

नगर : जागा 68 आणि इच्छुक अकराशेवर. त्यामुळे बंडखोरी अटळ असल्याचे चित्र समोर येत आहे. बंडखोरी टाळण्यासाठी महायुतीतील पक्षांनी खबरदारी म्हणून पक्षाचा एबी फॉर्म उमेदवारांकडे न देता थेट बंद पाकिटात निवडणूक निर्णय अधिकाऱ्यांकडे देण्याचे निर्णय घेतल्याची माहिती सूत्रांनी दिली. भाजप, राष्ट्रवादी आणि शिवसेनेतील संभाव्य उमेदवारांचे नाव टाकलेला एबी फॉर्म थेट निवडणूक निर्णय अधिकाऱ्यांकडे जमा करण्यात येणार आहे. त्यामुळे पक्षाचा अधिकृत उमेदवार कोण? हे 30 तारखेलाच स्पष्ट होणार आहे.
महायुतीतील तिन्ही राजकीय पक्षांनी इच्छुकांच्या मुलातखी घेतल्या. तिन्ही पक्षाकडे जागेच्या दुपटीपेक्षा अधिकांनी मुलाखती दिल्या. महायुतीतील तिन्ही पक्षांकडे मुलाखती दिलेल्या इच्छुकांची संंख्या सहाशे पार पोहचली आहे. जागा मात्र 68 आहे. उमेदवारी अर्ज दाखल करण्याची अंतिम मुदत 30 डिसेंबर आहे. इच्छुकांनी मात्र पक्ष आणि अपक्ष असे दोन उमेदवारी अर्ज दाखल करण्याची तयारी केली आहे. 30 डिसेंबरपूर्वी अधिकृत उमेदवारी जाहीर केली तर बंडखोरीचा धोका लक्षात घेता तिन्ही राजकीय पक्षांनी ‘बंद पाकिट’चा निर्णय घेतला आहे.
उमेदवारांची नावे टाकून पक्षाचा एबी फॉर्म निवडणूक निर्णय अधिकाऱ्यांकडे जमा केला जाणार आहे. त्यामुळे पक्षाचा अधिकृत उमेदवार कोण? हे तीस तारखेलाच समोर येणार आहे.
जागावाटपाची चर्चा सुरूच आहे. पक्षाकडून आलेले एबी फॉर्म उमेदवारांच्या हातात न देता थेट निवडणूक निर्णय अधिकाऱ्यांकडे दिले जाणार आहे.
अनिल शिंदे, जिल्हाप्रमुख, शिवसेना
पक्ष नेतृत्वाशी चर्चा केल्यानंतर उमेदवारांना एबी फॉर्म न देता थेट निवडणूक निर्णय अधिकाऱ्यांकडे दिले जाणार आहेत. जागा वाटपाची चर्चा सुरूच आहे.
संपत बारस्कर, शहर जिल्हाध्यक्ष