

संगमनेर: संगमनेर शहर परिसरात शुक्रवारी पहाटे दोन वेगवेगळ्या ठिकाणी केलेल्या कारवाईत पोलिसांनी गोमांससह 11 लाख 45 हजार 700 रुपये किमतीचा मुद्देमाल हस्तगत केला. कत्तलीसाठी आणलेल्या 16 गोवंशीय जनावरांची सुटका केली आहे. या घटनेत एक जण फरार झाला असून दोघांना अटक करण्यात आली.
पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार स्थानिक गुन्हे शाखेचे पोलिस निरीक्षक किरणकुमार कबाडी यांच्या मार्गदर्शनाखालील पथक संगमनेर शहर परिसरामध्ये गस्त घालत असताना मदिनानगर येथील एका पत्र्याच्या शेडमध्ये गोवंशीय जनावरांची कत्तल सुरू असल्याची माहिती मिळाली.
पथकाने शुक्रवारी (दि.26 ) पहाटेच्या सुमारास छापा टाकला असता, तीन इसम जनावरांची कत्तल करताना मिळून आले. पोलिसांना पाहताच मुख्य आरोपी कासिफ असद कुरेशी हा अंधाराचा फायदा घेऊन पळून गेला, मात्र पोलिसांनी इतर दोन आरोपी गुलाम फरिद जावेद कुरेशी (वय 30 वर्षे, रा. मोगलपुरा,) आणि मोहंमद वसीम मुबारक अली (वय 32 वर्षे, रा. उत्तर प्रदेश, सध्या रा. मदिनानगर, ) यांना ताब्यात घेतले. या ठिकाणाहून पोलिसांनी 9 लाख 30 हजार रुपये किमतीचे 3,110 किलो गोमांस आणि कत्तलीसाठी वापरली जाणारी 700 रुपये किमतीची कुऱ्हाड व सुरी असा एकूण 9 लाख 30 हजार 700 रुपयांचा मुद्देमाल जप्त केला आहे.
या प्रकरणी संगमनेर शहर पोलिस ठाण्यात दोन स्वतंत्र गुन्हे दाखल करण्यात आले आहेत. गुन्हे शाखेचे पोलिस निरीक्षक किरणकुमार कबाडी, उपनिरीक्षक महादेव गुट्टे, अंमलदार गणेश लोंढे, संतोष खैरे, अमृत आढाव, आमेल आजबे आणि अरुण मोरे यांच्या पथकाने ही कारवाई केली.
काटवनात लपवलेली जनावरांना जीवदान
गोपनीय माहितीच्या आधारे पोलिसांनी कोल्हेवाडी रोडवरील हाजीनगर येथील एका काटवनात छापा टाकला. तिथे 2 लाख 15 हजार रुपये किमतीची एकूण 16 लहान-मोठी गोवंशीय जनावरे विना चारा-पाणी अत्यंत निर्दयतेने बांधून ठेवलेली आढळली. ही जनावरे मुद्दस्सर हाजी कुरेशी (रा. भारतनगर, संगमनेर) याने कत्तलीच्या उद्देशाने आणली असल्याची माहिती समोर आली आहे. पोलिसांनी या सर्व जनावरांची सुटका केली असून मुद्दस्सर कुरेशी सध्या फरार आहे.