नगर तालुका: छत्रपती संभाजीनगर महामार्गालगत रस्त्याच्या दुतर्फा कचऱ्याचे मोठमोठे ढीग साचलेले असून, हा परिसर ‘कचरा डेपो’ झाल्याचे चित्र पहावयास मिळत आहे. अहिल्यानगर शहरापासून जवळ असणारी जुनी बारव व गजराजनगर चौक परिसरात रस्त्याच्या दुतर्फा कचराच कचरा पडल्याचे दिसून येते. परिसरात मोठी दुर्गंधी सुटली असून, नागरिकांच्या आरोग्याचा प्रश्नही निर्माण झाला आहे.
महामार्गावरून येणाऱ्या-जाणाऱ्या नागरिकांनाही कचऱ्याच्या दुर्गंधीचा मोठा त्रास सहन करावा लागतो. वांबोरी फाटा परिसरातही मोठ्या प्रमाणात कचरा आणून टाकला जात असल्याने नागरिकांमधून संताप व्यक्त केला जात आहे.
छत्रपती संभाजीनगर महामार्ग परिसरात गेल्या अनेक महिन्यांपासून ठिकठिकाणी कचरा आणून टाकला जात आहे. कचऱ्याची योग्य विल्हेवाट लावली जात नसल्याने त्याचा मोठा त्रास नागरिकांना सहन करावा लागत आहे.
शहरातील नागरिक व व्यावसायिकांकडून महामार्गालगत कचरा आणून टाकला जात असल्याचा आरोप नागरिकांमधून केला जात आहे. कचऱ्यामुळे या परिसरात भटक्या कुत्र्यांची संख्याही वाढली आहे. त्यामुळे छत्रपती संभाजीनगर महामार्गावर ठिकठिकाणी टाकलेल्या कचऱ्याची योग्य विल्हेवाट लावण्यात यावी, तसेच या ठिकाणी कचरा टाकणाऱ्यांवर कडक कारवाई करण्याची मागणी नागरिकांमधून होत आहे.
महामार्गालगत स्वच्छता मोहीम राबविण्याची गरज!
शहरापासून धनगरवाडीपर्यंत रस्त्याच्या दुतर्फा ठिकठिकाणी कचऱ्याचे ढीग आढळून येत आहेत. महामार्गावरून जाताना-येताना मोठ्या दुर्गंधीचा त्रास सहन करावा लागतो. भटक्या कुत्र्यांच्या वाढत्या संख्येमुळे बिबट्यांचा वावर शहराजवळ आढळून येत आहे. त्यास महामार्गालगत असणारा कचरा जबाबदार आहे. त्यामुळे महामार्गालगत स्वच्छता मोहीम राबवून रस्त्याच्या दुतर्फा असणाऱ्या कचऱ्याची विल्हेवाट लावण्याची मागणी महामार्गालगतच्या ग्रामस्थांमधून होत आहे.