

कर्जत: शहराचे सौंदर्य टिकून राहावे, सार्वजनिक ठिकाणी अनधिकृत फ्लेक्समुळे होणारा विद्रूपपणा थांबावा आणि नियमबद्ध पद्धतीने जाहिरात संस्कृती रुजावी, या उद्देशाने नगरपंचायतीतर्फे एक अभिनव उपक्रम राबविण्यात येत आहे. या उपक्रमांतर्गत शहरात फ्लेक्स लावण्यासाठी पूर्वपरवानगी बंधनकारक करण्यात आली असून, त्यानुसारच फलक लावले जात आहेत.
नगराध्यक्ष रोहिणी सचिन घुले, उपनगराध्यक्ष संतोष मेहत्रे, सर्व समित्यांचे सभापती, मुख्याधिकारी अक्षय जायभाय, तसेच सर्व नगरसेवकांच्या पुढाकारातून हा उपक्रम प्रभावीपणे राबविला जात आहे. शहर सुशोभीकरणाबरोबरच शिस्त आणि नियमपालनाचा आदर्श या माध्यमातून घालून देण्यात आला आहे. कर्जत नगरपंचायतने न्यायालयाच्या आदेशानुसार शहरातील सर्व अनधिकृत फ्लेक्स नुकतेच काढले आहेत आणि त्यानंतरच आता विधान परिषदेचे सभापती प्रा. राम शिंदे यांचा वाढदिवस आहे. यामुळे लागणाऱ्या फ्लेक्सचे काय होणार याकडे सर्वांचे लक्ष लागले होते.
विशेष म्हणजे केंद्र व राज्यात भाजपचे सरकार असून, कर्जत नगरपंचायतीतही भाजपचीच सत्ता आहे. तसेच राज्य विधानपरिषदेचे सभापती प्रा. राम शिंदे यांचा वाढदिवस असतानाही, नगरपंचायतीने कोणतीही सवलत न देता अधिकृत परवानगी घेऊनच शुभेच्छा फलक लावण्याचा निर्णय घेतला. हा निर्णय लोकशाही मूल्ये, कायद्याचा आदर आणि प्रशासनातील पारदर्शकतेचे उत्तम उदाहरण ठरत असून, या भूमिकेचे सर्वत्र कौतुक होत आहे.
नगरपंचायतीने फ्लेक्ससाठी प्रतिचौरस फूट एक रुपया प्रतिदिन असा दर निश्चित केला आहे. या उपक्रमाला नागरिक व कार्यकर्त्यांचा उत्स्फूर्त प्रतिसाद मिळत असून, पहिल्याच दिवशी 17 हजारांहून अधिक निधी फ्लेक्स परवानगीपोटी नगरपंचायतीकडे जमा झाला आहे.
भाजपच्या सर्व कार्यकर्त्यांनी नियमांचे काटेकोर पालन करत अधिकृत परवानगीनेच फलक लावले असून, त्यामुळे शहरातील सौंदर्य अबाधित राहण्यास मदत होत आहे. शिस्तबद्ध, नियमाधिष्ठित आणि महसूलवाढीला हातभार लावणारा हा उपक्रम इतर नगरपालिकांसाठीही मार्गदर्शक ठरत असून, कर्जत नगरपंचायतीच्या या पुढाकाराचे नागरिकांकडून सर्वत्र स्वागत केले जात आहे.