

राहुरी: ‘नगर- मनमाड’ मार्गावर दररोज अपघात घडत आहेत. निरपराध प्रवाशांचे जीव जात आहे. तरीही प्रशासन गंभीर नसल्याने आता रस्ता कृती समितीने ठिकठिकाणी डिजीटल फलके लावून राज्यकर्ते आणि प्रशासनाचा निषेध नोंदवला. दरम्यान, रस्त्यांवरील मुके फलक हे प्रशासनाला कार्यतत्पर (बोलते) करणार का, याकडे लक्ष असणार आहे.
याबाबत रस्ता कृती समितीचे देवेंद्र लांबे यांनी सांगितले की, राहुरी तालुक्यात वर्षभरात 55 जणांनी रस्ते अपघातात जीव सोडला. शेकडो जणांना कायमचे अपंगत्व आले आहे. निष्पाप लोकांचा तळतळाट घेऊनही प्रशासन मुके बनले आहे. राजकीय नेत्यांकडून केवळ कोटींच्या गप्पा मारत आहे. ठेकेदार कामाचे ठिगळे पाडत रस्त्याचे काम करतोय की रस्त्याचे वाटोळे करतोय तेच समजेनासे झाले आहे. त्यामुळे शेवटी संतापाचा कडेलोट वाढला आहे. रस्ता कृती समितीने लावलेले बोलके फलक पाहून तरी मुके होण्याचे नाटक थांबवावे. दैनंदीन रस्त्यावर पडणारा रक्ताचा सडा थांबवत नगर-मनमाड रस्त्याची साडेसाती संपवावी हिच एक प्रामाणिक इच्छा आमची असल्याचे सांगितले.
नगर-मनमाड राष्ट्रीय महामार्गावर मोठे खड्डे तयार झालेले आहे. काही दिवसांपूर्वीच कोट्यवधी रुपयांचा निधी दुरूस्तीसाठी खर्च केला. परंतु तो खर्च पूर्णपणे वाया गेला. रस्त्यावर खड्यांसह ठेकेदाराने डांबर काढून टाकल्याने धुळधाळ रस्ता झालेला आहे. प्रवाशांसह लगतचे रहिवासी व व्यापार्यांना श्वसनाचे आजार जडू लागले आहे.
फलकांतून उसळला जनतेचा संताप
नगर-मनमाड रस्त्यावर लावण्यात आलेल्या फलकांवरील मजकूर पाहता नागरिकांचा संताप उघडपणे दिसून येतो. महामार्गाची दुरवस्था, ट्रॅफिक जाम, हातभर खड्डे, रुग्णवाहिकेस अडथळा, विद्यार्थ्यांचे हाल अशा ठळक मुद्द्यांसह ‘अपघातास कारणीभूत रस्ता सुधारणार कधी?’ असा थेट सवाल प्रशासनाला विचारण्यात आला आहे. या फलकांकडे लक्ष वेधले जात असताना नगर-मनमाड मार्गावरून प्रवास करणारे वाहनचालक, प्रवासी, व्यापारी व विद्यार्थी थांबून फलक वाचत असून रस्ता नाही, मृत्यूचा सापळा आहे अशा शब्दांत प्रशासनाविरोधात तीव्र संताप व्यक्त करत आहेत.
रस्ता रडतोय, सत्ता हसतेय ?
नगर -मनमाड राष्ट्रीय महामार्ग हा वाहतुकीचा मार्ग कमी आणि उपेक्षेची जखम अधिक झाला आहे. इथे डांबर झिजलेले नाही, तर प्रशासनाची संवेदना गळून पडलेली आहे. प्रवाशांच्या चाकाखाली केवळ खडी नाही, तर निष्काळजीपणाची धार दडलेली आहे.
जबाबदारीचा खेळ, बळींची मोजदाद
इथे जबाबदारी चेंडूसारखी फिरते, कधी कंत्राटदाराकडे, कधी विभागाकडे, कधी निधीकडे. मात्र चुकांची किंमत नेहमी सामान्य नागरिकच मोजतो. जखमी झालेल्या शरीरावर मलम लावण्याआधी फोटोसेशन होते आणि पुढच्या अपघातापर्यंत सगळे विसरले जाते, अशी भावना व्यक्त होत आहे.
अवजड वाहनांची नेमकी व्याख्या काय?
जिल्हाधिकारी व जिल्हा पोलिस अधिक्षक यांच्या आदेशानुसार नगर-मनमाड रस्त्याची दुरवस्था तसेच वाढत्या अपघातांमुळे अवजड वाहने पर्यायी मार्गाने वळविण्याचा लेखी आदेश जारी झाला. प्रत्यक्षात मात्र राजरोसपणे मोठ मोठ्या ट्रका, कंटेनर व मालवाहतूक करणारी मोठ मोठी साधने सुरूच आहेत. त्यामुळे जिल्हाधिकारी व जिल्हा पोलिस अधिक्षक यांची अवजड वाहतुकीची व्याख्या नेमकी काय आहे, हा प्रश्न पडला आहे.