राहुरी: राहुरी शहराला भाऊसाहेब मोरे यांच्या रुपाने स्वतःच्या पक्षाचा नगराध्यक्ष लाभला, तर राहुरीची कन्या प्रांजल चिंतामणी ह्या जामखेड नगरपरिषदेच्या नगराध्यक्षा झाल्या. त्यामुळे राहुरीला दोन नगराध्यक्ष मिळाले असून ही बाब अभिमानास्पद व भाग्याची आहे, असे गौरवोद्गार माजी मंत्री प्राजक्त तनपुरे यांनी काढले.
राहुरी येथील सराफ व्यावसायिक प्रकाश दहिवाळकर यांची ज्येष्ठ कन्या व गोपी दहिवाळकर यांची बहीण असलेल्या प्रांजल चिंतामणी यांनी जामखेड नगरपरिषद निवडणुकीत भाजपाच्या वतीने नगराध्यक्ष पदासाठी निवडणूक लढवून दणदणीत विजय मिळवला. या यशाबद्दल दि. 30 डिसेंबर 2025 रोजी सायंकाळी राहुरीतील शिवाजी चौकात श्रीरामदत्त मित्र मंडळ व राहुरीकरांच्या वतीने त्यांचा सत्कार समारंभ पार पडला. यावेळी व्यासपीठावर माजी नगराध्यक्षा उषाताई तनपुरे, नगराध्यक्ष भाऊसाहेब मोरे, जामखेडच्या नगराध्यक्षा प्रांजल चिंतामणी, अमित चिंतामणी, प्रकाश दहिवाळकर, मिनाक्षी दहिवाळकर, संजय उदावंत, सोनाली उदावंत आदी उपस्थित होते.
प्राजक्त तनपुरे म्हणाले, पक्ष वेगळे असले तरी हा राजकारणाचा नव्हे, तर कौटुंबिक प्रेमाचा विषय आहे. राहुरीत वाढलेली, राहुरीची कन्या आज जामखेडचे नेतृत्व करणार आहे, याचा प्रत्येक राहुरीकरांना अभिमान वाटतो, असे सांगितले. यावेळी उषाताई तनपुरे व नगराध्यक्ष भाऊसाहेब मोरे यांनीही मनोगत व्यक्त करत प्रांजल चिंतामणी व अमित चिंतामणी यांच्या कार्याचा गौरव केला. प्रांजल चिंतामणी व अमित चिंतामणी यांनीही राहुरीकरांचे ऋण व्यक्त केले.
प्रास्ताविक संजय उदावंत, तर सूत्रसंचालन तुकाराम तनपुरे यांनी केले. यावेळी ज्येष्ठ पत्रकार वसंतराव झावरे, दीपक नागरे, राजेंद्र बुऱ्हाडे, मनोज उदावंत, संजय पन्हाळे, सुहास कोळपकर, राजू ऊर्फ डॉन शेख, विक्रम डहाळे, राजेंद्र दुधाडे, पांडूभाऊ उदावंत, राहुल उदावंत, चंदूकाका मयूर, अर्जुन बुऱ्हाडे आदीसह श्रीरामदत्त मित्र मंडळाचे कार्यकर्ते उपस्थित होते.
तनपुरेंच्या वक्तव्याने राजकीय खळबळ
या सत्कार समारंभात माजी मंत्री प्राजक्त तनपुरे यांनी केलेले राजकीय सूचक वक्तव्य सध्या चर्चेचा विषय ठरत आहे. भाजपच्या नगराध्यक्षा प्रांजल चिंतामणी यांचा सत्कार कार्यक्रम आमदार रोहित पवार यांना विचारूनच घेतला आहे. विकासकामांसाठी त्यांनी माझ्यामार्फत आमदार पवार यांची मदत घ्यावी, तसेच सत्ताधारी भाजपकडूनही सहकार्य घ्यावे, असे ते म्हणाले. राजकारणात परस्पर सहकार्य महत्त्वाचे आहे. उद्या कोण कोणत्या पक्षात असेल, हे कोणीही ठामपणे सांगू शकत नाही, असे विधान करत त्यांनी पक्षबदल व राजकीय समीकरणांवर सूचक भाष्य केले. राहुरी विधानसभा पोटनिवडणूक समीप असताना केलेले हे वक्तव्य राजकीय विलेषकांमध्ये नव्या चर्चांना तोंड फोडणारे ठरत आहे.