Power Cut Pudhari
अहिल्यानगर

Sangamner Power Cut: संगमनेरमध्ये वीज कपातीविरोधात ठिय्या आंदोलन; डॉ. जयश्रीताई थोरात आक्रमक

पाणीपुरवठा योजना बंद, शेतकरी-विद्यार्थी त्रस्त; दोन दिवसांत वीजपुरवठा सुरळीत करण्याचे आश्वासन

पुढारी वृत्तसेवा

संगमनेर: राज्यभरात उन्हाची तीव्रता वाढली आहे. पिकांना पाण्याची गरज आहे. अशा वेळी शेतकऱ्यांना अत्यंत कमी दाबाने व अवेळी वीज मिळत आहे. शालेय विद्यार्थ्यांचा परीक्षांचा काळ सुरू आहे. अनेक ठिकाणी वीज पुरवठा बंद होत आहे. भर उन्हाळ्यामध्ये ग्रामपंचायतींसाठी असलेल्या पाणीपुरवठा योजनांचे वीज कनेक्शन कट केल्याने अनेक नागरिकांचे पिण्याच्या पाण्याचे हाल होत आहे. या सर्व गलथान कारभार विरोधात डॉ.जयश्रीताई थोरात यांच्या नेतृत्वात वीज वितरण विभागाच्या कार्यकारी अभियंता यांच्या कार्यालयात ठिय्या आंदोलन करण्यात आले.

संगमनेर शहर व तालुक्यामध्ये वीजपुरवठा होत नाही. याचबरोबर वीजपुरवठा वारंवार खंडित होत असून अनेक ठिकाणी अडचणी निर्माण झाल्या आहेत. शालेय विद्यार्थ्यांच्या परीक्षा सुरू असून त्यांनाही अभ्यासाकरता वीज उपलब्ध होत नाही. गावोगाव पाणीपुरवठा योजनांची वीज कनेक्शन तोडल्यामुळे प्यायला पाणी मिळत नाही. या गलथान कारभाराविरोधात युवक काँग्रेसने काल ठिय्या आंदोलन केले.

यावेळी अजय फटांगरे, नवनाथ आरगडे, पद्माताई थोरात, प्रमिला अभंग, योगिता सातपुते, प्रदीप हासे, राजू खरात, प्रवीण गायकवाड, बाळासाहेब वाळके, रोहिणीताई गुंजाळ, नानासाहेब दिघे, किरण खुळे, सचिन गोरडे, तात्या कुटे, भास्कर शर्माळे, राजू गुंजाळ, दिगंबर इंगळे, भाऊसाहेब दिघे, प्रा. सत्यजित थोरात, शेखर सोसे, शिवाजी गुंजाळ, दत्तात्रय खुळे, संजय कुटे, योगेश पोकळे यांच्यासह सुमारे 100 कार्यकर्ते उपस्थित होते. दरम्यान, येत्या एक-दोन दिवसांमध्ये तातडीने वीजपुरवठा सुरळीत करू असे आश्वासन मुख्य कार्यकारी अभियंता प्रदीप वट्टमवार यांनी दिल्याने आंदोलन स्थगित करण्यात आले.

पाणीप्रश्नासह उकाडा अन शैक्षणिक नुकसानही

सध्या राज्यभरात उष्णतेची लाट निर्माण झाली आहे. पिण्याच्या पाण्याची गरज वाढली आहे. अनेक गावांमध्ये नागरिकांना सुविधा देणे ही प्रशासनाची जबाबदारी आहे. अशी परिस्थिती असताना सरकारने मात्र गावोगावी असलेल्या पाणीपुरवठा योजनांची लाईट बंद केली आहे. एकीकडे विद्यार्थ्यांच्या परीक्षा सुरू आहेत. शहरांमध्ये अनेक रुग्ण दवाखान्यांमध्ये ॲडमिट असतात. शेतकऱ्यांना वेळेवर लाईट मिळत नाही. या ढिसाळ कारभारामुळे शेतकरी, विद्यार्थी व महिला त्रस्त झाले आहेत, त्यामुळे काँग्रेसने हे आंदोलन पुकारल्याचे डॉ.जयश्रीताई थोरात म्हणाल्या.

पाणी योजना बंद झाल्याने महिलांचे हाल

गुंजाळवाडी, वडगाव पान, समनापूर, खांडगाव यांसह विविध गावांमधील पाणीपुरवठा योजनांची वीज कट झाल्याने पाणीपुरवठा योजना बंद झाल्या आहेत. त्यामुळे भर उन्हाळ्यात पाण्यासाठी महिला व नागरिकांना मोठा त्रास होत आहे. एका बाजूला मोठमोठे भांडवलदार, कंपनी मालक, उद्योजक यांना वीज बिल माफ केले जाते. मात्र शेतकऱ्यांना आणि पाणीपुरवठा योजनांना कोणतीही सवलत दिली जात नाही, हा कोणता न्याय आहे. तरी महावितरण विभागाने वीज वितरणासाठी प्राधान्यक्रम ठरवला पाहिजे, असेही थोरात म्हणाल्या.

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

SCROLL FOR NEXT