संगमनेर: माजी मंत्री बाळासाहेब थोरात यांच्या नेतृत्वाखाली संगमनेर शहर हे विकसित यांनी वैभवशाली शहर म्हणून ओळखले जाते. मात्र मागील एक वर्षापासून संगमनेर शहरांमध्ये अमली पदार्थांची तस्करी, गुन्हेगारी, दहशत, चोऱ्यांचे प्रमाण वाढले असून हे तातडीने थांबवा अशी मागणी महिला पदाधिकाऱ्यांनी एकत्र येवून पोलिसांना केली. यावेळी पोलिस प्रशासनावर संतप्त महिलांनी प्रश्नांचा भडीमार केला.
नगराध्यक्ष डॉ मैथिलीताई तांबे व माजी नगराध्यक्ष दुर्गाताई तांबे यांच्या नेतृत्वाखाली संगमनेर शहरातील विविध महिलांनी शहर पोलिस निरीक्षक बारवकर यांना याबाबतचे निवेदन दिले. यावेळी दिपाली पंचारिया, सरोजिनी पगडाल, वनिता गाडे, नंदा गरुडकर, अनुराधा सातपुते, सीमा खटाटे, विजया गुंजाळ, मंगल कासार, सुषमा भालेराव, मीना सोसे, उज्वला पगार, मुमताज सौदागर, शोभा तुपे, मोहिनी बनसोडे, वैशाली कोल्हे, सोनिया थोरात, शिवानी गाडे, सुविधा आरसिद्ध, सुनीता कांदळकर, वर्षा भोंडे, मनीषा शिंदे, ज्योती दारोळे, कीर्ती मुळे, दीपा कलंत्री, मीनल निऱ्हाळी, कल्पना कुटे, स्नेहलता एखंडे, कोमल दायमा आदी उपस्थित होत्या.
संगमनेर शहरामध्ये सध्या अमली पदार्थांचा अवैध व्यवसाय मोठ्या प्रमाणात वाढलेला आहे. यामुळे शहरातील तरुण पिढी व्यसनाधीन होत आहे. या पार्श्वभूमीवर शहरातील कायदा व सुव्यवस्था अबाधित राखण्यासाठी पोलिसांची गस्त वाढवणे, पेट्रोलिंगची राऊंड वाढवणे, संशयित व्यक्तींवर सातत्याने लक्ष ठेवणे.
तसेच अमली पदार्थाची अवैध विक्री करणाऱ्यांवर कठोर कारवाई करणे अत्यंत आवश्यक असल्याचे यावेळी सांगण्यात आले. हे निवेदन पोलीस निरीक्षक बारवकर यांनी स्वीकारले व तातडीने कार्यवाही करण्याचे आश्वासन दिले.
गुन्हेगारीमुळे बदलते संगमनेर दुर्दैवी: तांबे
माजीमंत्री बाळासाहेब थोरात यांच्या मार्गदर्शनाखाली संगमनेर तालुक्याची जिल्ह्यात व राज्यात वेगळी ओळख आहे. मात्र अलीकडच्या काळात गुन्हेगारी वाढल्याने कायदा व सुव्यवस्थेच्या दृष्टीने अधिक दक्षता घेणे गरजेचे आहे. सध्या शहरात गुन्हेगारी, अमली पदार्थांची तस्करी, चोरी अशा घटना रासरोसपणे घडत आहे हे अत्यंत दुर्दैवी आहे. पोलिस प्रशासनाने या तातडीने लक्ष घालून दोषी व्यक्तींवर तातडीने कारवाई करणे गरजेचे आहे, असे माजी नगराध्यक्षा दुर्गाताई तांबे म्हणाल्या.