नगर: भोंदू अशोक खरात नॉमिनी असलेल्या कोट्यवधीच्या संशयास्पद व्यवहारात संशयाच्या गर्तेत सापडलेली ‘समता पतसंस्था’ पोलिस आणि ईडी तपासानंतर आता सहकार विभागाच्याही रडारवर आली आहे. समता पतसंस्थेच्या राहाता शाखेतील ‘त्या’ खातेदारांची ई केवायसी तपासणीसाठी जिल्हा उपनिबंधकांच्या अध्यक्षतेखाली त्रिसदस्यीय समितीची नियुक्त करण्यात आली आहे. समितीने तपासणीचा वस्तुनिष्ठ अहवाल सादर करण्याचे आदेश सहकार आयुक्त व निबंधक दीपक तावरे यांनी दिले आहेत.
नाशिकचा भोंदू खरात नॉमिनी असलेली सुमारे शंभर खाती समता पतसंस्थेच्या राहाता शाखेत वेगवेगळ्या नावांनी असल्याचे पोलिस तपासात समोर आले. या खात्यांत सुमारे 60 कोटींहून अधिक व्यवहार झाल्याची माहिती या तपासात समोर आल्यानंतर ‘पुढारी’ने त्यावर 3 एप्रिलच्या अंकात प्रकाशझोत टाकला. शिर्डी पोलिसांनी समतामधील शंभर संशयास्पद खातेदारांची चौकशी करत खातेदारांचे जबाब नोंदविले आहेत. या जबाबांनुसार 50 हून अधिक खातेदारांनी कागदपत्रे आपली असल्याचे कबूल केले; मात्र त्यावरील सहीचा इन्कार केला. या जबाबानंतर ‘समता’तील ती खाती ईडीच्या रडारवर आली.
मुंबईचे उद्योजक दिनेश परब यांनी शिर्डी पोलिसांत राहाता शाखेचा व्यवस्थापक आणि भोंदू खरात विरोधात फिर्याद दिली आहे. त्यानुसार पोलिसांत तसा गुन्हाही नोंदवण्यात आला आहे. पोलिस तपासात ‘समता’च्या राहाता शाखेतील खाते आणि त्यावरील व्यवहारावर संशय निर्माण झाला आहे. ‘ईडी’नेही ‘समता’च्या राहाता शाखेची तपासणी करत काही महत्त्वपूर्ण कागदपत्रे, तसेच डिजीटल पुरावे संकलित केले. शिर्डी पोलिस आणि ईडीचा तपास सुरू असतानाच, आता सहकार विभागानेही या प्रकरणाच्या चौकशीचा निर्णय घेतला आहे. सहकार आयुक्त दीपक तावरे यांनी आदेशात कोपरगावच्या समता नागरी पतसंस्थेबाबत ‘पुढारी’चा स्पष्टपणे उल्लेख केला आहे.
समता पतसंस्थेच्या राहाता शाखेमध्ये वेगवेगळ्या लोकांच्या नावे खाते उघडून एकाच व्यक्तीच्या नावे व्यवहार केलेले आहेत. तसेच संबंधित खात्यांना एकच व्यक्ती वारसदार आहे. या खात्यांच्या केवायसी पूर्ततेबाबत शंका उपस्थित होत असून, त्यावर व्यवहार झाल्याचेही नमूद करण्यात आले आहेत. त्यामुळे ‘समता’च्या राहाता शाखेतील खात्यांची चौकशी करण्याचे आदेशात म्हटले आहे.
सोनेतारण आणि कर्जाचे व्याजदरही तपासणार?
समता पतसंस्थेतील एक लाखाच्या आतील कर्जावरील व्याजदर आणि सोनेतारण संदर्भातील व्यवहारांचीही पडताळणी होणार का? याबाबत मात्र संदिग्धता असल्याचे दिसते. ‘आजपर्यंत तरी असे कोणतेही आदेश नाहीत, मात्र वरिष्ठांचे आदेश आले तर तशी कार्यवाही केली जाईल, असे स्पष्टीकरण सहकार विभागातील उच्चपदस्थ अधिकाऱ्यांकडून देण्यात आले.
यांची होणार तपासणी?
समता पतसंस्थेच्या राहाता शाखेतील सर्व खात्यांची केवायसी तपासली जाणार आहे. खातेदारांचे बँक खाती उघडताना किंबहुना त्यांना सभासदत्व देताना भरलेले अर्ज, त्यावरील स्वाक्षऱ्या, वारसदार, मोबाईल लिकिंगची पडताळणी केली जाणार आहे. तसेच संशयास्पद खात्यांवरील व्यवहार आणि विशेषतः ठेवींबाबतही चौकशी होण्याची शक्यता सूत्रांनी वर्तविली. त्यानंतर चौकशी अहवाल सहकार आयुक्तांना दिला जाणार असल्याचे सांगण्यात आले.
चौकशी समितीत तीन उच्चपदस्थ अधिकारी
‘समता’च्या राहाता शाखेतील संशयास्पद खातेदारांची केवायसी तपासणी करण्यासाठी त्रिसदस्यीय समितीची स्थापना करण्यात आली आहे. जिल्हा उपनिबंधक मंगेश सुरवसे हे या समितीचे अध्यक्ष तर जिल्हा विशेष लेखापरीक्षक गौतम निकाळजे आणि सहायक निबंधक गणेश औटी हे सदस्य आहेत. या समितीने सहकार कायदा नियम तसेच सहकार आयुक्त कार्यालय व नियामक मंडळाने निर्गमित केलेली परिपत्रके आणि आयकर कायद्यातील तरतुदी विचारात घेऊन स्वयंस्पष्ट चौकशी अहवाल पंधरा दिवसांत सादर करण्याचे चौकशी आदेशात म्हटले आहे.
सहकार आयुक्तांच्या आदेशानुसार तपासणीसाठी आवश्यक माहिती उपलब्ध करून देण्याबाबत समता पतसंस्थेला पत्र दिले आहे. सहायक निबंधक तसेच ऑडिटर पथकाच्या माध्यमातून तपासणी सुरू करण्यात आली आहे. स्वतः यामध्ये लक्ष घातलेले आहे. वेळेतच स्वयंस्पष्ट अहवाल वरिष्ठांना दिला जाईल.मंगेश सुरवसे, जिल्हा उपनिबंधक, अहिल्यानगर