राहुरी : अतिवृष्टीने राहुरी परिसरातील पाच हजारापेक्षा अधिक शेतकऱ्यांच्या शेती पीकांची नुकसान झाली. बाजरी, मका, सोयाबीन, कापूस यांसह इतर शेती पीके पाण्याखाली सापडल्याने तब्बल 4 हजार 432 हेक्टर क्षेत्राचे नुकसान झाले. सुमारे अडीचशे व्यक्ती पावसाच्या पाण्यात अडकले असताना त्यांना सुरक्षिततपणे बाहेर काढत सुरक्षीत ठिकाणावर नियोजन करण्यात आले. त्यासह राहुरी परिसरात तब्बल 49 घरांची पडझड होऊन एका गायीचा मृत्यु झाल्याची नोंद झाली. (Latest Ahilyanagar News)
सेच दरडगावथडी हद्दीत पावसाच्या पाण्याने दोन विहीर पडझडीची नोंद झाली. राहुरी शहरामध्ये कांद्याची चाळ तसेच हॉटेलची पावसामुळे मोठी नुकसान झाली. मानोरी गावामध्ये शाळेची भिंत पडल्याची नोंद शासकीय दप्तरी घेण्यात आली. दरम्यान, आ. शिवाजीराव कर्डिले तसेच माजी मंत्री प्राजक्त तनपुरे यांनी शेतकऱ्यांच्या मदतीला यंत्रणा उभी केल्याचे दिसले.
राहुरी तालुक्यातील विविध भागामध्ये परतीच्या पावसाने सलग दोन दिवस अक्षरशः धुमाकूळ घालत झोडपून काढले. शनिवारी दुपारच्या वेळी पासून प्रारंभ झालेल्या पावसाने रात्रभर झोडपत ढगफुटीसदृष्य परिसर पाणीमय करून टाकले. परिणामी राहुरी तालुक्यातील सर्वच रस्त्यांवरून गुडघ्याएवढे पाणी वाहत असल्याचे दिसून आले. अनेक ठिकाणी ओढे नाले फुटल्याने रस्त्यावर पुराचे पाणी वाहत होते. तर अनेक घरांमध्ये पावसाचे पाणी शिरल्याने शासकीय प्रशासनाने पुढाकार घेत पुरात अडकलेल्या कुटुंबियांची सुटका करत त्यांची जिल्हा परिषद शाळा व मंगल कार्यालयामध्ये व्यवस्था केली.
उंबरे गावातील डागवस्ती हद्दीत पाणी घुसल्याने 200 ते 250 आदिवासी ग्रामस्थांचा बचाव करत त्यांना उंबरे येथील मंगल कार्यालयात आश्रय देण्यात आला. तहसीलदार नामदेव पाटील, गटविकास अधिकारी सुरेश तायडे, तालुका कृषी अधिकारी बापसाहेब शिंदे, मंडळाधिकारी आढाव यांच्या पथकाने नियंत्रण पथकाला सोबत घेत ठिकठिकाणी पुरात अडकलेल्यांना मदत केली. कोंढवड, केंदळ, वळण पिंप्री, देसवंडी, बारागाव नांदूर येथील हावरी ओढा पाण्याखाली गेल्याने वाहतूक ठप्प झालेली होती. देवळाली प्रवरा हद्दीत श्रीरामपूर ते देवळाली रस्ता ओढ्याचे पाणी रस्त्यावर आल्याने तो रस्ताही बंद झाला होता. राहुरी महाविद्यालय परिसरातील घरे अक्षरशः पाण्यात बुडाल्याप्रमाणे झाली होती.
घरालगत मोठ्या प्रमाणात तळे साचल्याचे चित्र आहे. देवळाली प्रवरा परिसरातही अनेक कुटुंब पावसाच्या पाण्यात अडकल्याने संबंधितांना बाहेर काढण्यासाठी प्रशासनाकडून मदत करण्यात आली. म्हैसगाव परिसरातील अनेक गावांमध्ये जलमय परिस्थिती निर्माण होऊन रस्ते बंद झाले होते. बारागाव नांदूर गावातील पठाणदरा वस्तीमधील ग्रामस्थांच्या व शेतकर्यांच्या घरांमध्ये पाणी शिरल्याने उपाययोजना राबविण्यात आली. यासह टाकळीमिया, पाथरे, सोनगाव, जातप, ब्राम्हणी, गुहा, ताहाराबाद, बाभूळगाव, वरवंडी, मुळानगर, वडनेर, चिंचाळे, कोल्हार खुर्द, चिंचोली, वळण, मानोरी, पिंप्री वळण, चंडकापूर, केंदळ, मांजरी याप्रमाणे राहुरी परिसरात सर्वत्र पावसाच्या तडाख्याने जनजीवन विस्कळीत होऊन शेतकऱ्यांचे मोठे नुकसान झाले आहे.
करजगाव, मांजरी-पानेगाव परिसरातील मुळा व प्रवरा बंधारे पाण्याखाली आले होते. त्यामुळे पुलावरून वाहतूक व्यवस्था ठप्प झाली होती.
राहुरी तालुक्यात दरडगाव थडी 1, गंगापूर 1, ब्राम्हणी 5, मोमीन आखाडा 2, चिखलठाण 1, ताहाराबाद 3, राहुरी बु 16, मांजरी 1, शेनवडगाव 2, पिंपळगाव फुणगी 1, कणगर बु 1, तांभेरे 1, चिचाळे 1, बा.नांदूर 4, मानोरी 1 व पाथरे खुर्द 1 असे एकूण 49 घरांची पडझड होऊन मानोरी गावातील शाळेची भिंत पडली.
गाय दगावली
कोपरे येथील शेतकरी रामा जगताप यांची गाय दगावली. तर अनेक ठिकाणी जनावरांच्या गोठ्यांचे नुकसान झाल्याचा अंदाज आहे. शहरातील एक कांदा चाळ पाण्याखाली सापडली. एका हॉटेलमध्ये पाणी शिरल्याने हॉटेलचे मोठे नुकसान झाले.
नुकसान भरपाईसह कर्जमाफीची गरज : माजी मंत्री प्राजक्त तनपुरे
अतिवृष्टीमुळे शेतकऱ्यांचे प्रचंड नुकसान झाले आहे. शासनाने जाहीर केलेली मदत तुटपुंजी असून ती शेतकऱ्यांना दिलासा देणारी नाही. शेतकऱ्यांना खराखुरा आधार द्यायचा असेल तर शासनाने भरीव निधीची तरतूद करावी आणि सर्वसमावेशक अशी सरसकट कर्जमाफी जाहीर करावी, अशी मागणी माजी मंत्री प्राजक्त तनपुरे यांनी शासनाकडे केली. बारागाव नांदूरमध्ये पाहणीदरम्यान नारायण जाधव, किशोर कोहकडे, मंगेश गाडे, हरिभाऊ हापसे, राजू गाडे, विश्वास तात्या पवार, गोवर्धन गाडे, सुरेश गाडे, भाऊसाहेब गाडे, सुभाष गाडे, विक्रम गाडे, सौरभ गाडे, किशोर गाडे, सोमनाथ गाडे, रज्जाक इनामदार, लहू थोरात, भास्कर गाडे, प्रकाश गाडे आदी शेतकरी उपस्थित होते. .
सरसकट पंचनामे करा : आ. कर्डिले
गाव पातळीवर अधिकारी तथा कर्मचाऱ्यांना पंचनामा करण्यासाठी शेतात जाणे देखील बिकट झाले आहे. त्यामुळे सरसकट पंचनामे होणे अपेक्षित आहे. याकामी स्थानिक पातळीवर अधिकारी कर्मचाऱ्यांनी हलगर्जीपणा केल्यास कारवाई करावी, याबाबतच्या आवश्यक त्या सूचना प्रशासनाला आपण दिल्या आहेत. नुकसानीची तात्काळ भरपाई मिळणे गरजेचे आहे. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस तसेच पालकमंत्री राधाकृष्ण विखे पाटील यांच्याकडे तशी मागणी केली आहे, असे आ.शिवाजीराव कर्डिले यांनी सांगितले.
तहसीलदार जेसीबीसह ग्राऊंडवर
तहसीलदार नामदेव पाटील यांसह शासकीय मदत पथक शहरासह ग्रामिण भागामध्ये जेसीबीसह पावसाच्या पाण्यात अडकलेल्या नागरीकांच्या मदतीसाठी प्रयत्न करत होते. अनेक गावांमध्ये मदत पथक पोहोचत नागरीकांना पाण्यात सुखरूप बाहेर काढताना दिसून आले. तहसीलदार पाटील यांनीही थेट पाण्यात उतरत सुमारे 70 कुटुंबियांना पाण्याबाहेर काढले