

नगर: अहिल्यानगर महानगरपालिका सार्वत्रिक निवडणुकीसाठी तीन लाख सात हजार नऊ मतदार असल्याचे प्रथमदर्शनी स्पष्ट झाले आहे. आयुक्त यशवंत डांगे यांनी गुरुवारी (दि.20) प्रारुप मतदारयाद्या प्रसिध्द केल्या. या याद्या महापालिकेचे मुख्य प्रशासकीय कार्यालय तसेच मनपा संकेतस्थळावर उपलब्ध केल्या आहेत. या याद्यावर 27 नोव्हेंबरपर्यंत नागरिकांकडून हरकती मागविण्यात आलेल्या आहेत.
महापालिकेच्या 17 प्रभागातील 68 जागांसाठी येत्या काही महिन्यांत सार्वत्रिक निवडणूक होणार आहे. या निवडणुकीसाठी प्रभागरचना, आरक्षण सोडत आणि मतदार याद्या आवश्यक आहेत. त्यानुसार आयुक्त यशवंत डांगे यांनी गुरुवारी(दि.20) प्रारुप मतदारयाद्या प्रसिध्द केल्या आहेत. मतदार याद्या प्रसिध्द करण्यासाठी 1 जुलै 2025 रोजी अस्तित्वात असलेल्या विधानसभेच्या मतदारयादीचा आधार घेण्यात आला आहे. या विधानसभेच्या मतदारयादीचे प्रभागनिहाय विभाजन करून अहिल्यानगर महानगरपालिका निवडणुकीसाठी प्रारूप मतदार याद्या तयार करण्यात आल्या असून, प्रभाग क्रमांक 1 ते 17 मध्ये विभागून प्रभागनिहाय छापून घेत अधिप्रमाणित केलेली आहे.
नागरिकांना अहिल्यानगर महापालिकेचे संकेतस्थळ ुुु.राल.र्सेीं.ळप येथे फोटो विरहित मतदार यादी निःशुल्क बघण्यासाठी उपलब्ध असल्याचे मनपा आयुक्त डांगे यांनी सांगितले. या प्रारुप मतदारयाद्यांबाबत काही हरकती व सूचना असल्यास त्या लेखी स्वरुपात 20 नोव्हेंबर ते 27 नोव्हेंबरअखेरपर्यंत महापालिका मुख्य कार्यालय (नविन प्रशासकीय इमारत), प्रभाग समिती कार्यालय क्र. 1 सावेडी, प्रभाग समिती कार्यालय क्र. 2 शहर, प्रभाग समिती कार्यालय क्र.3 झेंडीगेट, प्रभाग समिती कार्यालय क्र.4 बुरुडगाव या ठिकाणी स्वीकारल्या जाणार आहेत.
या हरकतींवर होणार विचार
विधानसभा मतदारयादीत नसलेली कोणतीही नवीन नावे समाविष्ट करण्याचे अथवा मूळ विधानसभा मतदारयादीत असलेली नावे वगळण्याचे तसेच त्यामध्ये कोणत्याही दुरुस्त्या करण्याचे अधिकार राज्य निवडणूक आयोगास किंवा राज्य निवडणूक आयोगाने मतदार यादीसाठी प्राधिकृत केलेल्या अधिकाऱ्यांना नाही. प्रारुप मतदारयादींबाबत काही हरकती दाखल करण्यासाठी मतदारांनी नमुना ‘अ’ मध्ये आणि तक्रारदारांनी नमुना ‘ब’मध्ये दाखल कराव्यात. प्राप्त हरकतींत लेखनिकांच्या काही चुका, दुसऱ्या प्रभागातील मतदार चुकून अंतर्भूत झालेले, संबंधित प्रभागातील विधानसभा मतदारयादीत नावे असूनही महापालिकेच्या संबंधित प्रभागाच्या मतदारयादीमध्ये नावे वगळण्यात आली असल्यास अशा मतदारांची नावे मतदार यादीत समाविष्ट करणे, मृत व्यक्तींची नावे आढळल्यास किंवा त्याबाबत हरकती किंवा सूचना प्राप्त झाल्यास अशा सुधारणा वा दुरूस्ती करता येतील, असे आयुक्त डांगे यांनी प्रसिध्दीपत्रकात म्हटले आहे.
अंतिम मतदारयादी 5 डिसेंबरला
महापालिकेची प्रभागनिहाय अंतिम मतदारयादी 5 डिसेंबर रोजी प्रसिध्द केली जाणार आहे. 8 डिसेंबर रोजी मतदान केंद्रांचीयादी जाहीर होणार असून, 12 डिसेंबर रोजी मतदान केंद्रनिहाय मतदारयादी जाहीर होणार आहे.