संगमनेर: संगमनेर नगरपालिका निवडणुकीसाठी आज शुक्रवार (दि.21) अर्ज माघारीचा शेवटचा दिवस आहे. आज कोणाला उमेदवारी मिळणार आणि त्यांच्यासाठी कोणाकोणाला माघार घ्यावी लागणार, हे स्पष्ट होणार आहे. मात्र, या घडामोडीत सर्वच पक्षांना मोठ्या नाराजीनाट्याला सामोरे जावे लागणार असून, यातून बंडखोरीचेही पिकं जोमात उगवणार असल्याचे संकेत आहेत. या घडामोडींकडे संगमनेरकरांचे लक्ष लागले आहे. महायुती व महाविकास आघाडीत बंडखोरी झाल्याने स्थानिक नेत्यांची डोकेदुखी वाढली आहे.यातच राष्ट्रवादी अजित पवार गटाने आपले उमेदवार उभे करून आव्हान उभे केले आहे. यामुळे महायुतीत अंतर्गत धुसपुस वाढली आहे.
संगमनेर नगरपालिकेचे निवडणूक यंदा चुरशीची होणार आहे. निवडणूक अर्ज भरण्याच्या अखेरच्या दिवशी चित्र स्पष्ट झाले. यात महायुतीच्या वतीने शिवसेना, भाजपा, राष्ट्रवादीने आपले स्वतंत्र उमेदवार उभे केले. यामुळे महायुतीत बिघाडी झाल्याचे चित्र आहे. शिवसेना ठाकरे गटाकडूनही अनेकांनी अर्ज भरले असून अपक्ष उमेदवारांनीही डोकेदुखी वाढवली आहे. उमेदवारी अर्ज आज शुक्रवारी (दि.21) माघारी घेण्याचा शेवटचा दिवस आहे. या नंतर चित्र स्पष्ट होणार असून गुरुवारी (दि.26) चिन्ह वाटप होणार आहे. दि. 22 ते 25 असे चार दिवस अपिल असल्यास त्यावर निर्णय होणार आहे. नगराध्यक्ष पदासाठीही शिवसेना, भाजपा, राष्ट्रवादी व अपक्ष उमेदवारांनीही अर्ज भरल्याने इच्छुकांची संख्या वाढली आहे.
माघारी नंतरच खर्या अर्थाने निवडणूक प्रचाराला सुरुवात होणार असली तरी पक्षाच्या व काही अपक्षांनीही प्रचाराला सुरवात केली आहे. रात्री थंडीतही प्रभागातील गल्ली, कॉलनी, चौकात उमेदवार प्रचार करत असल्याने निवडणुकीचे थंडीतही वातावरण चांगलेच तापले आहे. रंगार गल्ली, चंद्रशेखर चौक, नेहरू चौक, सय्यद बाबा चौक, मोमीनपुरा, जोर्वे नाका, पुणे नाका, दिल्ली नाका, नेहरू चौक, नविन नगर रोड, शिवाजी नगर,जनता नगर, इंदिरा नगर, अकोल नाका, माळी वाडा, साई नगर, गणेश नगर, साळी वाडा, मालदाड रोड, बाजारपेठ, मेनरोड, विद्या नगर आदिसह उपनगरात दिवसा व रात्री उमेदवार, पदाधिकारी, कार्यकर्ते फिरतांना दिसत आहे.
माजीमंत्री बाळासाहेब थोरात, माजी आमदार डॉ. सुधीर तांबे, आमदार सत्यजित तांबे, माजी नगराध्यक्षा दुर्गाताई तांबे हे त्यांच्या उमेदवारांचा प्रचार करत आहे. तर आमदार अमोल खताळ हे एकाकी किल्ला लढवत आहेत. राष्ट्रवादी अजित पवार गटाचे कपिल पवारही प्रचारात उतरले आहे. काही प्रभागात अपक्ष उमेदवारांनी आव्हान उभे केले आहे. संगमनेर सेवा समिती, भाजपा, दोन्ही शिवसेना, राष्ट्रवादी अजित पवार गट, अपक्ष असे सर्वच मैदानात उतरले आहे. आमदार सत्यजित तांबेंनी ‘समिती’चे सुत्रे हाती घेतले आहेत.
चुरस आणि प्रतिष्ठेची लढाई
संगमनेर नगर पालिकेची यंदाची निवडणूक ही चुरशीची आणि तितकीच प्रतिष्ठेची होणार आहे. महायुती व संगमनेर सेवा समितीचे उमेदवार जाहीर झाल्यानंतर निवडणुकीची रंगत वाढली आहे. माजीमंत्री बाळासाहेब थोरात यांच्या मार्गदर्शनात आमदात सत्यजित तांबे हे सेवा समितीचे नेतृत्व करत आहे. तर आमदार अमोल खताळ हे महायुती म्हणून प्रचार करत आहेत. त्यांना पालकमंत्री राधाकृष्ण विखे पाटील आणि माजी खा. डॉ. सुजय विखे पाटील यांची मदत मिळेल, असे गाह्य धरले जात आहेत.