्त्रीसुधारकांच्या नावे वेगवेगळे चौदा पुरस्कार जाहीर करण्यात आले आहेत.

सामाजिक, शैक्षणिक आणि साहित्यविषयक योगदान देणाऱ्या पुरस्कार्थींमध्ये लक्ष्मीबाई भाऊराव पाटील यांच्या नावाचा पुरस्कार सरोज (माई) नारायण पाटील (कोल्हापूर), छत्रपती शिवाजी महाराजांसारख्या लोकराजाला घडविणाऱ्या राजमाता जिजाऊ यांच्या नावाने दिला जाणारा पुरस्कार छत्रपती शिवाजी महाराज यांच्या जीवनावर आधारित दर्जेदार पुस्तकांचे लेखन करणाऱ्या डॉ. स्नेहल तावरे (पुणे), चौंडी हे जन्मस्थान असणाऱ्या व भारतीय इतिहासात आदर्श राज्यकर्ती म्हणून कार्य करणाऱ्या पुण्यशलोक अहिल्याबाई होळकर यांच्या नावाने दिला जाणारा पुरस्कार ऊर्मिला भारत चव्हाण (सांगली), भारतातील पहिल्या शिक्षिका व स्त्री स्वातंत्र्याच्या उद्धारक क्रांतिज्योती सावित्रीबाई फुले यांच्या नावाने दिला जाणारा पुरस्कार बेबीताई गायकवाड (अहिल्यानगर), सावित्रीबाईंच्या खांद्याला खांदा लावून शिक्षिका म्हणून कार्य करणाऱ्या फातेमा शेख यांच्या नावाचा पुरस्कार उर्दू शाळेच्या नर्गिस नूरमोहम्मद शेख (बारागाव नांदूर), ‌‘स्त्री-पुरुष तुलना‌’ हा निबंध लिहून शेतकरी कुटुंबातील स्त्रीविषयक प्रश्नांना वाचा फोडणाऱ्या ताराबाई शिंदे यांच्या नावाचा पुरस्कार डॉ. कीर्ती मुळीक (पुणे), भारतातील पहिल्या कृतिशील स्त्री डॉक्टर असलेल्या डॉ. रखमाबाई राऊत पुरस्कार हेमलता पाटील (अहिल्यानगर).

पहिली बालनिबंधकार व म. फुले यांच्या शाळेत शिकणारी मुक्ता साळवे हिच्या नावाने दिला जाणारा पुरस्कार मनीषा गायकवाड (श्रीरामपूर), डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांची सावली म्हणून वावरणाऱ्या माता रमाई यांच्या नावाचा पुरस्कार अलका तालनकर-जोगी (अमरावती), लोकसाहित्यातून वास्तव लोकजीवन मांडणाऱ्या व परखड साहित्यविषयक भूमिका घेणाऱ्या दुर्गा भागवत यांच्या नावाचा पुरस्कार डॉ. ज्योती माने (वरवंड), कॉ. शरद पाटील यांच्याबरोबर आयुष्यभर आदिवासी भागात जनजागृतीचे कार्य करणाऱ्या व ‌‘आदोर‌’ हे आत्मकथन लिहिणाऱ्या नजुबाई गावित यांच्या नावाचा पुरस्कार स्वाती अहिरे (अकोले), फुले, शाहू, आंबेडकरांच्या विचारांना वाहून घेतलेल्या परदेशी विदुषी गेल ऑम्वेट यांच्या नावाचा पुरस्कार जयश्री पवार-राठोड (छ. संभाजीनगर), महर्षी धोंडो केशव कर्वे यांच्या स्त्रीशिक्षण व महिला सबलीकरण कार्यास तितक्याच ताकदीने पुढे नेणाऱ्या बाया कर्वे यांच्या नावाचा पुरस्कार मेधा जाधव (गोवा), तालुक्यातील लेखिका किंवा सामाजिक कार्य करणाऱ्या महिलेला-शिक्षिकेला दिला जाणारा ‌‘भूमिकन्या‌’ पुरस्कार सुनीता सुभाष सटाले (कर्जत) यांना देण्यात येणार आहे.

एकूण चौदा पुरस्कारांची घोषणा चौथे शिक्षिका साहित्य संमेलनाचे स्वागताध्यक्ष मा. राजेंद्र फाळके, निमंत्रक आ. रोहित पवार, संयोजक प्राचार्य डॉ. संजय नगरकर यांच्यातर्फे करण्यात आली आहे. या पुरस्कार निवडीकरिता साहित्यिक, सामाजिक क्षेत्रात योगदान देणाऱ्या महाराष्ट्रातील शिक्षिकांकडून, सामाजिक कार्य करणाऱ्या महिलांकडून परिचयपत्र मागविण्यात आले होते.

त्यातूनच प्रा. डॉ. महेबूब सय्यद, प्रा. डॉ. सुधाकर शेलार, डॉ. संजय बोरुडे, डॉ. संतोष पवार, अशोक निंबाळकर, डॉ. संजय नगरकर, स्वाती पाटील यांच्या निवड समितीने या पुरस्कारांची निवड केली. संमेलनात राज्यातील प्राथमिक, माध्यमिक, उच्च माध्यमिक व महाविद्यालयीन शाखेमध्ये सेवा करणाऱ्या शिक्षिकांनी सहभाग नोंदवावा, असे आवाहन प्राचार्य व संमेलनाचे संयोजक डॉ. संजय नगरकर यांनी केले आहे.

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

SCROLL FOR NEXT