

नगर: महापालिका निवडणुकीसाठी 17 प्रभागांतील 68 जागांसाठी इच्छुकांनी मंगळवारअखेर दाखल केलेल्या तब्बल 788 अर्जांपैकी बुधवारी (दि. 31) 17 अर्ज छाननीत बाद ठरविण्यात आले. त्यात एबी फॉर्मवर खाडाखोड, अनुमोदकाच्या सह्या चुकीच्या अशी कारणे नोंदविण्यात आल्याचे मुख्य निवडणूक अधिकारी तथा महापालिका आयुक्त यशवंत डांगे यांनी सांगितले. दरम्यान, विविध प्रभागांमध्ये उमेदवारांच्या अर्जांवर हरकती घेण्यात आल्या होत्या. त्यात प्रामुख्याने अतिक्रमण, कर थकबाकी, एबी फॉर्मवर खाडाखोड, सह्या चुकीच्या असे आरोप आहेत.
भाजप, शिवसेना, राष्ट्रवादी काँग्रेस, राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्ष, शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्ष, काँग्रेस, एमआयएम, आम आदमी पक्ष, बहुजन समाज पक्ष या पक्षांसह अपक्ष इच्छुक उमेदवारांनी अर्ज भरले. आज सकाळी त्या त्या निवडणूक कार्यालयांमध्ये या अर्जांची छाननी करण्यात आली. इच्छुक उमेदवार व सूचक-अनुमोदक या वेळी उपस्थित होते. छाननीत 17 अर्ज अवैध (बाद) ठरविण्यात आले.
अर्जांवर काही उमेदवारांच्या अनुमोदकांच्या सह्या चुकीच्या होत्या, तर काही उमेदवारांच्या एबी फॉर्मवर खाडाखोड होती. काहींनी एबी फॉर्मच्या झेरॉक्स जोडल्याचे समोर आले, त्यामुळे त्यांचे अर्ज बाद करण्यात आले. दरम्यान, अनेकांनी एकमेकांच्या अर्जांवर आक्षेप घेतला होता. दुपारी छाननी झाल्यानंतर हरकतींवर निवडणूक निर्णय अधिकाऱ्यांसमोर सुनावणी झाली. अनेकांच्या हरकती निकाली काढण्यात आल्या. त्यानंतर 17 अर्ज फेटाळण्यात आले. त्यात सर्वाधिक अर्ज शिवसेनेच्या उमेदवारांचे असून, त्यांचे अपक्ष अर्ज मात्र ग्राह्य धरले आहेत. आता 2 जानेवारी 2026 पर्यंत अर्ज मागे घेता येणार आहेत. अर्ज माघारीनंतर निवडणुकीचे चित्र अधिक स्पष्ट होईल.
शिवसेनेच्या उमेदवारांवर संक्रांत
शिवसेनेने ऐनवेळी काही उमेदवारांची आयात केली. त्यामुळे अनेकांना व्हाइटनर लावून एबी फॉर्म देण्यात आले होते. काही एबी फॉर्मची झेरॉक्स दिल्याचे समोर आले. त्यामुळे शिवसेनेच्या पाच व राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाच्या एका उमेदवाराचा अर्ज बाद झाला आहे.
‘त्यांच्या’ इच्छांवरच व्हाइटनर
अनुमोदकाची सही चुकीची, राहुल कातोरेंचा अर्ज बाद
विशाल शितोळे यांनी एबी फॉर्म न जोडल्याने अर्ज बाद
अमित खामकर यांनी एबी फॉर्मची झेरॉक्स जोडल्याने अर्ज बाद
हर्षवर्धन कोतकर आणि गौरी नन्नवरे यांच्या एबी फॉर्ममध्ये खाडाखोड असल्याने अर्ज बाद
ऋषिकेश रासकर यांचाही अर्ज बाद
शितोळे, खामकर, कोतकर, रासकर यांचे अपक्ष अर्ज मात्र मंजूर
प्रभाग 8 मधील राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाचे नूरखा फत्तेखा पठाण यांच्या अर्जावरील सूचक अन्य प्रभागातील असल्याने अर्ज बाद