

नगर: वैश्विक दिव्यांगत्व प्रणालीचा आयडी व पासवर्ड चोरी करुन, बनावट दिव्यांग प्रमाणपत्र तयार करणारी टोळी जेरबंद करण्यात आर्थिक गुन्हे शाखेला यश आले आहे. याप्रकरणात आरोपींची संख्या नऊ झाली असून, 142 दिव्यांग प्रमाणपत्र प्रशासनाच्या रडारवर आले आहेत. जिल्हा शल्यचिकित्सकांना संबंधित प्रमाणपत्रांबाबत माहिती सादर करण्याचे आदेश बजाविण्यात आले आहेत.
जिल्हा शासकीय रुग्णालयाचे अतिरीक्त जिल्हा शल्य चिकित्सक, यांनी वैश्विक दिव्यांगत्व प्रणालीचा आयडी व पासवर्ड चोरीस गेल्याबाबत तोफखाना पोलिस स्टेशनमध्ये गुन्हा दाखल केला आहे. या गुन्हयाचा पुढील तपास पोलिस अधीक्षक सोमनाथ घार्गे यांनी आर्थिक गुन्हे शाखेकडे वर्ग केला आहे. या गुन्हयाचा पुढील तपास पोलिस उपअधिक्षक यांचे आदेशाने सहायक पोलिस निरीक्षक योगेश जाधव हे करत आहेत.
या गुन्हयाचे आर्थिक गुन्हे शाखेने केलेले तपासात सिव्हील हॉस्पीटल अहिल्यानगर येथून एकूण 142 दिव्यांग प्रमाणपत्रे हे डबल जावक क्रमांक नोंदवून संशयास्पद रित्या देण्यात आले असल्याचे दिसून आले आहे. या बाबत माहिती सादर करण्याकरीता जिल्हा शल्यचिकीत्सक डॉ. संजय घोगरे यांना नोटीस बजावण्यात आली आहे.
पोलिस अधीक्षक घार्गे यांनी स्वतः तपासात लक्ष घालुन जिल्हा शल्य चिकित्सक, अहिल्यानगर यांना 142 प्रकरणांची माहिती तत्काळ सादर करण्यासाठी सुचना केलेल्या आहेत, तसे आदेश दिले आहेत. या गुन्ह्याच्या तपासात एकूण 9 आरोपी निष्पन्न झालेले असून गुन्हयाचे पुढील तपासात आरोपींची संख्या वाढण्याची शक्यता आहे.
बनावट दिव्यांग प्रमाणपत्रांचे तपासात तांत्रीक मदत घेवून आरोपी निष्पन्न करण्याची कारवाई सुरू आहे. तसेच सदर गुन्ह्याचा पुढील तपास हा पोलिस अधीक्षक, अहिल्यानगर यांचे मार्गदर्शनानुसार चालू आहे.