संगमनेर: संगमनेर नगरपालिकेच्या विविध विषय समित्यांची निवड प्रक्रिया सोमवारी पार पडली. बांधकाम आरोग्य, शिक्षण, पाणी पुरवठा यासह विविध समित्यांच्या सभापतीची निवड करण्यात आली. यामुळे गेल्या अनेक दिवसांपासूनची प्रतीक्षा अखेर संपली आहे. आता खऱ्या अर्थाने नगरपालिका कामकाजात सुधारणा होईल, अशी नागरिक व्यक्त करीत आहेत.
पालिकेत संगमनेर सेवा समितीची सत्ता आल्यानंतर विषय समितीच्या निवडीकडे लक्ष लागले होते. पालिकेच्या रामकृष्ण सभागृहात तहसीलदार धीरज मांजरे यांच्या अध्यक्षतेखाली नवनिर्वाचित नगरसेवकांची बैठक पार पडली. यावेळी नगराध्यक्षा डॉ. मैथिली तांबे, उपनगराध्यक्ष नूर मोहम्मद शेख व मुख्याधिकारी दयानंद गोरे उपस्थित होते. एकहाती सत्ता असल्यामुळे बैठकीत सर्व निवडी बिनविरोध करण्यात आल्या. स्थायी समितीच्या पदसिद्ध सभापती पदी नगराध्यक्षा डॉ. मैथिली तांबे यांची निवड झाली. सदस्यपदी शेख नूरमोहम्मद, किशोर पवार, अनुराधा सातपुते, सरोजना पगडाल, किशोर टोकसे, डॉ. दानिशखान पठाण, दिलीप पुंड व विश्वास मुर्तडक यांचा समावेश आहे.
सार्वजनिक बांधकाम समितीच्या सभापतीपदी किशोर हिरालाल पवार यांची निवड झाली. या समितीत सौरभ कासार, गजेंद्र अभंग, गणेश गुंजाळ, अमजदखान पठाण, शैलेश कलंत्री, नंदा गरुडकर, योगेश जाजू व साक्षी सूर्यवंशी सदस्यपदी आहेत. शिक्षण समिती सभापतीपदी डॉ. अनुराधा सातपुते तर, सदस्यपदी सीमा खटाटे, वनिता गाडे, गणेश गुंजाळ, प्रियांका शाह, नंदा गरुडकर, शेख दिलशाद, रचना मालपाणी व साक्षी सूर्यवंशी यांची निवड करण्यात आली आहे. स्वच्छता वैद्यक व सार्वजनिक आरोग्य समितीच्या सभापतीपदाची जबाबदारी किशोर टोकसे तर, सदस्यपदी प्रियांका शाह, शैलेश कलंत्री, सीमा खटाटे, सौरभ कासार, शोभा पवार, अमजदखान पठाण, जावेद खान पठाण व साक्षी सूर्यवंशी यांची वर्णी लागली आहे.
पाणीपुरवठा व जलःनिस्सारण समिती सभापतीपदी मुजीबखान पठाण तर, सदस्यपदी भारत बोऱ्हाडे, अर्चना दिघे, शोभा पवार, मालती डाके, नितीन अभंग, विजया गुंजाळ, सोमेश्वर दिवटे व साक्षी सूर्यवंशी यांचा समावेश आहे. महिला व बालकल्याण समिती सभापतीपदी सरोजना पगडाल तर, उपसभापतीपदी प्रिया काशीद यांची निवड झाली. या समितीमध्ये अर्चना दिघे, वनिता गाडे, दिपाली पंचारिया, विजया गुंजाळ, शकीला बेग, रचना मालपाणी व साक्षी सूर्यवंशी हे सदस्यपदी आहेत. नियोजन व विकास समितीचे पदसिद्ध सभापती उपनगराध्यक्ष नूरमोहम्मद शेख आहेत तर, भारत बोऱ्हाडे, गजेंद्र अभंग, मालती डाके, नितीन अभंग, दीपाली पंचारिया, योगेश जाजू, जावेद खान पठाण व साक्षी सूर्यवंशी यांची सदस्यपदी निवड करण्यात आली.
पहिल्याच बैठकीत ढिसाळपणा उघड!
सभागृहात प्रशासनाच्या कामातील ढिसाळपणा पहिल्याच बैठकीत उघड झाला. सकाळी 11 वाजता सुरू झालेली बैठक दुपारी उशिरापर्यंत सुरुच होती, मात्र निवडी जाहीर झाल्यानंतर सायंकाळी उशिरापर्यंत संबंधित अधिकारी किंवा पदाधिकाऱ्यांकडून माध्यमांना माहिती देण्यात आली नाही. अखेर मुख्याधिकारी दयानंद गोरे यांच्याशी संपर्क साधला असता, बैठकीमध्ये होतो, असे सांगत त्यांनी काहीसा सकारात्मक प्रतिसाद दिला.