संगमनेर: माजी मंत्री थोरात यांच्या संकल्पनेतून बनवलेले हायटेक बसस्थानक ही शहराची मोठी ओळख आहे. मात्र, मागील एक वर्षांमध्ये या परिसराचे फ्लेक्समुळे विद्रूपीकरण झाले होते. दरम्यान, आमदार सत्यजित तांबे यांच्या नेतृत्वात सेवा समितीला मिळालेल्या मोठ्या यशानंतरही फ्लेक्स बंदी कायम ठेवण्यात आली.
तसेच यापुढेही अनाधिकृत एकही फ्लेक्स लागता कामा नये, अशा सूचनाही पालिका प्रशासनाला दिल्याचे समजले त्यामुळे या फ्लेक्समुक्तीतून बस स्थानकासह मुख्य रस्त्यांनी मोकळा श्वास घेतल्याचे दिसले. माजी मंत्री बाळासाहेब थोरात व आमदार सत्यजित तांबे यांच्या मार्गदर्शनाखाली संगमनेर सेवा समितीच्या नगराध्यक्ष डॉ.मैथिलीताई तांबे व 27 नगरसेवकांना संगमनेर शहरातील जनतेने मोठ्या मताधिक्याने विजयी केले.
हा महाराष्ट्रातील अव्वल विजय ठरला. तत्पूर्वी, निवडणूक प्रचारामध्ये आमदार सत्यजित तांबे यांनी संगमनेर शहरात फ्लेक्सच्या माध्यमातून होणारे विद्रूपीकरण थांबवले जाईल, असे सूचित केले होते. याचबरोबर दिवाळीच्या पूर्वी त्यांनी स्वतःचे फ्लेक्स स्वतःकाढून घेतले होते. फ्लेक्समुक्तीसाठी संगमनेरमधील अनेक समाजसेवी संघटना, बसस्थानकावरील गाळेधारक, युवक संघटना यांनीही वेळोवेळी आंदोलने केली. दरम्यान, कोणतेही विकास काम न करता फक्त फ्लेक्सबाजी करणे किंवा कोणत्याही समाजकार्यात योगदान न देता सामाजिक कार्यकर्ता म्हणून फ्लेक्स लावणे, हा मोठा उद्योग संगमनेरमध्ये सुरू होता.
यावर आमदार सत्यजित तांबे यांनी अनधिकृत कोणाचाही फ्लेक्स लागणार नाही, अशी सूचना प्रशासनाला केली. यामुळे अशा फ्लेक्सबाजांना मोठी चपराक मिळाली आहे. शिवाय, निवडणुकीतील मोठ्या यशानंतरही सेवा समितीने कुठेही फ्लेक्सबाजी न करता आपले पहिले वचन पूर्ण केल्याचे बोलले जाते.
फ्लेक्स बाज नेत्यांना चपराक; घुलेंचा दावा
मागील एक वर्षापासून संगमनेर शहर व तालुक्यामध्ये काम न करता फ्लेक्स बाजी सुरू आहे. संस्कृत संगमनेरकरांना हे मान्य नाही. सेवा समितीच्या मोठ्या घवघवीत यशानंतर फ्लेक्सबाज नेत्यांना मोठी चपराक बसली असल्याचे संगमनेर मधील अनिकेत घुले व रमेश गफले यांच्यासह विविध युवक आणि नागरिकांनी म्हटले आहे.